बोलून बातमी शोधा
नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी ः राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात युजीसी-नेट, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यासाठीची अंतिम तारीख ३० मे आहे. यापूर्वी २० मे ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या परीक्षांसाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. यूजीसी- नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेतली जाते. देशातली विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी ही पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. याकरिता अर्ज करण्याचे आवाहन दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे केले आहे.
——————
पेट्रोल-डिझेलकरात ५० टक्के कपात करा
रत्नागिरी ः जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २. ०८ रुपये व १. ४४ रुपये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आहे; मात्र राज्य शासनाने जनतेला उगाच वेठीस धरले आहे. राज्याच्या करामध्ये ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी केली आहे.
———-
रत्नागिरीत भाज्या कडाडल्या
रत्नागिरी ः शहरात भाजीपाल्याची आवक सध्या कमी प्रमाणात होत असून टोमॅटोसह सर्व भाज्यांनी शंभरी गाठली आहे. बहुतांशी भाज्या ८० रुपये किलो दराने विक्री केल्या जात आहेत. अवकाळी पाऊस आणि कमी आवक होत असल्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे भाजी व्यापाऱ्यांनी सांगितले. शहरात शनिवारी बाजाराच्या दिवशीसुद्धा बाजारात गर्दी फारशी झाली नाही. भाज्यांचे चढे दर यामुळे ग्राहकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. टॉमेटोचा दर प्रति किलो १०० ते १२० झाला आहे. वांगी ६० रुपये, शिमला मिरची, भेंडी ८० रुपये, गवार ६० रुपये, कोबी, गाजर ५० रुपये, कारले ६० रु., फ्लॉवर ८० रु., पडवळ ६० रु., भोपळा ४० रु. या दराने विक्री केली जात आहे. अति उष्णतेमुळेही भाज्या खराब होत आहेत. त्यामुळे थोड्या खराब झालेल्या भाज्या १० ते ३० रुपयांचा वाटा लावून विक्री केल्या जात आहेत.
——–
शेतकरी संघटना स्थापन होणार
दापोली ः कोकणातील वन्यजीवांच्या त्रासला कंटाळून शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना स्थापन करायचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेची पहिली सभा २५ मे रोजी जालगाव ग्रामपंचायतीत दुपारी २ वाजता होणार आहे. संघटित होऊन संघर्ष करणारे ज्याप्रमाणे उत्तर भारतात उपद्रवी नीलगाय आंदोलन झाले. तसाच निर्णय माकड आणि रानडुक्कर यांच्याबाबतीत होत नाही, तोपर्यंत आंदोलन शेतकरीवर्ग करणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून निराश होऊन संघटना स्थापन केली जात आहे.
————-
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news