आंदोलन पेटले: उजनी धरणातील पाणी पळवण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांवर रोष वाढला; सदाभाऊ खोत, सुभाष देशमुख आक्रमक – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
जुनी योजना असल्याचे भासवून उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळविण्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे सोलापूर शहर, जिल्ह्यात रोष वाढत चालला आहे. संघर्ष समितीने सिध्देश्वर मंदिरात येऊन महाआरती करून उजनीचे पाणी न पळवण्याची सुबुध्दी दे अशी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान भरणे यांचा बोलविता धनी कोण आहे, याचा विचार आता जिल्ह्यातील जनतेने करावा, असे आवाहन खोत यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याप्रकरणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही योजना जुनीच आहे, असे सांगितल्याने उजनीच्या पाण्याचा प्रश्न सध्या सोलापुरात पेटला आहे. उजनीचे पाणी इंदापूर तालुक्याला नेण्यासाठीचा प्रयत्न चालवला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाऐवजी इंदापूर तालुक्याचाच विचार ते करतात. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण राज्याचा कारभार करावा लागतो, त्यामुळे भरणे यांनी इंदापूरचे प्रेम कमी करावे आणि सोलापूरच्या हक्काच्या पाण्याचा पुर्नविचार करावा अन्यथा. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा माजी मंत्री तसेच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला. माजी मंत्री सदाभाऊ खोत हे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला. सोलापूर जिल्हा दुष्काळी असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतीला अद्याप पाणी पोहचलेले नाही. सिंचनाची कामे अर्धवट आहेत. ती कामे पूर्ण करण्यात पालकमंत्र्यानी प्रयत्न लावावा. ते सोडून केवळ इंदापूर तालुक्याला पाणी नेण्याचा अट्टासह भरणे यांनी सोडून द्यावा असा सल्ला ही खोत यांनी दिला. जिल्ह्यात उजनी धरणातील पाण्याच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. या ठिकाणचा शेतकरी अक्रमक होत चालला आहे. याचे भान पालकमंत्र्यानी ठेवावे तसेच भरणे यांचा बोलविता धनी कोण आहे. याचा ही विचार आता जिल्ह्यातील जनतेने करावा, असे आवाहन खोत यांनी केले.
पालकमंत्र्यांना सद्बुद्धी दे
अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळमध्ये बैठक घेऊन आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना सद्बुद्धी दे असे साकडे घालण्यात आले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडले. अतुल खुपसे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना खरेतर बुद्धी नाही त्यांना सद्बुद्धी मिळवण्यासाठी आम्ही आरती केली असल्याचे सांगितले.
अशी आहे उजनीचे पाणी पळवण्याची योजना
शासनाने लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळात अंतर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उगम उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथून असून पहिल्या टप्प्यात ५०.१० मीटर, दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील दहा गावातील ४३३७ हेक्टर व बारामती तालुक्यातील ७ गावातील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. यासाठी ०.९० अब्ज घन फूट पाणी कुंभारगाव येथून उपसा करणे प्रस्तावित आहे.
२० राेजी फडणवीस येणार, आंदोलन करू : देशमुख
पालकमंत्र्यांनी पाणी पळवण्याचे पाप करू नये. अन्यथा नागरिक, शेतकरी, भाजप आणि सहयोगी आमदारांना घेऊ तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला. गेल्या वर्षीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी पळवण्याचा डाव केला होता. त्यावेळी तो डाव हाणून पाडला होता. लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपये राज्य सरकारने देणे हा कुटील डाव आहे. नाव बदलून आणलेली योजना जुनी आहे. यामुळे उजनीचे पाणी इंदापूर-बारामतीला नव्याने नेण्यात येत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. ते २० रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे भाजपचे आणि सहयोगी पक्षाचे सर्व आमदार त्यांना भेटून याबाबत भूमिका मांडणार आहेत. पालकमंत्र्यांनी पाणी पळवण्याचा डाव न थांबवल्यास शेतकरी, नागरिकांना घेऊन आमचे सर्व आमदार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares