पुणे –जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि अन्य रस्त्यांच्या बाजूला शेतकरी शेतमाल विकतात. त्यामुळे होणारी गर्दी आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांच्या शेतमालाची जागेवरच विक्री व्हावी आणि रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे भाजीपाला घेता यावा, यासाठी रस्त्यापासून जवळच आठवडे बाजारात शेतमाल विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे.
राष्ट्रीय व राज्य मार्गावरून जाणारे वाहनचालक रस्त्याच्या कडेला भाजीपाला घेऊन बसलेल्या शेतकऱ्यांकडून भाजी घेण्यासाठी थांबतात. पूर्वी ही संख्या खूप कमी होती, मात्र शेतात ताजा भाजीपाला मिळतोय म्हणून वाहनचालकांकडून धोकादायक पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी करून भाजी खरेदी केली जाते. आता तर रस्त्यावरच आठवडे बाजार भरत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी थांबलेल्या प्रवाशांची वाहने रस्त्याच्या बाजूलाच व्यवस्थित उभी केली जात नाही. परिणामी वाहतूक कोंडी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
त्यावर ठोस पर्याय शोधण्यासाठी पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या आठवडे बाजाराच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यांमधील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला अशाप्रकारे आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाला पाठवला आहे. ग्रामीण भागातील विविध महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा कृषी विभागाकडून या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे.
रस्त्याच्या बाजूला थांबून शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे थेट उपलब्ध होतात. हे चांगले असले तरी, विक्रीदरम्यान अपघाताचा धोका संभवतो. म्हणून आम्ही सर्वांनी चर्चा करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बाजूलाच आठवडे बाजार भरविण्याची संकल्पना पुढे आली.
– निर्मला पानसरे, अध्यक्षा जिल्हा परिषद, पुणे
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला आठवडे बाजार सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी जागांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar
Copyright © 2022 Dainik Prabhat
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.