Lal Bihari Story Uttar Pradesh: लाल बिहारीचा लढा स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा

एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्थानिक महसूल अधिकाऱ्याला भेटते. मात्र, तो अधिकारी त्या वक्तीला तू मृत असल्याचे सांगतो….तिथून सुरु होतो तो त्या व्यक्तीचा स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठीचा लढा….(Story of Lal Bihar the person declared dead though alive)
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची भूमीका असलेला 'जाॅली एलएलबी २' चित्रपटात एक प्रसंग आहे. त्यातला जाॅली हा वकिल आपल्या अशिलाला जिवंत सिद्ध करण्यासाठी त्याला भर न्यायालयात न्यायाधीशाला (Judge) उलट सुलट बोलायला सांगतो. न्यायाधीश चिडतात आणि त्या व्यक्तीला शिक्षा सुनावतात. शिक्षेच्या निकालावर त्या व्यक्तीचे नांव येते आणि ती व्यक्ती जिवंत असल्याचे सिद्ध होते.
अशी घटना प्रत्यक्षात घडली होती. १९७६ मध्ये. उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) आझमगढ या गावचा शेतकरी (Farmer) लाल बिहारी. आपण हातमाग व्यवसायात उतरावं असं लाल बिहारीला वाटतं आणि मग तो कर्ज (Loan) मिळवायच्या मागे लागतो. मात्र, संबंधित अधिकारी त्याला कर्ज नाकारतात. तुझा एक वर्षापूर्वीच मृत्यू झालाय, त्यामुळे तुला कर्ज देता नाही येणार…हे अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून लाल बिहारीला वेड लागयाचेच बाकी राहते.

आपण मेलेलो नसून जिवंत आहोत हे या लाल बिहारीने त्या अधिकाऱ्याला विनवण्या करुन सांगितले. मात्र, संबंधित अधिकारी लाल बिहारीला त्याचा मयत दाखला दाखवत राहिले. बिचाऱ्या लाल बिहारीचे म्हणणे ऐकून घ्यायलाच कुणी ऐकत नव्हते. त्याच्या गावचे लोकही लाल बिहारीला मदत करायची सोडून त्याची थट्टा उडवत राहिले.
लाल बिहारीची स्वतःच्या मालकीची जमीन आझमगढमध्ये होती. त्याच्या काकांची आणि पुतण्यांची नजर या जमीनीवर पडली आणि त्यांनी ती हडपण्याचा डाव रचला. या सर्वांनी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरले आणि लाल बिहारी मरण पावल्याची नोंद करुन घेतली आणि लाल बिहारीची सर्व मालमत्ता स्वतःच्या नांवावर करुन घेतली.

आता लाल बिहारीने स्वतःला जिवंत सिद्ध करण्याचा विडा उचलला. त्याने विविध सरकारी कार्यालयांची दारे ठोठावली. पण लाल बिहारी जिवंत असल्याचा दाखला द्यायला कुणीच तयार नव्हतं. दुसरीकडे आपल्या चुलत्यांकडून आपलं काही बरं वाईट केलं जाईल, याचीही सतत भीति लाल बिहारीला होती. पण तो जिद्दीला पेटला होता.

आधी लाल बिहारीने आपले नांव बदलले. 'लाल बिहारी मृतक' असे नांव त्याने नोंदवून घेतले. त्याचीही थट्टा झाली. आपल्या पत्नीला विधवांसाठीचे पेन्शन मिळावे असा अर्ज त्याने महसूल कचेरीत केला. आपण जिवंत असल्याने पत्नीचा अर्ज फेटाळला जाईल आणि त्यातून आपण जिवंत असल्याचेही सिद्ध होईल, असा भाबडा विचार लाल बिहारीने केला. पत्नीचा अर्ज फेटाळला गेलाही. पण तो वेगळ्याच कारणासाठी. लाल बिहारीच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली.
आपण जिवंत 'होत' नाही हे पाहून आता लाल बिहारी आक्रमक व्हायला लागला होता. ज्या चुलत्याने जमीनीसाठी आपल्याला मृत घोषित केले त्याच्या लहान मुलाचे, बहुरामचे अपहरण लाल बिहारीने केले. पोलिसांनी आपल्याला पकडावे आणि दफ्तरी आपले नाव नोंदवले जावे, असा लाल बिहारीचा हेतू होता. पण त्याच्या चुलत्याने पोलिसांत तक्रारच दिली नाही. वाट पाहून कंटाळलेल्या लाल बिहारीने बहुरामला पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले.

मग लाल बिहारीने आणखी एक प्रयत्न केला. त्याने एका पोलिस अधिकाऱ्याला लाच दिली व स्वतःवर दंगल घडवून आणण्याचा गुन्हा नोंदवायला सांगितले. या अधिकाऱ्याच्या लक्षात लाल बिहारीचा हेतू आल्यानं त्यानं लाल बिहारीवर गुन्हा दाखल करण्यास नकार दर्शवला.

एव्हाना लाल बिहारीबाबत थोडी चर्चा व्हायला लागली होती. उत्तर प्रदेशच्या एका आमदाराने विधानसभा अधिवेशनात शून्य प्रहरात लाल बिहारीचा मुद्दा उपस्थित केला. ही गोष्ट लाल बिहारीला समजल्यानंतर त्याने लखनौ विधानसभा भवनासमोर आंदोलन केले. तेवढ्यानेही भागत नाही हे पाहून त्याने अधिवेशनाचा प्रेक्षक गॅलरीचा पास मिळवला. अधिवेशन सुरु असताना अचानक उभा राहून त्याने 'मुझे जिंदा करो' अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या. तिथेही गुन्हा दाखल होईल अशी त्याची अपेक्षा होती. पण तेही घडले नाही. विधानसभेच्या मार्शल्सनी त्याला धक्के मारुन विधान भवनाच्या बाहेर हाकलून दिले.
कंटाळलेल्या लाल बिहारीने आपली उरली सुरुली मालमत्ता विकली आणि चक्क दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. ही युक्ती मात्र काही प्रमाणात उपयोगी पडली. काही माध्यमांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि या वृत्तपत्रांनी लाल बिहारीच्या कहाण्या प्रसिद्ध केल्या.

आपल्या सारखेच इतर काहींच्या बाबतही झाले असेल हे जाणून लाल बिहारीने 'मृतक संघ' नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेचीही चर्चा वृत्तपत्रांतून झाली. असे प्रकार करणारे अनेक अधिकारी त्यामुळे गोत्यात आले.
लाल बिहारीला न्याय मिळायला १९८४ हे वर्ष उजाडावं लागलं. त्या वर्षी तहसीलदाराने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि लाल बिहारीचा 'पुनर्जन्म' झाला. लाल बिहारीने त्यानंतरही आपल्या संघटनेचे काम सुरु ठेवले. आजही हे काम सुरु आहे. या संघटनेचे सुमारे २० हजार सदस्य आहेत. काही जणांना पुन्हा जिवंत करण्यात या संघटनेला यशही मिळालं आहे.

लाल बिहारीची ही सुरस कथा परदेशी माध्यमांनाही नवलाची वाटली नसती तरच नवल होतं. प्रसिद्ध 'टाईम' या नियतकालिकाने या प्रकरणावर एक मोठी स्टोरी प्रसिद्ध केली. त्यात जमीनी हडपण्यासाठी उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये काय केले जाते याचाही लेखाजोखा मांडण्यात आला होता.

२०२१ मध्ये सलमान खान प्राॅडक्शनने लाल बिहारीच्या या सत्यकथेवर 'कागझ' नांवाचा चित्रपट बनवला. सतिश कौशिक यांनी या चित्रपटात भूमीका केली होती आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. त्यात अभिनेता पंकज त्रिपाठीने लाल बिहारीची भूमीका केली आहे. आजही एका ओटीटी प्लॅटफाॅर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares