निवडणुकीच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश; शिवसंपर्क अभियानही सुरू – MSN

Written by

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यामुळे पालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक अधांतरी असताना शिवसेनेने निवडणूक सज्जतेवर भर दिला आह़े  या वेळापत्रकाची वाट न पाहता निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत़
शिवसेना आता मैदानात उतरत असल्याची घोषणा जाहीर सभेतून केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला गती दिली़  महाविकास आघाडी सरकारची विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यातूनच पक्ष संघटना बळकट करण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे.
आजारपणामुळे उद्धव ठाकरे आता घरातच असतात, अशी चर्चा घडवत त्यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या आक्रमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची खेळी भाजपने खेळली होती. शिवसेनेच्या जिल्ह्याजिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचे व शिवसैनिकांचे मनोबल खच्ची करण्याची रणनीतीही त्यात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्याने आणि शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांमुळे शिवसैनिकांमध्येही अस्वस्थता होती. त्यामुळेच शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात जाहीर सभेद्वारे ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत शिवसेना आक्रमक पवित्रा घेत असल्याचा संदेश दिला. त्याआधी खासदारांची व पक्ष प्रवक्त्यांची बैठक घेत स्थानिक विकास कामांना महत्त्व देताना विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा आदेश त्यांनी दिला होता.
आता शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची बैठकही घेतली. जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन तेथील पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घ्या, प्रशासनाशी, नेत्यांशी समन्वय साधून त्यांना गती द्या. लोकांच्या समस्या सरकारच्या माध्यमातून कशा सोडवता येतील, यासाठी पाठपुरावा करा, शिवसंपर्क अभियानातून आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, निवडणुका कधी होणार याची चिंता न करता आता थेट तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला.
महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करा, असा संदेशही त्यांनी दिला. एकापाठोपाठ एक बैठका घेत संघटनात्मक कामांमध्ये व निवडणुकीच्या तयारीत लक्ष घालत असल्याचा आणि युद्धपातळीवर निवडणूक तयारी सुरू केल्याचा अप्रत्यक्ष संदेश यातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला जात आहे.
महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. अशा परिस्थितीतही राज्यात उद्योग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण तरुणांना रोजगार मिळवून देत आहोत. हृदयात राम आणि हाताला काम देणारे हे आपले हिंदूत्व आहे. ही आपली हिंदूत्वाची व्याख्या जनतेपर्यंत पोहोचायलाच हवी, शिवसेना जे करेल ते आपल्या हिताचेच असेल हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना संदेश
– राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळाली आहे.
– जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. अशा ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसेल त्यांना ते मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करा.
– सरकारने जी विकासकामे केली आहेत ती कामे लोकांपर्यंत पोहोचवा. ज्या योजना हाती घेतल्या आहेत, त्यांची माहिती लोकांना द्या, त्या योजनांचा लाभ या जनतेला करून देणे ही आपली जबाबदारी आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशात दोन आठवडय़ांत प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होत़े त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभागांची रचना, आरक्षण व अन्य सारी प्रक्रिया ही पूर्ण होण्यास जून महिना उजाडेल. त्यानंतर निवडणुका घ्यायच्या झाल्यास पाऊस सुरू होईल. यामुळे निवडणुका ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी, अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगाने मांडली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून ऑक्टोबर-नोव्हेंबपर्यंत निवडणुका होऊ नयेत, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares