ध्येयवादी स्त्री-डॉक्टरचे विलक्षण अनुभव – Loksatta

Written by

Loksatta

भारतीय आरोग्यसेवेची एक दुखरी नस आहे- खेडेगावांत आणि दुर्गम भागांत डॉक्टरांची तुटपुंजी संख्या आणि दवाखान्यांची वानवा!  सरकारी आरोग्यसेवा असते, पण त्यात औषधांचा, साधनसामुग्रीचा, विशेष वैद्यकीय उपचारांचा गंभीर तुटवडा असतो. ही वस्तुस्थिती बदलण्याचे स्वप्न एक डॉक्टर तरुणी पाहते. घरच्यांचा, मित्र-मत्रिणींचा विरोध पत्करून बिहारसारख्या सामान्यजनांना भयप्रद वाटणाऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेते. तिथल्या मागास भागातील अभावग्रस्त परिस्थितीशी लढत आदर्शवाद आणि मानवी स्वभाव यांची सांगड घालते. अक्षरश: स्तिमित करणारा लढा देऊन लयाला गेलेल्या आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे दिव्य साकार करते. डॉ. तरू जिंदल नावाच्या या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञाच्या जिगरबाज लढय़ाची अनोखी अनुभवकथा म्हणजे- ‘हाँ, ये मुमकिन है!’
मुंबईसारख्या वैद्यकीयदृष्टय़ा प्रगत महानगरातून स्त्रीरोगतज्ज्ञाची पदवी घेतल्यावर नामवंत इस्पितळात विशेषज्ञाचे काम कररून भरपूर पसे मिळवणे, लग्न करून सुखाचा संसार करणे अशा चौकटीतले आयुष्य जगण्याऐवजी ही युवती ‘डॉक्टर फॉर यू’ या एनजीओतर्फे बिहारसारख्या राज्यातील मोतिहारी या गावातल्या मरणासन्न झालेल्या रुग्णालयाची आमूलाग्र सुधारणा करण्याचे काम स्वीकारते. असंख्य विपरीत गोष्टींना सामोरे जाऊन ती या रुग्णालयाचा अंतर्बा कायापालट करते. तिथल्या आया, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि अधिकारी वर्गाला कधी समजावून, कधी नाराजी व्यक्त करून, तर कधी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा घडवून आणते.
सुरुवातीला हा लढा डॉ. तरू जिंदल एकटय़ाने सुरू करते. पण हळूहळू तिच्या या लढय़ात रंजू सिन्हा नामक परिचारिका आणि गीतिका नावाची एमबीए पदवी घेतलेली दिल्लीची तरुणी सहभागी होतात. त्या जिल्ह्यच्या मॅजिस्ट्रेटपदावरील अधिकारी व्यक्ती तिच्या तळमळीने प्रभावित होऊन मध्यरात्री इस्पितळाला भेट देते आणि मग साराच नूर पालटून जातो. मोतिहारी रुग्णालयाची पूर्ण रसातळाला गेलेली अवस्था नुसतीच सुधारत नाही, तर एका वर्षांने त्याला आदर्श इस्पितळ म्हणून राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळतो. केवळ तीन महिने काम करण्यासाठी आलेल्या डॉ. तरू यांना सरकारतर्फे आणखी सहा महिने काम करण्याचा आग्रह केला जातो. एखाद्या कादंबरीलाही लाजवतील असे अनेक वास्तव प्रसंग यात लेखिकेने चित्रित केले आहेत.
कामाच्या पहिल्याच दिवशी धुळीने माखलेली प्रसूतीची खोली, स्वच्छतेचा मागमूस नसलेल्या स्वीपर्सकडून होणारी प्रसूती, कुठलेही शस्त्रक्रियेचे साधन किंवा टाके घालण्याचे धागे जागच्या जागी नसलेले अस्वच्छ ऑपरेशन थिएटर, इस्पितळाच्या कामाच्या वेळी उपास आहे म्हणून नाही म्हणणाऱ्या लेडी डॉक्टर्स अशी अनास्थेची अनेक प्रकरणे अंगावर काटा आणतात. या सगळ्यातून वाट काढत एक टीम बनवून गलिच्छ अवस्थेतील या इस्पितळाचे रूपांतर उच्च दर्जाची वैद्यकीय शिस्त पाळणाऱ्या आणि तितक्याच उत्तम दर्जाचे उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये करण्याची कामगिरी अतिशय प्रत्ययकारी व थक्क करणारी आहे.
मोतिहारीतून आपले कार्य यशस्वीपणे संपवून
डॉ. तरू पुन्हा मुंबईला येते. तिला वध्र्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम नोकरी मिळते, पण समाजसेवेची ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नाही. २०१५ मध्ये नेपाळला झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर तिथल्या नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी ती ‘डॉक्टर फॉर यू’ संस्थेतर्फे नेपाळमधील न्युवाकोटला जाते. न्युवाकोटमध्ये या भूकंपात सर्वात जास्त हानी झालेली असते. तिथे निरलसपणे कार्य करताना नेपाळमधील आरोग्यव्यवस्थेबाबत नोंदवलेली निरीक्षणे महत्त्वाची आहेत. नेपाळसारख्या देशातल्या परिचारिका कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांइतक्याच सफाईने रुग्णांच्या गंभीर अवस्थेत योग्य ते उपचार करून रुग्णांचा जीव वाचवतात, हे डॉ. जिंदल यांच्या निदर्शनास आले. लोकसंख्येच्या तुलनेत भारतापेक्षाही अतिशय तुटपुंज्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या असूनही नेपाळमधील ग्रामीण आरोग्यसेवा जास्त सक्षम आहे, हे त्या नमूद करतात. याचे कारण तिथल्या परिचारिकांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. सरकारी सेवेत असताना नवनव्या तंत्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांना दिले जाते याची नोंद त्या करतात.
नेपाळमध्ये महत्त्वपूर्ण सेवाकार्य केल्यानंतर भारतात परतल्यावर त्या पुन्हा बिहारमध्ये जातात. डॉ. रविकांत यांनी मुंबईत राहून आपल्या मूळ गावात- बिहारमधील ‘मसाढी’मध्ये सेवाभावी तत्त्वावर एक रुग्णालय उभे करायचे ठरवलेले असते. डॉ. रविकांत यांचे हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी घेऊन डॉ. तरू तिथे रुग्णालय उभे करतात. तिथली जातीय व्यवस्था, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, अंधश्रद्धा, भोंदू डॉक्टरांच्या प्रतिक्रिया, राजकारण याबद्दल आलेले त्यांचे अनुभव इतके जळजळीत आहेत, की वाचकांच्या मनातही त्याबद्दल संताप निर्माण व्हावा.
कुपोषणामुळे मरणासन्न अवस्थेतील स्विटीला
डॉ. तरू वाचवतात. मात्र, तिच्या आईला दुसऱ्या प्रसूतीसाठी दवाखान्यात येऊ दिले जात नाही. दीर्घकाळ चाललेली प्रसूती सुक्षेम करण्यासाठी चिमटा लावल्यामुळे बाळाच्या डोक्याला खरचटते. त्यावर डॉक्टरांनी बाळाचे डोके फोडले अशी ओरड गावभर केली जाते. घरातून बाहेर पडायला बंदी, सलवार-कमीज असा सिस्टरचा वेश घालायला बंदी अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतून त्या सर्वसामान्य, अर्धशिक्षित, गरीब मुलींना नìसगचे पाठ देतात. कुपोषित बालकांना सुदृढ बनवण्याचे अभियान, स्तनपान करण्याबाबतची मोहीम त्या यशस्वीपणे चालवतात. गावच्या जमीनदारांच्या पडीक जमिनी एकत्र करून फळफळावळ आणि भाजीपाला पिकवणे सुरू करतात. गर्भवती महिलांचा ओटी भरण्याचा समारंभ करून त्यांना लोह आणि जीवनसत्त्वांची औषधे देतात. या घटनांची वर्णने इतकी प्रत्ययकारी आहेत, की ती वाचताना एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभी राहतात.
या पुस्तकात काही प्रसंग कमालीचे हृदयस्पर्शी आहेत. उदा. कुपोषित आणि उच्च रक्तदाब असलेल्या गर्भवती स्त्रीचे तपासणीसाठी रक्त घेतल्यावर ‘तुम्ही रक्त का घेतले?’ म्हणून भांडून डॉक्टर तरू यांना घरातून हाकलून देण्याचा प्रसंग, गर्भवती स्त्रीचे गर्भाशय बाहेर आल्यावर तिला खूप रक्तस्राव होत असताना औषधे मिळेपर्यंत केवळ हातांनी तासभर ते रोखून धरत तिचा जीव वाचवण्याची कामगिरी, नेपाळमधील परिचारिकांचे स्वत:चे घर नष्ट झालेले असतानाही त्याचे दु:ख न बाळगता रुग्णांना सेवा देणे, अडलेल्या गर्भवती स्त्रीची ‘शस्त्रक्रिया करू नका, बाळ मरू द्या, पुन्हा दुसरे बाळ होईल,’ असे सांगणारा पिता, खायला अन्न नसल्याने शेतातले उंदीर मारून खाणारे मसहूर जातीचे लोक, त्यांची कमालीची कुपोषित मुले, त्यांच्याबरोबर साजरी केलेली होळी असे असंख्य प्रसंग या पुस्तकातल्या घटनांना गतिमानता आणतात आणि त्या हृद्य बनवतात.
वैद्यकीय सेवेवर डॉ. तरू जिंदल यांनी केलेल्या काही टिप्पणी मननीय आहेत. उदा. ‘या रुग्णालयात आलेल्या आया, त्यांची बाळं सारेच अनाथ होते. त्यांची काळजी घ्यायला आणि काही झाल्यास त्याची जबाबदारी घ्यायला कुणीच नव्हतं.’ किंवा ‘तुम्ही एकटे राहून काहीच साध्य करू शकत नाही. तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील त्यांच्यासोबतच तुम्हाला काम करावं लागतं. विरोधाची, शत्रुत्वाची भूमिका घेतली तर काहीच हासील होत नाही..’ आदी अनुभवाचे बोल.
डॉ. तरू यांच्या या प्रवासात त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे चित्रण एवढे हृद्य केले गेले आहे, की त्या आपल्यालाही प्रेरित करतात. उदा. डॉ. नाभोजित रॉय, डॉ. रविकांत, डॉ. ए. डी. तुपकरी, इत्यादी. लेखिकेने हे कार्य एवढय़ा तन्मयतेने केले आहे की काही वाक्ये सुभाषितांसारखी जतन करून ठेवावीत. उच्चशिक्षित डॉक्टर खेडय़ाकडे जात नाहीत, असा ओरडा करणाऱ्या तथाकथित बोलक्या समाजसुधारकांनी हे पुस्तक जरूर वाचावे. डॉ. तरू यांच्या अनुभवकथनातून त्यांना या समस्येची यथोचित कारणे मिळतील. या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे डॉ. तरू यांच्यासारखे कार्य करणारे असंख्य तरुण डॉक्टर्स आज मेळघाट, बिहार, आसाम अशा ठिकाणी कार्य करत आहेत. समाजासाठी काहीएक भरीव कार्य करण्याची सुप्त इच्छा मनात असणाऱ्या तरुण-तरुणींना हे पुस्तक आदर्श वस्तुपाठ ठरावा.
‘हाँ, ये मुमकिन है’ अशा आशावादी शीर्षकापासून शेवटच्या पानापर्यंत हे पुस्तक म्हणजे भारतातील दुर्गम भागातील वैद्यकीय सेवेचा ‘आँखो देखा हाल’ आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे नक्की काय प्रश्न असतात, त्यांचे आरोग्याबाबत काय विचार असतात आणि पारंपरिक गोष्टींचा त्यांच्यावर किती पगडा असतो, हे या पुस्तकाच्या पानापानांतून समजून येते.
सरकार उत्तम योजना आखते, पशांचीही बेगमी करते, उपकरणे-औषधेही देते, पण सरकारी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक कार्याशिवाय ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य ते उपचार मिळणार नाहीत, हे या पुस्तकातून अधोरेखित होते. त्याचबरोबर या देशात कोणतेही सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी डॉ. तरू जिंदल यांच्यासारख्या जिद्दी व्यक्तींचीच नितांत आवश्यकता आहे. अशा ध्येयवादी तरुण-तरुणींना समाजाकडून भक्कम प्रतिसादही मिळण्याची आवश्यकता आहे हेही कळून येते.
रमा हर्डीकर-सखदेव यांनी या पुस्तकाचा अनुवाद इतका उत्तम केला आहे की त्यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही. काही वैद्यकीय शब्द, सरकारी योजना समजण्यासाठी उत्तम तळटीपा प्रकरणांच्या शेवटी दिल्या आहेत, त्या निश्चितच उपयुक्त ठरतात. मात्र, फोटो अधिक चांगल्या स्वरूपात छापले जायला हवे होते.
मराठी भाषेच्या दालनात एका ध्येयवादी डॉक्टर लेखिकेने लिहिलेल्या या हृदयस्पर्शी आत्मानुभवामुळे निश्चितच गौरवास्पद भर पडली आहे. बिहारमधल्या दोन वर्षांच्या कामामुळे डॉ. तरू यांचे आयुष्य तर उजळून निघालेच, पण प्रत्येक भारतीयाने समíपत वृत्तीने निदान वर्षभर जरी सामाजिक काम करायचे ठरवले तर आपला देश खऱ्या अर्थाने सुदृढ, विकसनशील होऊ शकतो. प्रत्येक भारतीयाला खरंखुरं सोनेरी स्वप्न दाखवणारं पुस्तक असेच याचे वर्णन करावे लागेल.
‘हाँ ये मुमकिन है!’ – डॉ. तरू जिंदल,
अनुवाद- रमा हर्डीकर-सखदेव, रोहन प्रकाशन, पृष्ठे- २८६, मूल्य- ३२५ रुपये.
मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review han ye mumkin hai dd70

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares