बोलून बातमी शोधा
कुरकुंभ, ता. २४ : राज्यातील अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर भाजप किसान मोर्चाने साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यावर राज्यात २८ लाख टन ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. सर्व कारखान्यांनी प्रत्येक दिवशी दीड लाख टन उसाचे गाळप झाल्यास सर्व अतिरिक्त ऊस संपायला हवा होता. मात्र वीस दिवसानंतर राज्य सरकार १७ लाख टन ऊस शिल्लक असल्याचे सांगत आहे. हे शिल्लक उसाचे गौडबंगाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.
काळे म्हणाले की, किसान मोर्चाने ५ मे २०२२ रोजी साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले. आंदोलनस्थळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भेट देऊन अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी किसान मोर्चाने ५० ते ५५ लाख मेट्रिक टन ऊस राज्यात शिल्लक असल्याचे सांगितले. मात्र सहकारमंत्री व आयुक्तांनी राज्यात २८ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याची माहिती दिली होती. ५ मे पासून आज अखेरपर्यंत प्रत्येकी दिवशी सरासरी दीड लाख टनाचे गाळप झाले असतेतरी राज्यातील संपूर्ण अतिरिक्त उसाचे गाळप व्हायला पाहिजे होते. मात्र अजून १७ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे स्पष्ट केल्याने अतिरिक्त उसाचे काहीतरी गौडबंगाल असल्याचे दिसून येत आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व साखर उद्योगातील तज्ज्ञ म्हणून अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी.
गाळप होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन बीड जिल्ह्यातील हिंगणगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव जाधव यांनी दोन एकर ऊस पेटून देऊन उसाच्या शेतामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे काळे म्हणाले.
सरकारने अनुदान द्यावे
गाळपाविना शिल्लक असलेल्या उसाला हेक्टरी ७५ हजार रुपये तर ऊस पेटवून देऊन तोड करून गाळप केलेल्या उसाला हेक्टरी २५ हजार अनुदान सरकारने द्यावे. तसेच अतिरिक्त उसाच्या वाहतुकीसाठी प्रती टन व प्रती किलोमीटर ५ रुपये अनुदान सरकारने शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा करावे, अशी मागणी वासुदेव काळे यांनी केली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news