इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
24155
इचलकरंजी ः पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.
‘स्वाभीमानी’चे ठिय्या आंदोलन
इचलकरंजी ः रस्त्याच्या कामांबाबत निवेदन देण्यास गेलेल्या नागरिकांना मुख्याधिकाऱ्यांनी बाहेर काढले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केले. शहरातील देवमोरे पाणंद, दिवटे पाणंद, बिरनाळे पाणंद, गावभाग परिसरातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार या कामांचा पाठपुरावा करून ही पालिकेकडून याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शिष्टमंडळ मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यास गेले होते. या वेळी मुख्याधिकारी ठेंगल यांनी शिष्टमंडळास बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी ठेंगल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यानंतर मुख्याधिकारी ठेंगल यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.
——————
पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाची मागणी
इचलकरंजी ः शहरातील गॅस कनेक्शनसाठी खोदण्यात आल्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवर मान्सूनपूर्वी डांबरी पॅचवर्क व सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन डॉ. प्रदीप ठेंगल यांना रवी रजपुते सोशल फौंडेशनतर्फे देण्यात आले. शहरात गॅस कानेक्शनसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदले आहेत. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागत आहे. विशेषत: कामगार चाळ व मुख्याधिकारी यांच्या बंगल्या समोरील रस्ता खराब झाला आहे. याबाबत गॅस कंपनी मक्तेदार यांना कल्पना दिली आहे. मात्र त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पावसाळ्या पूर्वी रस्ते दुरुस्ती करावेत, अशी मागणीही रवी रजपुते यांनी केली आहे. या वेळी माजी नगरसेवक अमरजीत जाधव, युवराज माळी, सुभाष मालपाणी, विजय रवंदे आदी उपस्थित होते.
———————–
महाआरोग्य शिबीराचे आयोजन
इचलकरंजी ः शिवाई सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी हेल्थ प्लस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि नारायणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यातर्फे महाआरोग्य तापसणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मूत्रविकार, शुगर तपासणी, हृदयविकार तपासणी यासह जनरल तपासणी करण्यात येणार आहे. शिबीर श्री सिद्धिविनायक मंडई, शिक्षक सोसायटी, सांगली रोड यथे २८ व २९ मे रोजी होणार आहे. शहर परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares