पाणीवाटपाचा गुनाटमधील शेतकऱ्यांना फटका पुरेशा पाण्याअभावी परिसरातील तळी, तलाव कोरडे – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
गुनाट, ता. २४ : चासकमानच्या पाणीवाटपाचा फटका पुन्हा एकदा गुनाट (ता. शिरूर) व परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. केवळ एक ते दीड दिवसांचेच आवर्तन या भागातील शेतकऱ्यांना मिळाल्याने पुरेशा पाण्याअभावी तळी, तलाव कोरडे ठाकच राहिले आहेत. परिणामी शेतकऱ्यांची पाण्याची समस्या आहे तशीच राहिल्याने या दीड दिवसांच्या आवर्तनाचा नेमका फायदा काय? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

चासकमान धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही व या भागात शेवटच्या टप्प्यात पाणी येऊनही सद्यःस्थितीत चासकमानचे कर्मचारी ‘पाणीपट्टी भरा, तरच पाणी मिळेल’ असा आदेश शेतकऱ्यांना देत आहेत. भूजलपातळी घटल्याने पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार आहेत. पाणीपट्टीचे पैसे घ्या, पण पाणी द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी असतानाही हे कर्मचारी पाणी देण्यास टाळाटाळ करत असून, टेलच्या भागातील आवर्तन उरकते घेण्यावर भर देत आहेत. चासकमानच्या या अशा आडमुठ्या भूमिकेमुळे तळी, तलाव १० ते २० टक्केच भरले आहेत. यावर चासकमानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कसलेही नियोजन नसल्याने निर्माण झालेला पाणीवाटपाचा घोळ मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे. आवर्तन उरकते का घेतले यावर चासकमानच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कसलेही ठोस उत्तर दिले नाही.
सध्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. चासकमानचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपट्टीही भरली आहे. मात्र पुरेसे पाणी न मिळाल्याने पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
– गणेश कोळपे, सरपंच, गुनाट (ता. शिरूर)
पोटचाऱ्यांना पाणी आले, मात्र पाण्याचा दाबच कमी असल्याने पाणी कधी आले, कधी गेले समजलेच नाही. दीड दिवसाच्या आवर्तनाचा शेतीच्या पिकांना नेमका कसा फायदा होणार हा संशोधनाचा विषय आहे. शेतातील पिके वाचवण्यासाठी तरी किमान पुन्हा या भागात पाणीवाटप करून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे.
– पांडुरंग गव्हाणे, शेतकरी, गुनाट (ता. शिरूर)
केवळ दुसरेच आवर्तन, तरी नियोजनाचा फज्जा
सद्यःस्थितीत आलेले आवर्तन हे केवळ दुसरेच आहे. असे असतानाही टेलच्या बाबतीत आवर्तन आवरते घेण्याचे धोरण का राबवले आहे, यावर चिंतन होणे गरजेचे आहे. धरणात पाणी असतानाही, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशीच अवस्था या आवर्तनाबाबत शेतकऱ्यांची झाल्याचे बोलले जात आहे.

66285
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares