बोलून बातमी शोधा
22544
इथेनॉल प्रकल्पांसाठी अंतराची अट रद्द करा
रघुनाथदादा पाटील; शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ठराव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः दोन साखर कारखान्यांतील इथेनॉल प्रकल्पासाठी असलेल्या अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना वीज बिल व कर्जातून मुक्त करावे, असे ठराव आज येथे जिल्हा शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत मांडले. सप्टेंबरमध्ये पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा निर्धारही परिषदेत केला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील अध्यक्षस्थानी होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे जिल्हा सुजलाम सफलाम झाला. पर्यायाने साखर कारखानदारी वाढली. या कारखानदारीचा लाभ शेतकऱ्यांना न होता मूठभर साखर कारखानदार व व्यापाऱ्यांना झाला. या जिल्ह्यात उद्योजकता मोठी आहे. मात्र काही पुढाऱ्यांनी स्वतःशिवाय अन्य कोणी साखर उद्योग क्षेत्रात येऊ नये अशी सोय केली. त्यासाठी दोन कारखान्यांच्या अंतराची अट, परवाने, कोटा व परमीट अशा अटी लादल्यामुळे पुढारी लोक सोडून दुसरे कोणी या क्षेत्रात येऊ शकत नाही, परिणामी येथे इथेनॉल प्रकल्पही होणेही मुश्कील आहे.’’
ते म्हणाले, ‘‘वरील बाबींचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणापासून ते औषधोपचाराच्या खर्चासाठी शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे साखर कारखानदारी, उद्योग, व्यापारावर असलेली ठरावीक घराण्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.’’
ॲड. माणिक शिंदे म्हणाले, ‘‘ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज प्रामाणिकपणे भरले आहे त्यांना शासनाकडून ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार होते. हे अनुदान आठ दिवसांत मिळाले नाही तर जिल्हा सहकार निबंधकांची खुर्ची बाहेर काढण्याचे आंदोलन करण्यात येईल.’’
ॲड. अजित काळे, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, अशोक खालाटे, वर्षा काळे व संजय रावळ आदी प्रमुख उपस्थित होते.
परिषदेत मांडलेले ठराव
गुंठेवारी खरेदी-विक्रीतील बंधन काढून टाका
तोडणी व वाहतूकदार कामगार महामंडळाची प्रतिटन १० रुपये कपात रद्द करा
गो हत्याबंदी व वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा
महापुरातून सुटकेसाठी उपाययोजना राबवा
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news