खरीप हंगामासाठी शेत शिवारात मशागतीची लगबग – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
टाकळी हाजी, ता. २६ ः शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात शेतकऱ्यांची आता खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या शेत शिवारात सर्वत्र मशागतीची लगबग सुरू आहे. नांगरणी, कांकरणी, पाळी देणे, शेणखत टाकणे, बांधबदिस्तीची कामे, याचबरोबर पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे याची चाचपणी शेतकरी बाजारात करू लागला आहे.
एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. तर दुसरीकडे लग्नसमारंभाचा धडाका सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. लग्नसमारंभाला हजेरी लावून शेतकरी लगेच शेताकडे धाव घेताना दिसत आहे. बहुतांश शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरला प्राधान्य देत आहेत. अनेकांकडे शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडी नाही. त्यातच पशुसंगोपन करणे, त्यांच्या चारा पाण्याची सतत भेडसावणार समस्या यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनाची संख्याही कमी केलेली आहे. त्यामुळे शेतीची सर्व कामे यांत्रिक पद्धतीने करावी लागत आहे. मशागतीवेळी शेतकऱ्याला शेतीकामासाठी वेळेत सालगडी, महिला मजूर मिळत नसल्याने टंचाई जाणवत आहे. याशिवाय खरिपासाठी औषधांची तरतूद करताना बियाणे, खतांच्या खर्चाचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी उसनवार करावी लागत असल्याने बॅंकांकडून वेळेत पीककर्ज वाटप होणे आवश्यक आहे.
ऐन हंगामात साठेबाजी होत असल्याने शेतकऱ्यांना भरमसाट किमतीत बियाणे, खते, कीटकनाशके विकत घ्यावी लागतात. कधी आवश्यक असलेली खते सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यात बोगस बियाण्यांची भर पडते. त्यामुळे शेतकरी या खरीप हंगामासाठी आवश्यक त्या प्रकारची बियाणे, कीटकनाशके, खते आदीच्या नियोजनात आत्तापासून व्यस्त दिसून येत आहे.
शेत शिवारात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. शेती आता पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा वेळेवर व चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल.
-बाबूराव दळवी, शेतकरी, कान्हूर मेसाई (ता. शिरूर)
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares