LGBTQ: 'माझा मुलगा ट्रान्सजेंडर आहे हे कळल्यावर आत्महत्या करायचे विचारही मनात आले…' – BBC

Written by

मायलेक
"तो वयात आला होता, आणि मला सारखं सारखं म्हणायचा – आई मला सायकॅट्रिस्टकडे घेऊन चल. मला मदतीची गरज आहे. मला काही कळायचं नाही."
मी म्हणायचे, "एवढा पुरुषासारखा पुरुष तू, तुला कसला त्रास होतोय? मदतीची गरज तर मला आहे. मी एकटी आहे, मी विधवा आहे. तू खरं म्हणायला पाहिजेस… ममा काळजी करू नको, मी आहे तुला आधाराला."
सुप्रिया गोसावी आपल्या गोरेगावमधल्या राहात्या घरात मला सांगत असतात पण त्यांच्या डोळ्यांत भूतकाळाच्या सावल्या तरंगताना दिसतात.
मुंबईतल्या या चांगल्या भागातल्या लहानशा का होईना पण सुखवस्तू घरात येण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केलाय. आणि त्यांचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा होता नक्कीच.
चाळीस वर्षांच्या असताना सुप्रियांचे पती वारले. पदरात दोन मुलं. एक सोळा वर्षांचा तर एक सहा वर्षांचा.
एकल पालकत्वाचा प्रवास सुरू झाला. घरची ओढाताण व्हायला लागली, असाच काही काळ गेला. आता तरुण मुलगा हाताशी आलाय, आपला त्रास कमी होईल. समाजात एकटी बाई म्हणून जगताना होणारा त्रास आता तरुण मुलाच्या आधाराने कमी होईल असं त्यांना वाटत होतं.
कोणत्याही सामान्य आईसारखी त्यांची मुलाबाबत स्वप्नं होती. त्याने शिकावं, नोकरीधंद्याला लागावं, छानशी मुलगी शोधून लग्न करावं, संसारात पडावं, प्रवाहाला लागावं.
पण त्यांचा मुलगा निशांत त्याचवेळी भलत्याच मानसिक द्वंदातून जात होता. त्याचा त्रास असह्य झाला. एक दिवस तो रस्त्यात बेशुद्ध पडला. सुप्रिया त्याला मुंबईच्याच केईएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या.
तिथे डॉक्टरांच्या लक्षात आलं की याचा त्रास मानसिक आहे. एकदिवस तिथल्या प्रमुखांनी सुप्रियांना बोलवून घेतलं आणि म्हणाल्या, "मॅडम, तुम्हाला आता सत्य स्वीकारावंच लागेल."
सुप्रियांना अजूनही काही कळत नव्हतं. त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून डॉक्टर म्हणाल्या, "मॅडम तुमचा मुलगा ट्रान्स आहे. तो पुरुषाच्या शरीरातली स्त्री आहे. तुम्हाला हे स्वीकारावचं लागेल."
त्या दिवसाची आठवण येऊन सुप्रियांच्या चेहऱ्यावर आजही ताण दिसतो.
"माझ्या पायाखालची जमीनच तेव्हा सरकली," त्या म्हणतात. "मला ट्रान्सचा अर्थही कळत नव्हता. मला फक्त इतकंच कळत होतं, मुलगा-मुलगी. स्त्री-पुरुष," त्या हुंदका दाबतात.
LGBTQ समुदायातल्या लोकांना त्यांच्या घरचे अनेकदा स्वीकारत नाहीत हे आपण अनेकदा ऐकतो, पाहातो. पण जे स्वीकारतात, त्यांचा प्रवास कसा असतो?
आयुष्यभर काही ठराविक मूल्यं आणि संकल्पना मनाशी बाळगल्यानंतर आपल्या मुलांच्या प्रेमाखातर त्यात बदलताना अशा पालकांच्या मनात काय चालू असतं? बीबीसी मराठीची स्टोरी याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतेय.
"मला समजत नव्हतं, ज्याला मुलगा-मुलगा करून आयुष्यभर वाढवलं. त्याची मुलगी ही ओळख कशी स्वीकारावी?"
सुप्रिया सैरभैर झाल्या होत्या. याकाळात त्यांची आपल्या मुलाशी होणारी भांडणं वाढली होती.
"आईने इतकं आयुष्य कठीण केलं होतं ना माझं. रोज भांडण व्हायची. रोज वाद व्हायचे आणि ते वाद माझ्या ट्रान्सजेंडर असण्यावरून व्हायचे," सुप्रियांची ट्रान्सजेंडर मुलगी निष्ठा (पूर्वाश्रमीचा निशांत) सांगते.
निष्ठा यांची आई
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
निष्ठा आणि सुप्रिया दोघींचं मानसिक आरोग्य ठीक नव्हतं. निष्ठाला आपल्या शरीरात, मनात होणारे बदल यांना सामोरं कसं जावं हे कळत नव्हतं, आपली स्वतःची ओळख नक्की काय हे शोधण्यासाठी तिचा संघर्ष चालू होता तर सुप्रियांना प्रश्न होता समाजाला कसं तोंड द्यावं?
आपण कित्येक वर्षं उराशी बाळगलेल्या मुल्यांचं काय करावं हे कळत नव्हतं.
"निष्ठा कधी कधी इतकी हिंसक व्हायची ना, की आम्हाला मारायला उठायची," सुप्रिया सांगतात.
दुसरीकडे सुप्रियांना सतत आपल्या मुलांना सोडून कुठेतरी निघून जावं असे विचार यायचे.
"आत्महत्या करण्याचेही विचार मनात आले," त्या म्हणतात.
अडखळत अडखळत आयुष्य चालू होतं आणि या कुटुंबाचे प्रश्न इतरांसाठी करमणूक बनले होते.
सुप्रियांचं कुटुंब तेव्हा दादरमधल्या एका चाळीत राहायचं. लोक येता जाता त्यांच्या घरात काय चाललं आहे याकडे वाकून पाहायचे.
"आम्ही अशा मानसिक अवस्थेतून जात होतो तर लोकांना मात्र फार उत्सुकता असायची. तेव्हा हा त्याच्या जॉबसाठी संध्याकाळी 7 ला घराबाहेर पडायचा. तुम्हाला खोटं वाटेल चाळीतले सगळे लोक तेव्हा बाहेर येऊन उभे राहायचे. याने आज कोणते कपडे घातलेत, स्त्रीचे की पुरुषाचे? लिपस्टिक लावलीये का? हिल्स घातल्यात का? हे निरखून पाहायचे. मला याचा फार त्रास व्हायचा."
याच भावनेतून सुप्रिया अनेकदा निष्ठाचा पाठलाग करायच्या.
आईने मुलीला लिहिलेलं पत्र
निष्ठा त्या दिवसांची आठवण सांगतात, "ती माझ्या मागे मागे यायची. लोक माझ्याकडे बघून काय प्रतिक्रिया देतात ते पाहायची. अशात कोणत्या पुरुषाने माझ्याकडे बघायचा प्रयत्न केला तर ती डोळे वटारून बघायची. ती मला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होती, तिची तडफड होत होती हे मला कळायचं, पण तिला माझा त्रास दिसत नव्हता."
आपला मुलाची पुरुष हीच ओळख कायम राहावी यासाठी सुप्रियांनी खूप प्रयत्न केले. बाबा-बुवा गाठले.
"कुठेही बाहेर फिरायला गेलं की असं कोणाच्या दर्शनाला जा, कुठे जाऊन पाय धू असं करायची. बाबा लोकांना माझे फोटो पाठवत बसायची, मला इतका राग यायचा ना," निष्ठा पुढे सांगतात.
पण एकदा निष्ठाला या गोष्टीचा त्रास झाल्यानंतर सुप्रियांनी हे प्रकार बंद केले.
"एकदा एका बाबाने मला फळ दिलं आणि सांगितलं की हे फळ तुमच्या मुलाला खायला द्या. हे संपूर्ण फळ त्यानेच खाल्लं पाहिजे ते पहा. मी धाकट्या मुलाला म्हटलं तू या फळाला हात लावायचा नाही. निशांत काम करत बसला होता, त्याच्यासमोर मी ते फळ कापून ठेवलं. ते काम करता करता ते संपूर्ण खाल्लं. त्याच्या लक्षातही आलं नाही.
"पण त्या रात्री त्याला खूप त्रास व्हायला लागला. प्रचंड पोट दुखायला लागलं. कोणाला काहीच सुधरत नव्हतं. पण माझ्या मनाला वाटलं, त्या फळामुळेच हे होतंय आणि मी ठरवलं… मुलगा असो वा मुलगी मी त्याला स्वीकारणार. पण असले अघोरी प्रकार करून माझ्या मुलाच्या जीवाशी खेळ करणार नाही, मग कोणी काहीही म्हणो."
मुलगा ट्रान्सजेंडर असल्यामुळे सुप्रियांना नाही नाही ते टोमणेही ऐकून घ्यावे लागले. त्यांच्या आईपणावर शंका घेतल्या गेल्या. वडील तर गेले, मुलाला नीट वाढवता आलं नाही म्हणून मुलगा असा झाला हेही ऐकावं लागलं काहींनी तर इतकंही म्हटलं की आईचीच फुस आहे त्याला.
संताप संताप होईल असं रोज काहीबाही त्यांच्या कानावर यायचं. या काळात त्यांचे नातेवाईकही तुटले. पण आपल्या ट्रान्सजेंडर मुलाला घराबाहेर काढण्याचा विचारही त्यांचा मनात आला नाही.
"मुलाला आई नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार?" त्या डोळ्यातलं पाणी पुसत विचारतात. "संसाराचा एक हात आधीच तुटून गेलेला. दोन मुलांशिवाय कोण होतं मला?"
मायलेक
सुप्रियांनी ठरवलं, नातेवाईक काही का म्हणेना, लोक काही का म्हणेना… आपली मुलं आणि आपण इतकंच विश्व ठेवायचं आणि हिंमत हरायची नाही.
त्यांच्यापुढे सगळ्यांत मोठं आव्हान होतं ते दादरमधल्या चाळीतून दुसरीकडे राहायला जायचं. तिथल्या लोकांच्या मानसिकतेमुळे या कुटुंबाला प्रचंड त्रास होत होता.
पण पैशाची गणितं जुळत नव्हती.
"कुठून बळ आलं मला काय माहीत. कदाचित निष्ठाच्या पपांनी दिलेला संकेत असेल, पण हिंमत केली, उडी टाकली आणि या घरात आलो. इथे आल्यानंतर एक वेगळीच मानसिक शांती मिळाली."
आयुष्य थोडं स्थिरावलं होतं, पण अधून मधून पाण्याच्या डोहात तरंग उमटावेत तशा जुने मुद्दे उकरून निघायचे आणि वाद व्हायचे.
अशात निष्ठाला एका संस्थेविषयी कळलं. 'स्वीकार – द रेनबो पॅरेंट्स.'
ही संस्था ज्या पालकांची मुलं LGBTQ समुदायातली आहेत आणि पालकांना त्यांची नवी ओळख स्वीकारण्यासाठी त्रास होतोय अशा पालकांना आधार देण्याचं काम करते.
यातले सगळे वरिष्ठ सदस्य, काऊन्सलेर्स आणि पदाधिकारी स्वतः LGBTQ पाल्यांचे पालक आहे आणि ते स्वतः कमी अधिक प्रमाणात या अनुभवातून गेले असल्यामुळे इतर पालकांना चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.
निष्ठा कुटुंबीयांसमवेत
आपल्या मुलांची ओळख नाकारणाऱ्या पालकांचे इथे काऊन्सिलिंग केलं जातं.
निष्ठाने जबरदस्ती आपल्या आईला या संस्थेच्या काही मिटिंग्सला पाठवलं. सुप्रिया तयार नव्हत्या तरीही.
"ती मिटिंगला जाऊन आल्यानंतर मी विचारलं काय झालं तर तिने काहीच सांगितलं नाही. अजून एक-दोन मिटिंग्सला ती गेली पण तरी तिचा काही प्रतिसाद नव्हता. मग मी फेसबुकवर जाऊन या मीटिंग्सचे फोटो पाहिले तर दिसलं प्रत्येक फोटोत माझी आई रडत होती."
"एक दिवस ती आली आणि मला सॉरी म्हणाली. मला समजण्यात तिने चूक केली असं तिला म्हणायचं असेल कदाचित. तेव्हा मला इतकं बरं वाटलं ना. याआधी आईने माझी नवी ओळख स्वीकारली असली तरी मला हे माहिती होतं की तिने मनापासून हे स्वीकारलेलं नाही, ती तडजोड करतेय. पण आईने खुल्या दिलाने मला आपलसं केल्यानंतर काय वाटलं हे मी शब्दात सांगू शकत नाही," निष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं असतं.
आई आणि आपला भाऊ पाठीशी आहे म्हटल्यावर निष्ठाला आता जग जिंकण्याचा आत्मविश्वास आलेला आहे. एक सोळा-सतरा वर्षांच्या गोंधळलेल्या, बावरलेल्या मुलाचं रुपांतर आता एका आत्मविश्वासी स्त्रीत झालंय.
सुप्रियांच्या घरात आता सप्तरंग विखुरलेले दिसतात. ठिकठिकाणी घरात मुलगी वावरत असल्याच्या खुणा दिसतात. कुठे निष्ठाचे कानातले सजवलेले दिसतात, कुठे तिची ओढणी घरात रंग भरत असते.
निष्ठाला आपल्या कामाबद्दल, आणि LGBTQ समुदायासाठी केलेल्या कामाबद्दल अनेक सन्मान मिळालेत. पूर्वी हिणकस नजरेने पाहणारे लोक आता तिला रस्त्यात थांबून तिचं कौतुक विचारतात.
एका आईसाठी हे सुखावणार असतं.
अजूनही सगळेच त्रास, प्रश्न संपले नाहीये, पण त्यांना धीराने तोंड द्यायची हिंमत जरूर आलीये.
"तिला मी म्हटलंय, तुला एखादा मुलगा आवडला ना बिनधास्त लग्न कर. आईची काळजी करू नकोस. तुला आता तुझं आयुष्य सुंदर बनवायचं आहे," सुप्रिया म्हणतात.
मुलगा असो, मुलगी असो की नव्याने आपल्या अपत्याची समोर आलेली ओळख असो… कोणत्याही आईला आपल्या मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न पहावीशी वाटतातच की!
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares