कोल्हापूर : महापूर मुक्तीसाठी एकत्रित लढा उभारू – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नृसिंहवाडी : महापूर मुक्तीसाठी लोकचळवळ उभारून याद्वारे शासनावर दबावगट निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रश्न व उपाययोजनांचा सर्वंकष अभ्यास करून त्याचा अहवाल बनविणे गरजेचे आहे. महापुराच्या भीतीखाली असलेल्या नदीकाठच्या गावांना भयमुक्त करणे आवश्यक असून, यासाठी लोकांच्या साथीने महापूर मुक्तीसाठी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार ‘सकाळ’च्या पुढाकाराने आज झालेल्या बैठकीत करण्यात आला.
महापुराच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे, याची चर्चा करण्यासाठी आज येथे पूरबाधित गावांतील सरपंच, नगराध्यक्ष, तसेच या प्रश्नांमध्ये अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. या वेळी कोल्हापूर व सांगली येथील अनेकांनी आपली मते मांडली. दरवर्षी पावसाळा सुरू झाला, की नदीकाठच्या गावांमध्ये महापुराची धडकी भरते. महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात गुंतते. मात्र, महापूर येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या जात नसल्याची खंत या बैठकीत अनेकांनी बोलून दाखवली.
‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांतील महापुराचे स्वरूप बदलते आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ लोकहितासाठी हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आधी गावात पाणी शिरते, मग नदीला महापूर येत असल्याच्या महत्त्वाच्या मुद्यावर नदीमार्गातील अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करणे ही आवश्यक आहे. महापुराला अनेक कारणे असून, या कारणांचा शोध घेत लोकचळवळीतूनच हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे.’’ या मोहिमेला समाजातून पाठबळाची अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
पर्यावरणाचे अभ्यासक उदय गायकवाड यांनी महापूर सोसणाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत याप्रश्नी सर्वसमावेशक लढा उभारत पुलांचा भराव, पावसाचा अंदाज आणि महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील पाणी विसर्ग यातील समन्वय यावर प्रकाश टाकून विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.
‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, नृसिंहवाडीचे माजी सरपंच अभिजित जगदाळे, उपसरपंच रमेश मोरे, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे, पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिव आंबी, रुईचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुभाष चौगुले, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी प्रदीप वायचळ, कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विनोद पाटील, माजी नगरसेवक संजय जाधव, कौशिक मराठे यांच्यासह अनेकांनी महापूर, यामागील विविध कारणे, उपाययोजना, अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा, महाराष्ट्र-कर्नाटक पाटबंधारे विभागातील समन्वयाचा अभाव यावर प्रकाशझोत टाकला.
बैठकीस ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, वितरण व्यवस्थापक महेश डाकरे, धरणगुत्तीचे माजी सरपंच, दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, अशोक टाकवडे, सैनिक टाकळीच्या सरपंच हर्षदा पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, नगरसेवक डॉ. अरविंद माने, सुमीत गवळी, ‘स्वाभिमानी’चे अण्णासो चौगुले, महावीर नाईक, सूरज कांबळे, श्रीवर्धन माने-देशमुख, शेखर कांबळे, कनवाडचे सरपंच बाबासो आरसगोंडा, दत्तात्रय आंधळे, अमोल गावडे, भूषण गंगावणे, दीपक पाटील, श्रीशैल मठपती, हेमंत बावलेकर, संजय शिरटीकर, महेश जानवेकर, दादेपाशा पटेल, राकेश जगदाळे, संजय पाटील, प्रकाश धरणगुत्ते, दीपक मस्के, दर्शन वडेर, सत्यजित सोमण, मायाप्पा पानदारे, तानाजी निकम, डॉ सुरेश सावंत, ताहीर मोकाशी यांच्यासह विविध गावांतील मान्यवर उपस्थित होते.
जितेंद्र आणुजे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले.
चर्चेतील मुद्दे
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांत पाणी सोडताना समन्वयाचा अभाव
कर्नाटक सरकारने नदीवर भराव टाकून पूल बांधल्याने धोका अधिक
हिरप्परगी धरणातील साठा शिरोळ तालुक्यासाठी धोकादायक
अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा महापुराला कारणीभूत
केंद्रीय जल आयोगाच्या निकषांचे तंतोतंत पालन व्हावे
महापुरातील उपाययोजनांपेक्षा निर्बंधासाठी कार्यवाहीची गरज
राजापूर बंधारा सोडून पुढे गेल्यावर अनेक ठिकाणी पुलांची उभारणी करून पाणी रोखण्याचे काम
सांगली जिल्ह्यातील अनेक पुलांमध्ये भराव टाकल्याने महापुराचा धोका वाढला
नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे त्वरीत काढावीत
पूरग्रस्त निधी वाटण्यापेक्षा महापूर येऊ नये, यासाठी अधिक खर्च करावा
सहा महिने प्रदूषणयुक्त पाणी आणि सहा महिने महापुराचे पाणी यामुळे ग्रामस्थ त्रस्त
या वेळी महापूर आल्यास मंत्रालयात जनावरे नेऊन बांधणार
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares