स्त्रीउद्धारक.. – Loksatta

Written by

Loksatta

डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो drceciliacar@gmail.com
ज्या काळात स्त्रीमुक्तीचा विचार करणेही अशक्य होते, त्या काळात स्त्रीमुक्तीचा मार्ग स्वत: अवलंबत शिक्षण, परदेशप्रवास आणि धर्मातर असे धाडसी निर्णय घेत समस्त स्त्रियांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे हे स्मृतिशताब्दी वर्ष.  त्यानिमित्ताने..
पंडिता रमाबाईंच्या जीवनप्रवास एका पवित्र ठिकाणाहून सुरू होऊन दुसऱ्या एका पवित्र ठिकाणी येऊन थांबला. तुंगेच्या तीरावर २३ एप्रिल १८५८ रोजी सुरू झालेला हा प्रवास पुढे जॉर्डन नदीच्या तीरापर्यंत गेला.. आणि तेथून मुळा-मुठेच्या तीरावरील पुण्याच्या परिसरातील केडगाव येथे येऊन तो थांबला.. ५ एप्रिल १९२२ या दिवशी! या वर्षी त्याच्या निधनाला शंभर वर्षे होत आहेत. केडगावच्या मुक्ति मिशनच्या रूपात त्यांच्या कार्याचा पायरव आजही ऐकू येतो.
रमाबाईंच्या धार्मिक जीवनाची पायाभरणी हिंदू धर्मग्रंथांनी केली होती. वीस वर्षांच्या तरुण रमाबाईंना धर्मग्रंथांतील अठरा हजार श्लोक मुखोद्गत होते. १८६६ साली ‘पायोनियर’ या इंग्रजी वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली होती : ‘अयोध्येत दक्षिणेकडून एक मोठा पंडित आला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी, अठरा व आठ वर्षांच्या अशा दोन कन्या व सोळा वर्षांचा मुलगा आहे. त्या सर्वाना कित्येक ग्रंथ तोंडपाठ आहेत. एका सभेत त्या पंडिताने हजारो श्लोक  म्हटले. धाकटय़ा मुलीनेसुद्धा आपल्या वयानुसार श्लोक स्पष्ट व सुंदर रीतीने म्हटले.’ १८७८ साली मुंबईतील दैनिकात एक बातमी झळकली : ‘हल्ली कलकत्त्यात रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने तेथील विद्वान मंडळींस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते. जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय एकवीस असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीय असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.’ या बातम्यांतील आठ वर्षांची मुलगी आणि एकवीस वर्षांची तरुणी पुढे ‘पंडिता रमाबाई’ म्हणून ख्यातकीर्त झाली.
या बातमीने तेव्हा महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी काय शिकली? आणि अजूनही ती अविवाहित कशी? कलकत्त्यापर्यंत ही मराठी बाई पोहोचली कशी? ज्या काळात मुलीच्या जन्माबद्दल नाकं मुरडली जात होती, ज्या काळात बालविवाह होत असत, मुलीचं अविवाहित राहणं पाप समजलं जात होतं;  त्या काळात एका तरुण स्त्रीची विद्वत्ता बंगालसारखा पुरोगामी प्रांत स्वीकारतो, हे सारंच मराठी समाजाला विस्मयचकित करणारं होतं. १८७८ सालची ती बातमी म्हणजे पंडिता रमाबाईंच्या स्त्रीशिक्षण व समाजोन्नतीविषयक कार्य तसेच त्यांच्या लेखनकार्याचा पूर्वसूर होता.
उपासमारीने कृश झालेल्या, परंतु ज्ञानाची प्रभा मुद्रेवर असलेल्या या तरुणीला कलकत्त्याच्या सिनेट हाऊसमध्ये तिच्या स्वागतार्थ झालेल्या सभेत ‘पंडिता रमाबाई’ हा किताब बहाल केला गेला. आणि येथूनच तिच्या सार्वजनिक व सांस्कृतिक कार्याला सुरुवात झाली. तिच्या आई-वडिलांनी तिला शिक्षण देण्यासाठी केलेले परिश्रम व प्रयास, तसेच इतकी वर्षे सहन केलेला वनवास आणि तपश्चर्येचे याप्रसंगी सार्थक झाले.
सामाजिक कार्याचे ध्येय ठरवताना पंडिता रमाबाईंनी स्त्रियांचे उत्थापन या विषयाला प्राधान्य दिले. वैदिक वाङ्मयाचा रमाबाईंचा गाढा अभ्यास होता. त्यांचे विचार ऐकून सभा दीपून जात असे. प्राचीन काळातील धर्मग्रंथांतील अणि समाजातील स्त्रीचे स्थान, बालविवाहामुळे कुंठित झालेले स्त्रियांच्या प्रगतीचे मार्ग याबद्दल स्पष्ट शब्दांत त्यांनी तत्कालीन समाजाला धारेवर धरायला सुरुवात केली आणि स्त्रियांच्या स्वतंत्र विचाराचा स्वर प्रथमत:च आसमंतात उमटू लागला. आणि रमाबाई अनंतात विलीन होईपर्यंत त्यांचा हा आवाज अविरत घुमत राहिला.
बंगालमधील एका सभेत पंडिता रमाबाईंचा बिपिनबिहारी मेधावी यांच्याशी प्रथम परिचय झाला. आपला थोरला भाऊ श्रीनिवास याची साथ होती तोवर रमाबाईंना सुरक्षित आणि नििश्चत  वाटत होते. परंतु त्याच्या मृत्यूपश्चात आणि आई, वडील, बहीण अशा साऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांना एकाकीपण आले. अशा वेळी बिपिनबिहारी मेधावी यांचा त्यांना आधार लाभला. वयाच्या २२ व्या वर्षी १३ जून १८८० रोजी बांकीपूर येथे नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह झाला. त्यांचा विवाह अनेक बाबतींत वैशिष्टय़पूर्ण होता. प्रेमविवाह, प्रौढ विवाह आंतरजातीय, आंतरप्रांतीय आणि नोंदणी पद्धतीने झालेला म्हणून प्रतिलोम पद्धतीचा हा विवाह होता. नवऱ्याला त्याच्या नावाचे आद्याक्षर असलेल्या ‘बी’ या नावाने त्या हाक मारीत असत, हेही त्यांच्या पुरोगामी विचारांचे दर्शक आहे.
परंतु दुर्दैव रमाबाईंच्या पाठी हात धुऊन लागले होते. बिपीनबापू १८८२ मध्ये मरण पावले तेव्हा रमाबाईंच्या पदरात दहा महिन्यांची मुलगी मनोरमा होती. पंचविशीच्या आतच रमाबाईंवर अशी अनेक संकटे कोसळली. परंतु त्या डगमगल्या नाहीत किंवा अश्रूही ढाळत बसल्या नाहीत, तर समदु:खितांचे, दारिद्य्राने पिचलेल्या, अज्ञानाने नाडलेल्यांचे अश्रू पुसण्यास त्या सिद्ध झाल्या. कलकत्ता सोडून त्या प्रथम मुंबईत आणि नंतर पुण्यात आल्या. स्त्रीउद्धाराच्या त्यांच्या कार्याची सुरुवात येथूनच झाली. त्यांनी लेखनासही सुरुवात केली.
‘स्त्रीधर्मनीती’ हे रमाबाईंचे आरंभीचे पुस्तक. ते संस्कृतप्रचुर असल्याने २२ ऑगस्ट १८८२ च्या ‘केसरी’त त्यावर टीका केली गेली.. ‘जर पंडिता रमाबाईंना अधिक पुस्तके लिहायची असतील तर तिने मराठीचा यथायोग्य पद्धतीने अभ्यास करावा.’ पुढे मात्र रमाबाईंच्या लेखनात व मराठीत सुधारणा होत गेली.
रमाबाईंच्या परदेशगमनात त्यांच्याच मित्रमंडळींनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्या आक्षेपांची पत्रांतून दिलेली उत्तरे आणि त्यांचे प्रवासानुभव ‘इंग्लंडचा प्रवास’ या ग्रंथात बद्ध केले ते त्यांचे स्नेही सदाशिव पांडुरंग केळकर यांनी. आपल्या मित्राला पत्रं लिहून रमाबाईंनी विशुद्ध मैत्रीचा एक आदर्श घालून दिला. तत्कालीन परिस्थितीचे ललितरम्य भाषेतून लिहिलेले मराठी साहित्यातील हे पहिले प्रवासवर्णन (१८८३) होय.
इंग्लंडमध्ये गेल्यावर कोणाचे मिंधेपण स्वीकारावे लागू नये म्हणून हिंदूस्थानात जाऊ इच्छिणाऱ्या ख्रिस्ती मठवासिनींना मराठी शिकविण्याचा व त्याबदल्यात इंग्रजी शिकण्याचा करार त्यांनी केला. हा त्यांचा बाणेदारपणा नजरेत भरण्याजोगा आहे. इंग्लंडमध्ये गेल्यावर तीन महिन्यांनी (२९ सप्टेंबर १८८३) त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. तेव्हा हिंदूस्थानात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘इंदुप्रकाश’, ‘पुणे वैभव’, ‘केसरी’ या पत्रांमधील प्रतिक्रिया अधिक कडवट होत्या. ‘धर्मातराबरोबर त्यांनी आपला देशाभिमान टाकला नाही हे त्यांस श्रेयस्कर आहे,’ असे एका ठिकाणी म्हणत १२ जानेवारी १९०४ च्या अग्रलेखात ‘केसरी’कारांनी रमाबाईंना ‘मायावी वाघीण’ म्हटले आहे.‘‘ पंडिता’ऐवजी त्यांनी आता ‘रेव्हरंडा’ लावावे’, ‘हिंदू धर्मात न मिळणारे स्वातंत्र्य ख्रिस्ती धर्मात मिळाल्याने..’ अशी विधाने त्यात केलेली आहेत.
स्त्रियांच्या उत्थापनासाठी १ मे १८८२ रोजी पंडिता रमाबाई यांनी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. स्त्रीउद्धार व  स्त्रीशिक्षणार्थ केलेल्या प्रबोधनाच्या कार्याची ती फलश्रुती होती. सर विल्यम हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखालील कमिशनपुढे रमाबाईंनी स्त्रीशिक्षणविषयक आवश्यकता प्रतिपादन केली. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची मागणी केली. पंडिता रमाबाईंच्या भाषणाचा हंटर साहेबांवर विशेष प्रभाव पडला. रमाबाई इंग्लंडला जाण्याच्या आधी एडिनबरो येथे हंटरसाहेबांनी रमाबाईंच्या शिक्षणविषयक प्रचार कार्याची जाहीर व्याख्यानमालेत प्रशंसा केली होती.
पंडिता रमाबाईंच्या धर्मातराकडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. भांडारकर यांनी काहीशा सहिष्णुतेने पाहिले होते; तर जोतिराव फुलेंनीही हिंदू धर्मातील कर्मठ प्रवृत्तीला, स्त्री-शूद्रांना दिलेल्या नीच स्थानाला आव्हान दिल्यामुळे रमाबाईंना पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर काही असमंजस पत्रकर्त्यांनी ‘इसापनीतीतील कोल्ह्य’सारखी नाना प्रकारची निर्थक दूषणे रमाबाईंना दिली होती, त्यावर ‘पंडिता रमाबाईंबरोबर यांस तोलून पाहिले तर यांचे वजन खंडीस नवटक्यासारखे भरणार आहे,’ अशा शब्दांत महात्मा फुल्यांनी त्यांची संभावना केली होती.
१८९८ मध्ये ‘मुक्ति मिशन’ची स्थापना झाल्यावरदेखील लोकमान्य टिळकांचे पंडिता रमाबाईंवरील शरसंधान थांबले नव्हते. २८ जानेवारी १९०२ च्या ‘केसरी’त ‘‘मुक्ती’ म्हणजे २५०० बायकांचा तुरुंग’ असा उल्लेख करून धर्मातराचा, तसेच तिथल्या बायकांना नीट खायला दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. लेखाच्या अखेरीस मुंबईच्या गव्हर्नरला विनंती केली होती की त्यांनी प्रत्यक्ष जाऊन‘मुक्ती’चा तपास करावा. गव्हर्नरांनी खरोखरच ‘मुक्ती’ला अनपेक्षितपणे भेट दिली. रमाबाईंचे कार्य पाहून गव्हर्नर थक्कच झाले. कारण रमाबाईंनी दुष्काळग्रस्त, विधवा, उपेक्षित महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर व मूल्यशिक्षणावर भर दिलेला होता. गव्हर्नरांसमवेत झालेल्या चर्चेत मात्र पंडिता रमाबाईंनी लोकमान्य टिळकांच्या देशसेवेचा गौरव केला होता. रमाबाईंची ही निकोप दृष्टी वाखाणण्याजोगीच होती.
पंडिता रमाबाईंचे इंग्लंड आणि अमेरिकेतील वास्तव्य दीर्घ स्वरूपाचे होते. जपान, ऑस्ट्रेलियामध्येही त्यांनी प्रवास केला. भारतभ्रमण तर त्यांनी केलेच, परंतु दुष्काळात दुर्गम भागांत जाऊन त्यांनी दुष्काळपीडितांचा शोध घेतला. स्त्रियांची आत्मशक्ती त्यांनी जागृत केलीच, त्याचबरोबर रमाबाई त्यांच्या आश्रयदात्याही बनल्या. आर्य महिला समाज (१८८२), रमाबाई असोसिएशन (१८८७, अमेरिका), शारदासदन (१८८९), अमेरिकन रमाबाई असोसिएशन (१८९८), मुक्ति मिशन (१८९८) या संस्थांच्या स्थापनेतून रमाबाईंच्या स्त्रीसामर्थ्यांच्या कार्याची कमान सतत चढतीच राहिली. शिक्षणप्रसार आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे समाजसुधारणेचे उद्दिष्ट समोर ठेवून उदयास आलेल्या तत्कालीन अनेक संस्था, ‘समाज’ आज अस्तंगत झाले आहेत; परंतु पंडिता रमाबाईंचे स्त्रीउद्धाराचे, दुर्बलांच्या सेवेचे कार्य आजही सुरू आहे.  रमाबाई इंग्लंडमध्ये असताना हैरियट टबमन या स्त्रीने ३०० कृष्णवर्णीय गुलामांना मुक्त केल्या संदर्भातील तिचे चरित्र त्यांच्या वाचनात आले होते. हिंदूस्थानातील भगिनींनाही आपण असेच मुक्त करावे अशी प्रेरणा त्यातून मिळाल्याची नोंद सिस्टर जिराल्डिन यांना लिहिलेल्या एका पत्रात पंडिता रमाबाईंनी केली आहे. रमाबाईंचं वाचन, विविध भाषांतील त्यांचं लेखन, त्यांचं वक्तृत्व, त्यांची विद्वत्ता, त्यांचे विविध भाषांवरील प्रभुत्व;  विशेषकरून आपल्यावरील टीकेला विधायक मार्गाने प्रत्युत्तर देण्याच्या- तत्कालाला अपरिचित असलेली त्यांची संयत, सकारात्मक, समन्वयवादी दृष्टी पाहून आजही थक्क व्हायला होतं. अत्यंत स्वच्छ, स्पष्ट विचार आणि देखणी, उज्ज्वल चारित्र्याची ही तरुणी कर्मठ समाजाला आव्हान देते, ‘बायबल’सारखा धर्मग्रंथ मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषा आत्मसात करून भारतीय धर्मसंकल्पना नाकारत भाषांतरित करते, हिंदू धर्माप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातील पुरोहितशाहीला नकार देते, दु:खाचे डोंगर कोसळले तरी कुणा पुरुषाला आपलं मानण्यापेक्षा येशू ख्रिस्ताला आपलं मानते.. रमाबाईंची ही ताकद अजमावता तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीची नक्कीच दमछाक झाली असणार. त्यांनी ख्रिस्ती धर्मस्वीकार केला तरी स्त्रीच्या आत्मसन्मानाला, तिच्या ‘माणूस’ असण्यालाच त्यांनी आपल्या आयुष्यात कायम अग्रस्थान दिले. कवयित्री आणि राजकीय नेत्या सरोजिनीदेवी नायडूंनी पंडिता रमाबाईंना श्रद्धांजली अर्पण करताना अत्यंत सूचक उद्गार काढले आहेत. त्या म्हणतात, ‘पंडिता रमाबाई म्हणजे भारतीय संतांच्या मालिकेतील एक ख्रिस्ती संत आहेत.’ रमाबाईंचे हे संतत्व भारतीय मान्य करतात यातच या मनस्विनीच्या समग्र जीवनाचे सार आहे!
मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Role of pandita ramabai in indian society 100th death anniversary of pandita ramabai zws

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares