पाठिंबा: पुणतांबा येथून सुरू होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला भाजपचे समर्थन राहणार; खासदार डॉ. सुजय विखे यांची माह… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
पुणतांबा येथून १ जूनपासून सुरू होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला भाजपचे समर्थन राहणार आहे. पुणतांबा येथून सुरू झालेल्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी आम्ही काँग्रेसमध्ये होतो. शिवसेनेकडे सत्ता होती. आता आम्ही भाजपमध्ये आहोत. शेतकऱ्यांना या सरकारकडून आशा, अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे वीज, पाणी या प्रश्नावर आम्ही संघर्ष करत आहोत, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे म्हणाले, दोन महिन्यात दूरचित्रवाहिनीवर वेगळ्या विषयावर चर्चा सुरू होती. यात शेतकऱ्यांचा साधा उल्लेख देखील नव्हता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भूमिका घेत आंदोलने सुरू केली आहेत. ओबीसी आरक्षण, पाणी प्रश्न, वीज प्रश्न यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आंदोलने केली. शेतकरी आंदोलन हा कुठल्या पक्षाचा विषय नाही किंवा त्याकडे राजकीय दृष्टीने पाहणे ही योग्य नाही, असे ते म्हणाले. पुणतांबा येथून सुरू होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पक्षाचा समर्थन राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, अतिरिक्त उसाचा प्रश्न काही ठराविक भागातच आहे. या महिना अखेरपर्यंत हा प्रश्न राहणार नाही. अतिरिक्त कामगार लावून त्या-त्या कारखाना क्षेत्रांतील लोकांनी उसाचा प्रश्न मार्गी लावावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आगामी निवडणुकीत चांगले परिणाम दिसतील
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यामुळे जिल्ह्याला फायदाच होणार आहे. नगर हा मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात वेगवेगळे प्रश्न आहेत. निश्चितपणे त्यांच्या प्रभारी पदामुळे जिल्ह्यात भाजप निवडणुकींमधील चांगले परिणाम दिसून येतील, असे डॉ. विखे यांनी सांगितले.
जिल्हा विकास आघाडी भाजप पुरस्कृत राहणार
जिल्हा विकास आघाडी हा विषय काही नाही. पारनेरची जबाबदारी माझ्याकडे आल्याने तेथे समविचारी पक्षांना घेऊन त्या तालुक्यापुरती ही आघाडी करण्याचा हा विषय होता. ज्या भागात भाजपचे संघटन मजबूत आहे, तिथे अशी आघाडीची गरज नाही. कुठली आघाडी ही भाजप पुरस्कृत राहणार आहे. पक्षविरोधी भूमिका नाही, असे ते म्हणाले.
खासदारकीला तीन वर्षे पूर्ण
आज माझ्या खासदारकीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तीन वर्षांतील दोन वर्ष हे कोविडमध्येच गेली. वर्षभरच काम करता आले. माझ्या कामाचा लेखाजोखा माध्यमांसमोर मांडायचा आहे तो लवकरच मी मांडेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. शंभर कोटींच्या घरकुलाबाबतही मी बोलणार आहे, असेही खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares