खेडच्या रणांगणातील संघर्षयोद्धा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
खेडच्या रणांगणातील संघर्षयोद्धा
खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचा जीवनप्रवास एखाद्या कादंबरीत शोभावा इतका विस्मयकारक, संघर्षमय आणि तरीही सतत प्रगतीकडे जाणारा आहे. नवीन प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सहजसोपे राजकारण करू पाहणाऱ्या नव्या पिढीतील राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक संघर्षातून शिकावे आणि अंगी बाणवावे, असे अनेक पैलू त्यांच्या वाटचालीत अनेक ठिकाणी दिसतात.
-राजेंद्र सांडभोर
खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव या छोट्याशा गावात एका साधारण परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचा जन्म झाला. साधारण चांगले यश मिळवलेल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तींबाबत आपण सुरुवात खडतर असल्याचेच पाहतो. परंतु, दिलीपराव यांची परिस्थिती इतकी खडतर होती की, त्यांचा जन्मसुद्धा कुठल्या दवाखाना अथवा आरोग्य केंद्रात झाला नाही. हे बाळ शेतातच जन्माला आले. वडील दत्तात्रेय आणि आई रत्नाई यांच्या पोटचे चौथे अपत्य! त्यांना तीन भाऊ व तीन बहिणी.
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे बालपण ज्याप्रमाणे शेती-माती, झाडेझुडपे, ओढे-नाले, विहिरी यांमध्ये जाते, तसेच बालपण दिलीपरावांच्या वाट्याला आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत, बोरू आणि दौतीतील शाईच्या साहाय्याने त्यांनी शिक्षणाचे धडे गिरविले. बेताची परिस्थिती असल्याने आणि घरात खाणारी तोंडे वाढल्याने, आई-वडिलांसाठी प्रपंच चालविणे मोठे जिकिरीचे काम होते. म्हणून त्या बालवयातही स्वतः दिलीपरावांनी सुकडी खाऊन, रस्त्याच्या कामांवर मोलमजुरी करून, घराला हातभार लावण्याचे काम केले. त्यांचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षणही शेलपिंपळगावातच झाले. अकरावीसाठी शिक्रापूरला जाऊन-येऊन करावे लागले. अकरावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यात त्यांची मोठी बहीण राहत होती. तिच्याकडे राहून ते कॉलेजात जाऊ लागले. पण, कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची होती. शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. काम करून शिकण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘कमवा आणि शिका’ हे धोरण स्वीकारले. कामाच्या दोन पाळ्या होत्या. दिवसपाळी व रात्रपाळी. पंधरा दिवस रात्रपाळी असायची, तेव्हा दिवसा कॉलेजला जाता यायचे. मात्र दिवसपाळी सुरू झाली की, १५ दिवस कॉलेज बुडायचे. ते खूपच खडतर दिवस होते.
अशा परिस्थितीत कॉलेजच्या शिक्षणाची गाडी मध्येच सोडावी लागली. कमाईचे साधन लवकर निर्माण व्हावे, म्हणून त्यांनी टर्नर-फिटरचा कोर्स केला. डेल्टा टूल्स येथे पहिली नोकरी केली. सुयोग कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप केली. पण, नोकरीत त्यांचे मन रमेना. म्हणून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे सुपरवाइजर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. येथेच त्यांच्या बांधकाम व्यवसायाचा पाया रचला गेला. तीन- चार वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतः सेंट्रिंग ठेकेदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. भावाला बरोबर घेऊन पुण्यामध्ये बांधकामाची छोटी- मोठी कामे ते करू लागले. पुढे स्वकष्टाने त्यांनी बांधकाम व्यवसायात एक एक पायरी गाठली. इमारत उभारणीची कामे करून, हळूहळू ते एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक झाले. एक उत्तम बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे शहरामध्ये त्यांचा नावलौकिक झाला. खेड्यातून येऊन पुण्यासारख्या चोखंदळ लोकांच्या शहरांमध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून यश मिळवणे, खूपच अवघड होते. तसेच, बांधकाम क्षेत्रात स्पर्धाही जीवघेणी होती. तरीही धैर्य, धडाडी आणि धाडसाने, तुलनेने लहान वयात, त्यांनी बांधकाम क्षेत्रात पाय रोवले.
दरम्यान, घरी त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुली पाहण्याचे काम सुरू झालं. दिलीपरावांच्या मनात मात्र वेगळाच मनसुबा होता. त्यांना समंजस, सुस्वभावी व कष्टाळू मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्यांच्या तळेगाव ढमढेरे येथील मामाची मुलगी सुरेखा लहानपणापासून त्यांच्या पाहण्यात होती. एकमेकांचे स्वभावही त्यांना परिचित होते. दिलीपराव यांच्या मनात पत्नीविषयी असलेल्या विचारचौकटीत सुरेखाताई फिट्ट बसत होत्या. तो विचार त्यांनी सुरेखाताईंसमोर व्यक्त केला. ताईंना त्यांनी स्वतःच लग्नाची मागणी घातली. त्यावेळी सुरेखाताईंचे वडील हयात नव्हते. आई आणि मोठ्या बहिणींना हा प्रस्ताव मान्य होता, पण नात्यात लग्न नको, अशी भावना दिलीपरावांच्या घरात होती. अखेर त्यांच्या पुण्यात राहणाऱ्या मोठ्या बहिणीच्या पतीने, म्हणजे दाजींनी पुढाकार घेऊन सुरेखाताईंचे आणि त्यांचे लग्न जमविले. दोघांचे लग्न सन १९८४ मध्ये यथासांग पार पडले. लग्नाची सप्तपदी करताना आयुष्यातल्या चांगल्या-वाईट साऱ्या‍ प्रसंगात, एकमेकांना साथ देण्याचे दिलेले वचन या दांपत्याने आजतागायत निभावले.
दिलीपरावांप्रमाणेच सुरेखाताईंची वाटचालही खडतरच होती. माहेरच्या त्या सुरेखा कृष्णराव ढमढेरे. त्यांचे कुटुंब मूळचे तळेगाव ढमढेरे इथले. पण, त्यांचे वडील पुण्यात कसबा पेठेत स्थायिक होते. सुरेखाताईंचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शिक्षणही पुण्यातच झाले. त्यामुळे लहानपणापासून त्यांना चांगले वातावरण मिळाले. चांगले संस्कार झाले. सुरेखाताईंचे वडील लष्करातून निवृत्त झाले होते. लष्कराची शिस्त त्यांच्यात होती. स्वभावाने ते कडक होते. त्यांना पाच मुली होत्या. त्यात सुरेखाताई धाकट्या, शेंडेफळ होत्या. पाचही मुलीच म्हणून कृष्णरावांनी मुलींचा कधी राग केला नाही. त्यांची आबाळ होऊ दिली नाही,. त्यांना हीन वागणूक दिली नाही. सुरेखाताईंच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे एस.एस.सी. झाल्यानंतर त्यांनाही नोकरीचा विचार करावा लागला. एस.एस.सी. झाल्यानंतर त्यांनी पंच ऑपरेटिंगचं प्रशिक्षण घेतलं. त्यावेळी एस.एस.सी. बोर्डाच्या निकालाचा डेटा पंचिंग करण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. त्या काळातल्या कॉम्प्युटरचे स्वरूप वेगळे होते. पंच केलेल्या डेटाचा उपयोग त्यामध्ये केला जात असे. एक हजार कार्ड पंच केली, तर २५ ते ३० रुपये मिळत असत. न्यूमरिकल काम असेल (म्हणजे आकड्यांचे) तर २५ रुपये व अल्फाबेटिकल (म्हणजे अक्षरे) असेल तर ३० रुपये असा दर होता. एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाच्या काळात हे काम मिळत असे. सुरेखाताईंचा चुलतभाऊ एस.एस.सी. बोर्डात नोकरी करत होता. त्यामुळे या कामाची सुरेखाताईंना माहिती झाली. त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या क्लासला जाऊ लागल्या. क्लास पाऊण तास असायचा, पण तिथे दोन-दोन तास बसून त्यांनी सराव केला. हे काम गतीने करण्याचं नैपुण्य त्यांनी मिळवलं. निकालाच्या काळात सलग १५-१५ तास त्या पंचिग करायच्या. त्यांचा स्पीड व अचूकता यामुळे एस.एस.सी. बोर्डातील अधिकारी प्रभावित झाले. त्यांच्या चुलतभावाचे दावलभक्त म्हणून एक मित्र होते. त्यांनी त्यांच्या ऑफिसात त्यांना काम दिले. बुरूड आळीत त्यांचे ऑफिस होते. पत्र्या मारुती चौकातील पेठे नावाच्या गृहस्थांनीही त्यांना काम देऊन मदत केली. सुरेखाताईंना त्या काळात या कामांची खूप मदत झाली. त्यांची आर्थिक कमाई घर चालवण्यासाठी उपयोगी पडत होती. त्यांची तिसऱ्या क्रमांकाची मोठी बहीणही त्यांच्याबरोबर काम करत होती. या काळात काही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीही सुरेखाताईंना मिळाल्या होत्या. मात्र, घरापासून दूर नोकरीसाठी जाण्यास वडिलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी त्या संधी नाकारल्या. लग्नाआधीपर्यंत त्या रोज १५-२० तास काम करायच्या.
दिलीपरावांशी लग्न झाल्यानंतरही दोन वर्षे ताईंनी नोकरी केली. कुठल्याशा कर्जाची परतफेड करण्यासाठी नोकरी करणं त्यांना आवश्यक होते. लग्नाआधी त्यांनी तसे दिलीपरावांना व कुटुंबीयांना सांगितले होते. दिलीपरावांनी त्याला आडकाठी केली नाही. सुरेखाताई या मोहिते कुटुंबात आल्या, तेव्हा त्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव नव्हता. रविवारी-सुटीच्या दिवशी त्या गावी जायच्या. धुणी धुणे, भांडी घासणे, शेण गोळा करणे, गोवऱ्या थापणे, नदीवरून पाणी आणणे, अशी ग्रामीण जीवनातली कामेही त्यांनी केली. त्यांच्या थोरल्या जाऊबाईंनी त्यांना खूप साथ दिली. अनेक कामे त्या स्वतः करायच्या. सुरेखाताई म्हणतात, ‘‘मला चूल पेटवता येत नव्हती. जाऊबाई कधी गावात नसल्या तर मला चूल पेटवावी लागायची. कारण, सासूबाईंना चुलीवरचा स्वयंपाक लागायचा. पण, कुटुंबातल्या सगळ्यांनी मला समजून घेतले. मला प्रेम दिले. सासूबाईंनी सगळ्याच सुनांना खूप चांगले सांभाळले. सासू म्हणून कधी वर्चस्व गाजवले नाही. सगळा परिवारच एकमेकांची मदत करत असतो.’’ जाऊबाईंनी पुरणपोळी शिकवल्याचे सुरेखाताई आवर्जून सांगतात.
राजकारणाचा श्रीगणेशा
पुढे दिलीपरावांचा व्यवसाय आणि सुरेखाताईंची नोकरी यामुळे त्यांचं वास्तव्य पुण्यातच झाले. दिलीपराव बांधकाम व्यवसायात स्थिरावल्यावर सुरेखाताईंनी नोकरी सोडली. एक सुखी कुटुंब म्हणून त्यांचा संसार सुरू होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शेलपिंपळगावच्या गावकऱ्यांनी दिलीपरावांना सन १९८८ मध्ये गावी बोलावून घेतले. गावात सरपंचांची निवड करायची होती. गावात वाद होते. हे वाद मिटवायचे आहेत, म्हणून तुम्ही सरपंच व्हायला हवे, असे त्यांना सांगण्यात आले आणि गावाने त्यांना बिनविरोध सरपंच केले. मात्र, दिलीपरावांनी राजकारणात जावे, अशी तेव्हा सुरेखाताईंची इच्छा नव्हती. पुण्यासारख्या शहरात मध्यवर्गीय वातावरणात वाढलेल्या सुरेखाताईंना राजकारणाचा अजिबात गंध नव्हता आणि आवडही नव्हती. आपल्या संसाराला आणि व्यवसायालाही आता कुठे सुरुवात झाली आहे, म्हणून राजकारणात जाऊ नका, अशी विनंती त्यांनी दिलीपरावांना केली. पण, लोकांनी मला सरपंच केले आहे. त्यामुळे माझा नाइलाज आहे, असे दिलीपरावांनी त्यांना सांगितले. येथूनच त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला.
जे काम स्वीकारले, ते झोकून देऊन करायचे. जी भूमिका स्वीकारली, ती निष्ठेने पार पाडायची, ही दिलीपरावांची वृत्ती. लोकांमध्ये मिसळण्याचा, त्यांच्या सुख- दुःखात सहभागी होण्याचा दिलीपरावांचा स्वभाव होता. त्यामुळेच लोकांनी त्यांना सरपंचपद स्वीकारण्याची गळ घातली होती. ते गावातील वाद मिटवतील आणि गाव विकासाच्या मार्गावर नेतील, असा लोकांचा विश्‍वास होता. अर्थातच त्यांनी तो सार्थ ठरविला. त्यांच्या सरपंचपदाच्या कालावधीत शेलपिंपळगाव विकसित गाव म्हणून पुढे आले. गावात केलेल्या कामांमुळे त्या पंचक्रोशीत तडफदार सरपंच म्हणून त्यांची ओळख पसरली.
नारायणराव पवार यांच्याशी गट्टी
गावातील विकासकामांनिमित्ताने त्यांचा खेडचे त्यावेळचे आमदार कै. नारायणराव पवार यांच्याबरोबर परिचय झाला. नारायणराव हे अतिशय करारी आणि प्रभावशाली नेते होते. त्यांच्यापूर्वीच्या प्रस्थापित आणि बुजुर्ग राजकारण्यांशी संघर्ष करून विजयी होत, त्यांनी आमदारकी मिळवलेली होती. नारायणराव संघटनकुशल होते. गावागावात त्यांचे खास कार्यकर्ते होते. ते रत्नपारखी होते. दिलीपरावांमधील हरहुन्नरी धडपड्या आणि कुशल कार्यकर्ता त्यांनी लगेच हेरला. एकमेकांचे स्वभाव त्यांना पूरक होते. त्यामुळे लवकरच त्यांची गट्टी जमली. नारायणरावांचे अनेक गुण आणि कौशल्ये दिलीपरावांनी आत्मसात केली. विशेषतः नारायणरावांची विकासाची दृष्टी, दांडग्या लोकसंपर्काची आवड आणि लोकांसाठी अहोरात्र झटण्याची वृत्ती, यांचा अंगीकार दिलीपरावांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केला. नारायणरावांच्या खास कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायणरावांच्या सन १९९० च्या निवडणुकीमध्ये प्रचाराची बरीचशी धुरा दिलीपरावांनी सांभाळली. मात्र, पुढे त्यावेळच्या एकत्रित काँग्रेसमधील अनेकांना नारायणराव आणि दिलीपराव यांचे सख्य खुपत होते. त्यामुळे त्‍यांनी दोघांमध्ये बेबनाव कसा निर्माण होईल, याचे प्रयत्न सुरू होते.
बंडखोर नेत्याचा जन्म
दरम्यान, सन १९९२च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिलीपरावांनी पक्षाकडे तिकीट मागितले. नारायणरावांचे खास कार्यकर्ते असल्याने आपल्याला तिकीट मिळेल, अशी दिलीपरावांना खात्री होती. मात्र, दिलीपरावांची राजकीय महत्त्वाकांक्षा नारायणरावांच्या लगेचच लक्षात आली. अतिशय कसलेले आणि मुरब्बी राजकारणी असलेल्या नारायणरावांनी भविष्यातील धोका वेळीच जाणला. आधीच थोडीशी ताणाताण झालेली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने दिलीपरावांना जिल्हा परिषदेचे तिकीट नाकारले. दिलीपरावांसाठी हा पहिला राजकीय धक्का होता. साधारणपणे अशा अचानक बसलेल्या धक्क्याने कार्यकर्ता गांगरतो आणि थोडासा निराश होऊन राजकारणाला नावे ठेवू लागतो. पण, मुळातच लढवय्ये असलेल्या दिलीपरावांना हा नियम लागू पडला नाही. उलट जिल्हा परिषदेचे तिकीट नाकारल्याने त्यांच्यातील बंडखोर नेता जन्माला आला. आपल्याला जिल्हा परिषदेचे तिकीट नाकारले जाते, याचा राजकीय अर्थ त्यांच्या लगेच लक्षात आला. आपण पुढे तालुक्याच्या राजकारणातील मोठे स्पर्धक होऊ नये, यासाठी आपल्याच नेत्याने, आपल्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे चाणाक्ष दिलीपरावांच्या लक्षात आले. याच राजकीय संकटाचे संधीत रूपांतर करण्याचे त्यांनी मनोमन नक्की केले. नारायणरावांच्या तालमीत तयार झालेल्या दिलीपरावांनी नारायणरावांनीच दिलेल्या त्यांच्याविरोधातील उमेदवारावर त्याच डावांचा प्रयोग केला. त्या निवडणुकीसाठी ते जिद्दीने अपक्ष म्हणून उभे राहिले. विशेष म्हणजे तो जिल्हा परिषद मतदारसंघ हा खुद्द नारायणराव पवारांचाहोता.
जिल्हा परिषदेत प्रवेश
आमदार पवारांच्या मतदारसंघात एक नवतरुण त्यांना ललकारतो आहे म्हटल्यानंतर पवारांच्या सर्व विरोधकांना आनंद झाला. या भावनेचा योग्य तो राजकीय फायदा घेत, नवीन कार्यकर्त्यांची मोट बांधत आणि प्रत्यक्ष नारायणरावांना आव्हान देत दिलीपराव या निवडणुकीला सामोरे गेले. त्यांची ही तडफदार, जिद्दी, धाडसी भूमिका लोकांना आवडली. त्यांना मतदारसंघातून जोरदार पाठिंबा मिळू लागला. ही गोष्ट मुरब्बी नारायणराव पवारांच्या लक्षात येताच, ते स्वतः त्या मतदारसंघात प्रचार करू लागले. दिलीपरावांना खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, दिलीपराव खच्ची होणाऱ्यांतले नव्हते. उलट अशा राजकारणामुळे उसळून मोठी उडी घेणारे होते. त्यामुळे अनुभवी राजकारणी असतानाही नारायणरावांचा होरा चुकीचा ठरला आणि त्या चुरशीच्या लढतीत दिलीपराव ११०० मतांनी निवडून आले. ही निवडणूक एका नव्या राजकीय नेत्याचा पाया भरणारी निवडणूक आहे, हे त्यावेळी लोकांच्या लक्षात आले नाही. त्यांच्या राजकीय जीवनाची ही खऱ्या‍ अर्थाने सुरुवात होती. पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवून ती जिंकल्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. या निवडणुकीनंतर ते आमदार पवारांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले.
विरोधकांचे नेते
जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर दिलीपरावांची कारकीर्द चांगली झळाळली. पुणे जिल्हा परिषदेमध्ये तत्कालीन काँग्रेसची सत्ता होती. त्याविरोधात आवाज उठवणारे जे मोजके सदस्य होते, त्यांच्यामध्ये दिलीप मोहिते होते. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा राजकीय प्रभाव वाढू लागला. त्याकाळी पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्यांबरोबर जिल्हा परिषद सदस्यही बसत असत. त्यावेळचे सभापती बाळासाहेब शेटे हे तत्कालीन आमदार नारायणराव पवारांचे उजवे हात समजले जात. मात्र, जिल्हा परिषद सदस्य असलेले दिलीप मोहिते आणि पंचायत समिती सदस्य असलेले शांताराम गारगोटे हे दोघे पंचायत समिती सभागृह दणाणून सोडत. त्यांची मैत्रीही या काळात बहरली. त्या दोघांनी आमदार पवारसमर्थकांना राजकीयदृष्ट्या जेरीस आणले. त्याकाळात दिलीपरावांना सर्वजण ‘दिलीपशेठ’ म्हणत असत. तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून शेठ उदयास आले. तत्कालीन एकसंध काँग्रेसमध्ये आमदार पवार आणि त्यांचे विरोधक असे दोन गट पडलेले होते. विरोधकांचे नेते म्हणून दिलीपशेठ पुढे येऊ लागले.
स्वप्नांना सुरुंग
दिलीपराव जिल्हा परिषद सदस्य असतानाच सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. काँग्रेसकडून आमदार पवारांचे तिकीट जवळपास निश्चित मानले जात होते. तरी पक्षाकडे दिलीपशेठ, शांतरामबापू गारगोटे आणि अन्य सात-आठ जणांनी तिकीट मागितले. नारायणराव पवार सोडून इतरांनी एकमत करून एकजण सुचवा, त्यांना तिकीट देऊ, अशी कुटिल भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. तशी ती नेहमीच घेतली जात असे. अर्थातच नारायणरावांचे तिकीट जाहीर झाले; पण यावेळी तालुक्यातील विरोधकांनी पवारांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचे निश्चित केले. दिलीपशेठ, शांतारामबापू गारगोटे आणि बबनराव डावरे हे प्रमुख स्पर्धक होते. सर्वांना शेठला संधी मिळेल, असे वाटत होते. पण, पुन्हा दैव आडवे आले. शेठ निवडून आले तर डोईजड होतील, असा धोका विरोधी वर्तुळातही वाटत होता. त्या तुलनेत डावरेदादा सौम्य आणि सोयीचे वाटत होते. त्यामुळे डावरे यांना उमेदवारी देण्याचे नक्की झाले. दिलीपरावांच्या आमदार होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला.
राजकारणात वजन वाढले
एखादा नाराज होऊन घरात बसला असता… पण शेठ नेहमीच नियमाला अपवाद होते. राजकीय खेळीत डावरे यांचा काही दोष नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घेतली. नारायणरावांची अभेद्य सत्ता उलथवून टाकण्याची ही संधी सोडून उपयोग नाही, असे त्यांनी मनोमन ठरविले. नारायणराव हरले, की पुढच्या राजकारणातील वाटचाल सुरळीत होईल, एवढी राजकीय दूरदृष्टी त्यांच्याकडे, तुलनेने राजकारणात नवीन असतानाही होती. त्यांनी स्वतःची नाराजी बाजूला ठेवून डावरे यांचा जोरदार प्रचार सुरू केला. दिवसरात्र ते डावरे यांच्याबरोबर राहिले. सगळा तालुका पिंजून काढला. त्यावेळी सर्वजण पवारांविरोधात एकवटले होते. तरी डावरे यांचा विजय पावणेचार हजार मतांनी हुकला आणि पवार तिसऱ्यांदा विजयी झाले. पण, तिथेच मोहिते यांच्या आमदारकीची धुळाक्षरे गिरविली गेली. तालुक्याच्या राजकारणातील त्यांचे वजन वाढले.
शिवसेनेचा भगवा खांद्यावर
सन १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. त्यानंतर वर्षभराने खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. पुन्हा काँग्रेसचेच दोन्ही गट एकमेकांविरोधात पॅनेल करून लढले. या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातून दिलीपशेठ मोहिते उभे होते. विधानसभा निवडणुकीवरून आमदार पवार यांनी धडा घेतलेला होता. त्यांना मोहिते हे विजयी होऊन चालणार नव्हते. बाकी निवडणूक सोडून त्यांनी मोहिते यांच्या पराभवावर लक्ष केंद्रित केले आणि त्यात ते यशस्वी झाले. बाजार समितीला पराभूत झाल्यावर दिलीपशेठ यांनी आत्मचिंतन केले. काँग्रेसच्या या गटातटाच्या राजकारणात अडकण्यात काही अर्थ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. शिवसेना अनायासेच सत्तेत होती. त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. काही जुने सहकारी बरोबर घेतले. शिवसेनेत त्यांना अजून काही नवीन सहकारी मिळाले. दहा-बारा प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि असंख्य अनुयायांच्या साथीने नवी वाटचाल
सुरू केली.
सुरेखाताई यांचा विजय
मोहिते यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सन १९९७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीत त्यांचा मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव झाला. या परिस्थितीत मतदारसंघाच्या नेतृत्वात सातत्य राखण्याच्या आणि दिलीपशेठ यांचे कार्य पुढे नेण्याच्या उद्देशाने मोहिते कुटुंबातील स्त्रीनेच निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, सुरेखाताई यांना निवडणूक लढवण्यात रस नव्हता. त्यांनी नकार दिल्यामुळे कार्यकर्त्यांना पेच पडला होता. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी दिलीपशेठ यांच्या आईंना म्हणजे सुरेखाताई यांच्या सासूबाईंना, ताईंनी निवडणूक लढवणं का महत्त्वाचं आहे, हे समजावून सांगितलं. ते त्यांना पटलं. त्यामुळे सासूबाईंनी सूनबाईंना निवडणूक लढण्याची गळ घातली. ती नाकारणं सुरेखाताईंना शक्य नव्हतं. म्हणून ताईंनी हे आव्हान स्वीकारलं. पण, आव्हान सोपे नव्हते. समोर खुद्द आमदार पवार यांच्या सौभाग्यवती नीलिमा पवार यांना तिकीट दिले गेले. त्यावेळी पक्षात आमदार पवार यांचे वजन वाढलेले होते. प्रसंगी ते श्रेष्ठींनाही सुनवायला मागेपुढे पाहत नव्हते. त्यामुळे नारायणरावांचा वारू रोखावा, यासाठीच नीलिमाताईंना तिकीट देण्यात आले होते, अशी नंतर आतल्या गोटात चर्चा होती. म्हणजे काँग्रेसच्या श्रेष्ठींनाही पवार यांना मोहिते शह देऊ शकतील, अशी खात्री वाटत होती. त्यामुळे शिवसेनेच्या सुरेखाताई मोहिते विरुद्ध काँग्रेसच्या नीलिमाताई पवार अशी जोरदार लढत झाली. त्यावेळी जिल्ह्यातील ती हाय व्होल्टेज लढत होती. जवळपास सगळ्या वृत्तपत्रांनी त्या लढतीची दखल घेऊन आपल्या लक्षवेधी लढतीच्या सदरामध्ये तिचा समावेश केला होता. त्या चुरशीच्या लढतीत सुरेखाताई मोहिते या विजयी झाल्या.
चांगले काम करणारे दांपत्य
मोहिते यांच्यासाठी हा विजय फार महत्त्वाचा होता. बाजार समितीला अपयश आले तेव्हा, मोहिते यांची फक्त हवा होती, अशी टीका होत होती. पण, ते स्वतः आणि नंतर पत्नी, त्याच तत्कालीन विद्यमान आमदारांच्या घरच्या मतदारसंघातून विजयी झाल्यामुळे आमदार पवार यांना दिलीपशेठ हेच शह देऊ शकतात, अशी भावना जनमानसात वाढीस लागली. मात्र, सुरेखाताई निवडून आल्या, तरीही जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्यांना विरोधात काम करावे लागले. दिलीपशेठ यांनी त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. ते त्यांच्याबरोबर कधीही जिल्हा परिषदेत गेले नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून काम कसं करावं, याचे काही धडे मात्र त्यांना दिले. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांना दिलीपराव यांच्याबद्दल आदर होता, त्यांच्याशी मैत्री होती. त्यामुळे सुरेखाताई जी कामे त्यांच्याकडे घेऊन जात, त्यांना त्यांनी कधी नकार दिला नाही. तालुक्याच्या पूर्व व पश्‍चिम पट्ट्यात त्यांनी खूप कामं केली. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केले. त्याचा लाभ गरजवंतांना मिळाला. चांगले काम करणारे दांपत्य, अशी मोहिते पती-पत्नीची ओळख झाली.
सामूहिक विवाहाची चळवळ
पराभवानंतर काही काळासाठी राजकारणातून विश्रांती घेणे, असा एक ढोबळ नियम आहे. मात्र, मोहिते यांनी येथेही नियमाला अपवाद असतात, हे सिद्ध करून दाखविले. पराभव झाल्याच्या दुसऱ्या‍ दिवसापासूनच ते पुन्हा कामाला लागले. खेड तालुक्यामध्ये त्यांनी सामूहिक विवाहाची चळवळ सुरू केली. तालुक्यातील गोरगरीब तरुण-तरुणींची लग्न लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले. दरवर्षी चाळीस-पन्नास लग्नांचा मोठा सामुदायिक विवाहसोहळा ते आयोजित करत असत. सुमारे ८०० जोडप्यांचे विवाह त्यांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे दिलीपशेठ तालुक्यातल्या घराघरात पोहचले. याबरोबरच इतरही कामांमध्ये त्यांचा सहभाग असे. विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडून होणाऱ्या या सर्व आंदोलनांचे ते सारथ्य करीत होते. तसेच, तालुक्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर लढवल्या जातील, यासाठी ते आग्रही राहायचे. पुढच्या विधानसभेचे, शिवसेनेचे तिकीट पुन्हा मिळवून विजयी व्हायचे, या तीव्र इच्छेने ते काम करत होते. परंतु, दैवाने त्यांना कधीही सुखासुखी काहीही दिले नाही.
ढसाळांकडून जागा मिळवली
दरम्यान, सन १९९९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. त्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस दुभंगली होती. आमदार नारायणराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यामुळे विधानसभेला आपसूक त्यांनाच तिकीट मिळाले. काँग्रेसने शांतारामबापू गारगोटे यांना तिकीट दिले. शिवसेनेने अर्थातच दिलीपशेठ यांना तिकीट दिले. तरी या ठिकाणीही शेठला संघर्ष करावा लागला. कारण, त्यावेळी शिवसेनेची दलित पँथरशी युती झाली होती. पँथरचे संस्थापक दिवंगत नामदेव ढसाळ हे मुंबईत काम करीत असले, तर त्यांचा मूळ तालुका खेड आहे. तालुक्यातील पूर हे त्यांचे गाव. त्यांनी शिवसेनेकडे खेडची जागा मागितली. पँथरने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जागा मागितल्याने शिवसेनेला त्यांना नाही म्हणता येईना. त्यात ढसाळ हे त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. शिवाय यापूर्वीच्या सन १९९० व सन १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेला खेड मतदारसंघात किरकोळ मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने मतदारसंघ फारसा महत्त्वाचा नव्हता. शिवसेनेने ढसाळ यांच्यासाठी पँथरला जागा सोडल्याचे जाहीर केले. पँथरने ही जागा मागावी, यासाठी आमदार नारायणराव पवार यांनीच त्यांना चिथावले होते, अशी वदंता नंतर पसरली होती. विधानसभेची तयारी केलेल्या मोहिते यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. तसेच, सर्व पवारविरोधकांनाही मोठा सेटबॅक होता. पण, हार मानतील ते दिलीपशेठ कुठले? त्यांनी मुंबईत ठाण मांडले. मुंबईतील आपल्या मित्रांच्या माध्यमातून ढसाळ यांच्याशी संपर्क साधला. ग्रामीण भागात पँथरचा उमेदवार निवडून येण्याइतका प्रभाव नाही, हे पटवून दिले. ढसाळ यांच्यासारख्या बुद्धिमान वाघाला पटविणे सोपे नव्हते. पण, शेठने तीही जादू केली. ढसाळ यांनी पुन्हा शिवसेनेला जागा दिली, एवढेच नाही तर त्यांनी मोहिते यांच्या एका सभेलाही हजेरी लावली.
थोडक्यात पराभव
तिकिटाचे हे रामायण संपेपर्यंत, इकडे दुसरे उमेदवार प्रचाराला लागले होते. शेवटी एकदाचे दिलीपशेठ यांना शिवसेनेचे तिकीट जाहीर झाले. त्यांनी मागून येऊन प्रचाराला सुरुवात केली. पण, शिवसेनेच्या अनेकांचे रुसवे-फुगवे आड येत होते. त्यांची समजूत काढून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. नंतर मात्र प्रचाराचा धडाका लावला. गावोगाव प्रचार करून, तिथल्याच एखाद्या गावात मुक्काम करायचा, अशी त्यांची प्रचाराची पद्धत होती. त्यावेळी फ्लेक्स समाजमाध्यमे, मोबाईल फोन इत्यादी सुविधा नव्हत्या. एखाद्या जवळच मोबाईल फोन असायचा. त्यामुळे नवीन उमेदवाराला प्रचार करणे, खूप अवघड होते. त्यात काही वर्षांपूर्वीच माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांनी प्रचारावर कडक नियंत्रणे आणलेली होती. त्याही परिस्थितीत आणि शिवसेनेकडे मनुष्यबळ कमी असतानाही त्यांनी पवार यांना जोरदार लढत दिली. निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा नारायणराव पवार यांना ४८ हजार; तर मोहिते यांना ४४ हजार मते मिळाली होती. अवघ्या चार हजार मतांनी मोहिते यांचा पराभव झाला. शिवाय राज्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता आली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
ज्या शिवसेनेच्या भरवशावर त्यांना आमदार व्हायचे होते, त्या शिवसेनेशी आमदार नारायणराव पवार यांचा सलोखा वाढला. विशेषतः माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नारायणराव पवार यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली. त्यातूनच नारायणराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बंड केले. राणे यांच्या माध्यमातून ते शिवसेनेच्या गोटात सामील झाले. मात्र, त्यावेळी शिवसेनेला अपेक्षित आमदारांचे पाठबळ मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पाडण्याचा त्यांचा डाव फसला. पण शिवसेनेशी पवारांची जवळीक वाढल्याने मोहिते पुन्हा चिंताग्रस्त झाले. नारायणराव पवार यांनाच शिवसेनेचे तिकीट मिळेल किंवा त्यांना शिवसेना पाठिंबा देईल, असे चित्र त्यावेळी स्पष्ट झाले होते. या गोंधळाच्या अवस्थेत काय निर्णय घ्यावा, याचा मोहित यांना पेच पडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे, असा एक सूर येत होता. मात्र, राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या राजकारणानुसार जर आपल्याला डावलले गेले तर काय? असा संभ्रम त्यांच्या मनात होता. याच संभ्रमात त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या मतांची चाचपणी केली. सर्वांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे मत दिले. पुन्हा पक्ष बदलणे मोहिते यांना खटकत होते. मात्र, अजितदादा पवार यांच्याशी असलेला त्यांचा जुना स्नेह कामी आला. दादांनी त्यांना आश्वस्त केल्यावर त्यांनी निर्धास्तपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २००२ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. तोपर्यंत आमदार पवार यांचा राष्ट्रवादीशी दुरावा वाढलेला असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
पुढे सन २००४ ची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली होती. त्यांनी पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात केली. ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली, त्यावेळी पक्षाकडे अनेक जणांनी तिकिटाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच वर्षात बाळसे धरलेले असल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. पवारांना पर्याय फक्त आपणच ठरू शकतो, हे मोहिते यांनी सन १९९९ च्या निवडणुकीत दाखवून दिले असले; तरी शरद पवार आणि अजित पवार यांचा वरदहस्त लाभला की आपणही आमदार होऊ, असे अनेकांना वाटत होते. मोहिते यांची वजाबाकी झाल्याने तालुक्यात शिवसेना नामोहरम झाली होती. शिवसेना व भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती होणार असल्याने काँग्रेस व भाजप उमेदवार रिंगणात राहणार नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटाच्या रांगेत अनेकजण होते. तिकिटासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ येणार असल्याने मोहिते चिंतेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले गेले होते, पण राजकारणात संकेत पाळण्याचे दिवस संपले होते.
तिकिटाची यशस्वी खेळी
शिवसेना सोडलेली आणि राष्ट्रवादीत तिकिटाची अनिश्चितता, अशा कात्रीत ते होते. पण, संकटात मार्ग काढणार नाही, तो लढवय्या कसला? त्यात मोहिते घराणे मूळचे सातारा तालुक्यातील तळबीडचे, हंबीरराव मोहित्यांच्या गावातले. त्यामुळे गनिमी काव्याचा तो वारसा त्यांच्याकडे उपजतच होता. दिलीपशेठ यांनी धोकादायक, पण जरा वेगळीच खेळी खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्षाकडे तिकीटच मागितले नाही. आपण अपक्ष निवडणूक लढविणार, असे त्यांनी जाहीर केले. तिकीट मागितले नसल्याने पक्षाच्या मुलाखतीसाठी मुंबईला जाण्याचा प्रश्न नव्हता. पक्षालाही पेच पडला. पुढे नारायणराव पवार यांच्यसाारखा कसलेला पहिलवान. त्यात त्यांनी लोकसभेला शिवाजीराव आढळराव पाटील यांना खेड तालुक्यातून ३२ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास पवार यांना होता. अनेक वर्षांच्या सत्तेमुळे त्यांचा तालुक्यात दरारा होता. त्यांच्याविरोधात काम करायला कार्यकर्ते दचकत होते. अशा ताकदवान उमेदवाराविरोधात निवडणुकीचा अनुभव नसलेला उमेदवार दिला नाही आणि त्यात मोहिते यांनी बंडखोरी केली, तर पराभव होणार, याची अचूक जाण राजकारणाचा ज्ञानकोश असलेल्या पवरसाहेबांना आणि दादांना होती. मोहितेच उजवे ठरतील, याचा अचूक अंदाज होता. त्यामुळे मोहिते यांनी उमेदवारी मागितली नसतानाही, त्यांना बोलावून घेऊन तिकीट देण्यात आले. इतर इच्छुकांचा पत्ता कापण्याची मोहित्यांची रिस्की खेळी यशस्वी ठरली. त्यांनी तिकीटच मागितले नसल्याने त्यांना डावलणे श्रेष्ठींना सहज शक्य होते, पण पुणे जिल्ह्यातील असूनही नारायणराव पवार यांनी उघड बंड केले असल्याने त्यांना धडा शिकविण्याला नेतृत्वाची प्राथमिकता होती. ही नस ओळखून दिलीपशेठ यांनी केलेली तिकिटाची खेळी यशस्वी झाली.
अखेर आमदार झालेच
ही दुरंगी निवडणूक चुरशीची झाली. नारायणराव पवार अपक्ष उभे होते. शिवसेना व मित्रपक्षांचा त्यांना पाठिंबा होता. मोहित्यांनी सर्व नारायणराव पवार विरोधकांना एकत्र केले. पवारसाहेब, अजितदादा व अनेक मंत्र्यांच्या सभा त्यांनी आयोजित केल्या. त्यावेळी राजकारणात आलेली नवीन कार्यकर्त्यांची फळी कामाला लावली. अक्षरशः सर्वस्व पणाला लावले. जिंकू किंवा संपू, या निर्धाराने दिलीपशेठ लढले. त्यावेळी पराभव झाला असता; तर पुन्हा लवकर उभे राहता आले नसते. पण, त्यांची जिंकण्याची दुर्दम्य इच्छा होती, त्यामुळे प्रचंड कष्ट करून त्यांनी विजयश्री खेचून आणली आणि अखेर दिलीपशेठ मोहिते आमदार झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांना, नातेवाइकांना, कुटुंबीयांना, गावकऱ्यांना नव्हे; तर सर्व तालुक्यालाच मोठा आनंद झाला. त्यांच्या रूपाने वीस वर्षांनंतर तालुक्याला नवीन नेता मिळाला होता. अनेक दिवस त्यांचे सत्कार समारंभ होत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिव्हाळ्याने त्यांचे ‘अण्णा’ असे नामकरण केले. आता ते सगळ्या तालुक्याचेच ‘अण्णा’ झाले.
बुडीत बंधाऱ्याचा प्रयोग
आमदार झाल्यावर, विजय साजरा करण्यात जास्त दिवस अडकून न राहता त्यांनी विकासकामांचा धडाका सुरू केला. आपल्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी तालुक्यात प्रचंड काम केले. विकासाची गंगा प्रवाहित केली. ही कामे करतानाही त्यांचे स्वतःचे असे एक वेगळेपण जपले. सरधोपट मार्गाने न जाता नवीन कल्पना अमलात आणण्याची शैली त्यांनी जपली. बंधारे सर्वजण करतात, पण अण्णांनी बुडीत बंधारे केले. बुडीत बंधारे म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बंधारा बांधायचा. याला पाटबंधारे खाते परवानगी देत नव्हते. पण, पावसाळ्यात खेड तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात प्रचंड पाऊस पडतो, त्याच पश्चिम भागात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असते. अक्षरशः टँकरने पिण्याचे पाणी पोचवावे लागते. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हणच त्यावरून पडली. कारण, पावसाळ्यातील पाणी वेगाने वाहून जाते. उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी खालावली की पश्चिम भागातील पाणी पहिल्यांदा ओसरते आणि त्या लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. म्हणून अण्णांनी बुडीत बंधाऱ्यांची संकल्पना मांडून अमलातही आणली. त्यातही पुन्हा पूल कम बंधारा अशीही उपकल्पना राबविली. बुडीत बंधाऱ्यांचे अनेक आराखडे खेड तालुक्यात तयार आहेत. जसजसा निधी मिळेल, तसतसे ते होत जातील.
धरणात पूलही उभारला
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सहसा पूल बांधला जात नाही. पण, अण्णांनी सुरकुंडी-वाळद पुलाचे शिवधनुष्य पेलायचे ठरविले. चासकमान धरणामुळे वाडा या बाजारपेठेपासून तुटलेली पश्चिम भागातील गावे, या पुलामुळे पुन्हा दळणवळणाने जोडली जाणार होती. पण, मुळात पाणलोट क्षेत्रात पूल बांधायला मान्यता नव्हती, त्यात या पुलावरून फार मोठ्या संख्येने वाहने जाणार नव्हती. त्यामुळे विषय अवघड होता, तरी खास बाब म्हणून या २० कोटींच्या पुलाला त्यांनी मंजुरी आणली आणि तिथे पूलही उभा राहिला. ‘असाध्य ते साध्य’ करण्याचा जणू त्यांचा पिंडच आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
पीपीपी तत्त्वावर आयटीआय
महाराष्ट्रातील पहिला, पीपीपी म्हणजे ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ तत्त्वावरील आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) त्यांनी भारत फोर्ज कंपनीच्या भागीदारीतून राजगुरुनगरजवळ चांडोली येथे उभारला. यापूर्वी फक्त सरकार औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारू शकत असे. पण, अण्णांनी त्यांच्या प्रयत्नातून त्या नियमाला अपवाद करून दाखविला. राज्यात अशा स्वरूपाचे अजून आयटीआय उभे राहावेत, अशी त्यांची इच्छा आहे. औद्योगिक कौशल्य असल्याशिवाय स्थानिक तरुणांना कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आता दरवर्षी हजार-दीड हजार विद्यार्थी आयटीआय प्रशिक्षित होऊन इथून बाहेर पडत आहेत.
क्रीडासंकुल, न्यायालयाची उभारणी
तालुक्यात सार्वजनिक स्वरूपाचे, खेळाचे एकही मोठे मैदान नव्हते. म्हणून त्यांनी हुतात्मा राजगुरू क्रीडासंकुलाची उभारणी केली. खरेतर त्यासाठी शासनाकडेही जागा नव्हती. त्यावर त्यांनी सांडभोरवाडी हद्दीत पाटबंधारे विभागाने संपादित केलेली, सिद्धेश्वर देवस्थानची जागा मिळविली. पाटबंधारे विभागाला त्यांनी संपादित केलेली जागा, दुसऱ्या विभागास हस्तांतरित करण्यास अडचण होती. पण, अडचणी दूर करून त्यांनी क्रीडासंकुलासाठी ही जागा मिळविली. नंतर शासनाकडून त्यासाठी निधी आणून क्रीडासंकुलही उभारले. शासनाच्या निधीव्यतिरिक्त काही कंपन्या आणि अनेकांच्या खासदार-आमदार निधीतून निधी आणून त्यांनी क्रीडासंकुलात कामे केली. अशाचप्रकारे त्यांनी खेड न्यायालयासाठी इमारत उभारली. पूर्वीची इमारत इंग्रजकालीन होती. नंतर कुणीही तिच्याकडे पाहिले नव्हते. पण, खेड न्यायालयाची इमारत असुविधांयुक्त असावी, हेच त्यांना मंजूर नव्हते. ते काम करून काही त्यांना मते मिळणार नव्हती, पण मुळातच त्यांचा दृष्टिकोन स्वच्छतेचा, निटनेटकेपणाचा, सौंदर्याचा आणि प्रगतीचा आहे. त्यांच्या या पहिल्या कार्यकाळात खूप कामे झाली. त्या सर्वांची नोंद ठेवणेही अवघड आहे.
एसईझेडला पाठिंबा
म्हणता म्हणता पाच वर्षे सरली आणि २००९ ची विधानसभेची निवडणूक लागली. पहिल्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या आधारे त्यांचा विजय निश्चित होता. पण, मोहिते पुन्हा निवडून येणार नाहीत, अशी जबरदस्त हवा पसरविली गेली. खेड तालुक्यात येऊ घातलेल्या एसईझेडला मोहिते यांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, तरी त्यांना पर्वा नाही. ते शेतकरीविरोधी आहेत, असा जोरदार प्रचार होत होता. तत्पूर्वी पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात गेली होती, हे त्यांचेच अपयश आहे, असाही सूर लावला गेला. एसईझेडमुळे प्रगती होईल, मुलांना नोकऱ्या मिळतील, पूरक उद्योग वाढतील, व्यापारउदीम वाढेल, असे मोहिते यांचे म्हणणे होते. पण, विरोधकांनी टीकेची जोरदार झोड उठविली. एसईझेडला पाठिंबा देण्यामुळे राजकीय तोटा होत आहे, याची मोहितेंना जाणीव होती, पण आपल्या राजकीय फायद्यासाठी तालुक्याचे मोठे नुकसान करणे त्यांना मान्य नव्हते. ते जीव तोडून लोकांना एसईझेडचे फायदे सांगत होते. पण, विरोधकांच्या सवंग प्रचारामुळे लोकांना त्यांचे म्हणणे पटत नव्हते. तरी तालुक्याच्या फायद्यासाठी स्वतःचा राजकीय तोटा सहन करून, ते आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. तालुक्यातील प्रचाराची ही हवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेष्ठींपर्यंतही गेली होती. त्यामुळे पक्षाकडे इच्छुकांची संख्या वाढली.
तिकीट कापले अन् दिलेही
परिणामी विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर पक्षाकडे अनेकांनी तिकिटाची मागणी केली. त्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविलेल्या स्व. सुरेश गोरे यांचाही समावेश होता. मोहिते यांच्याबाबत जनमानसात नकारात्मक भावना असल्याने त्यांना तिकीट दिले, तर खेड-आळंदीची जागा पक्षाला गमवावी लागेल, अशी पेरणी पक्षश्रेष्ठींकडे करून ठेवण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींनीही प्रसारमाध्यमांतून काहीबाही वाचले व ऐकलेले होते. तसेच, आमदार आता कार्यकर्त्यांना व जुन्याजाणत्यांना विचारत नाहीत, त्यांच्या कुटुंबीयांचा हस्तक्षेप तालुक्यात होत आहे, अशीही ओरड करण्यात येत होती. आपण कामांमध्ये एवढे मग्न आहोत, की बाकी काही करण्यास वेळच नाही, अशी आमदारांची भूमिका होती. पण, दुर्दैवाने ती समजून घेतली गेली नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड- आळंदीचे तिकीट पहिल्या यादीत जाहीरच करण्यात आले नाही. तेव्हाच काहीतरी गडबड असल्याचा संशय निर्माण झाला होता. तो खरा ठरला आणि नंतरच्या यादीत स्व. सुरेश गोरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली. गोरे समर्थकांनी फटाक्यांच्या माळा लावल्या. तालुक्यातील जनतेला आणि अण्णा समर्थकांना तो मोठा धक्का होता. सगळे जण हादरून गेले. दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोरे हे खेड तहसीलदार कार्यालयात जात होते. तोपर्यंतच पुणे- नाशिक महामार्गावरील रिद्धी-सिद्धी कार्यालयात मोहिते यांचे समर्थक गाड्या भरभरून येत होते. सगळे मंगल कार्यालय गर्दीने फुलून गेले. लोकांना बसायला जागा राहिली नाही. पाच वर्षांत अण्णांनी केलेल्या कामाची पावती लोकांनी दिली. जोशपूर्ण भाषणे झाली. बंडखोरी करण्याचा मनोदय कार्यकर्ते बोलून दाखवीत होते. घोषणांनी कार्यालय दणाणले होते. पत्रकार ते क्षण टिपत होते. उत्स्फूर्तपणे आयोजित केला गेलेला हा मेळावा इतका जबरदस्त झाला, की त्याचा आवाज श्रेष्ठींपर्यंत पोचला. एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेऊन आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन, श्रेष्ठींनी निर्णय बदलला. पुन्हा मोहिते यांना तिकीट जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यात असे पहिल्यांदाच घडले होते. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जबरदस्त शक्तिप्रदर्शन करीत दिलीपअण्णांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा निम्मा प्रचार इथेच झाला होता.
सगळे विरोधक समोर आले
मोहिते त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून त्यावेळी पंचायत समिती सभापती असलेल्या रामदास ठाकूर यांनी तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती, पण शिवसेनेचे तिकीट अशोक खांडेभराड यांना मिळाले. त्यासाठीही अण्णांनी काहीतरी जादू केल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या. मग ठाकूर अपक्ष उभे राहिले. अण्णांचे कट्टर विरोधक राजेश जवळेकर हेही अपक्ष उभे राहिले. त्यावेळी मोहिते म्हटले होते, ‘बरे झाले सगळे एकाच वेळी समोर आलेत. एकदाच निकाल लावून टाकतो.’ निवडणूक चुरशीची असल्याची हवा पसरविण्यात आली होती, पण निकाल स्पष्ट दिसत होता. मोठ्या फरकाने अण्णांचा विजय झाला. कार्यकर्त्यांनी तुफान जल्लोष केला. गुलालाच्या गोण्या रिकाम्या झाल्या. तालुक्याच्या राजकारणावर अण्णांची पकड बसल्याचे या निवडणुकीने अधोरेखित झाले.
विकासकामांचा धडाका
पुन्हा विकासकामांचा धडाका सुरू झाला. खेडला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर झाले होते. ते नव्या इमारतीत आणले गेले. चाकण औद्योगिक वसाहतीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तालुक्याच्या सर्व भागांत विकासाची कामं झाली. तालुकाभर रस्त्यांचे जाळे विणले. खेड तालुक्याचा पश्चिम भाग डोंगरदऱ्यांचा व दुर्गम असल्याने, या भागातील अनेक गावांपर्यंत पोहोचणारे रस्ते नव्हते. लोकांना डोंगरदऱ्यांतून, नदी-नाले ओलांडून जावे लागत असे. तेथे रस्ते केले. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकंदर ४२ पूल उभे करण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागात दळणवळणाची सोय झाली. त्यांनी तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष घातलं. ज्या गावात पाण्याची टंचाई होती, तिथे पाझर तलाव बांधले. शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी अनेक बंधारे, तलाव केले. एमआयडीसी, चाकण व अनेक गावांच्या पाणी योजना करण्यात आल्या. टोकावडे व कोहिंडे येथील आश्रमशाळांच्या सुसज्ज इमारती बांधल्या. धार्मिक क्षेत्रांचा व पर्यटनस्थळांचा विकास केला. गावोगावी शाळा, मंदिरे, सांस्कृतिक भवने, स्मशानभूमी, व्यायामशाळा, सभामंडप, आरोग्य केंद्र इमारती, संरक्षक भिंती, अंगणवाड्या इत्यादी कामांची तर गणतीच नाही.
शिक्षणाची पर्वणी
दरम्यान, मोहिते यांनी हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्याद्वारे डेहणे येथे पश्चिम भागातील मुलांसाठी महाविद्यालय सुरू केले. राजगुरुनगरला प्रथम लिटल चॅम्प््स इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. तसेच, मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले. पुण्याशिवाय इतरत्र कोठेही कायद्याच्या शिक्षणाची सुविधा नव्हती, म्हणून त्यांनी राजगुरुनगरला विधी महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना व विशेषतः मुलींना, कायद्याच्या शिक्षणाची पर्वणी उपलब्ध झाली.
विमानतळाचे स्वप्न भंगले
या कालावधीतच खेडच्या विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. विमानतळ झाल्यावर तालुक्याला नवी उंची प्राप्त होईल. शेतकरी व उद्योजकांना प्रगतीसाठी त्याचा फायदा होईल. तालुक्यातील व्यवसायांना चालना मिळेल, त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हजारो रोजगार उपलब्ध होतील, अशी आमदारांची भूमिका होती. पण, विरोधकांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी जातील, शेतकरी देशोधडीला लागेल, विमानतळाच्या आसपास काही विकसित करता येणार नाही, असा प्रचार सुरू करून आंदोलनांना सुरुवात केली. चांगला मोबदला मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या जाणार नाहीत व शक्यतो पड जमिनी जातील, असे पाहू, असे अण्णा समजावून सांगत होते. पण, लोकांना पटत नव्हते, कारण विरोधक भीती घालत होते. रक्त सांडण्याची भाषा करीत होते. ज्यांच्या जमिनी जाणार नव्हत्या, असे लोकच जास्त गरळ ओकून बागुलबुवा उभा करीत होते. शेवटी विमानतळ रद्द झाले. तांत्रिकदृष्ट्या तालुक्यात विमानतळ होऊ शकत नाही, असा अहवाल नंतर आला, पण खरेतर सरकार येथील आंदोलनांना वैतागले होते. कारण, लोक सर्वेक्षणाचे कामही नीट करू देत नव्हते. त्यामुळे तालुक्यात विमानतळ करायचे अण्णांचे स्वप्न भंगले. आजही ते ती सल व्यक्त करतात.
स्त्रियांच्या उन्नतीसाठी संस्था
तालुक्यातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी स्वाधार सामाजिक संस्थेची स्थापना केली. तसेच, जोगेश्‍वरीमाता महिला ग्रामीण पतसंस्था उभी केली. तालुक्यातील साडेतीन हजार स्त्रिया या पतसंस्थेच्या सभासद आहेत. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्था करतात. महिलांच्या सक्षमीकरणाचे, आर्थिक उन्नतीचे कार्यक्रम या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहेत. दिव्यांग, निराधार, परित्यक्ता, विधवा अशा वंचित स्त्रियांना त्याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखाताईंचा या कामात पुढाकार असतो.
गुरुंना सर्वोच्च स्थान
अण्णांच्या या जीवनप्रवासात त्यांचे गुरू कोकमठाण येथील सद््गुरू जंगलीदास महाराज यांचे सर्वोच्च स्थान आहे. आपल्या गुरूंवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. कोणतेही शुभकार्य असू द्या किंवा कितीही मोठे संकट असूद्या, कोणताही पेचप्रसंग असू द्या अथवा कोणतेही आव्हानात्मक कार्य असू द्या, गुरुस्मरण करून अण्णा सज्ज होतात. मग काहीही किंतू राहत नाही आणि कार्य तडीस जाते. सुरेखाताई तर प्रत्येक भाषणाची सुरुवात ‘ओम गुरुदेव’ अशीच करतात.
भावाबहिणींची भक्कम साथ
अण्णांच्या या एकंदर यशस्वी वाटचालीत त्यांच्या भावाबहिणींचा, नातेवाइकांचा, गावकऱ्यांचा, मित्रमंडळींचा आणि कार्यकर्त्यांचाही मोठा वाटा आहे. ते राजकारणात चौखूर घोडदौड करीत असताना भावांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. कामाधंद्याची जबाबदारी तिघा भावांनी पार पाडली. तसेच, अण्णांच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे, मग तो एखादा दहीहंडीचा इव्हेंट असेल, सामुदायिक विवाह सोहळा असेल, नेत्यांची सभा असेल, एखादी स्पर्धा असेल, अशा सर्वच कार्यक्रमांमागे नियोजन भावांचे आणि अलीकडे पुतण्यांचे असते. कार्यक्रम संपून जातो, लोक निघून जातात, मात्र त्यांचे भाऊ आणि जवळचे कार्यकर्ते सर्व मिटवामिटव करीत असतात. निवडणुकीच्या वेळी तर या सर्वांना रात्रंदिवस काम असते. आपल्या भावासाठी निरपेक्षपणे योगदान देणाऱ्या भावाबहिणींचा त्यांच्या वाटचालीत मोठा वाटा आहे. गेल्या निवडणुकीआधी त्यांचे थोरले भाऊ साहेबराव गेले. ते दुःख पचवून ते निवडणुकीस सामोरे गेले. त्यानंतर त्यांची लाडकी धाकटी बहीण छोट्याशा आजाराने निर्वतली. त्यांना तीव्र दुःख झाले. त्यांच्या रूपाने सर्वकाही मदत उभी करणारा समर्थ भाऊ असतानाही नियतीपुढे हार मानावी लागल्याने ते
शोकाकुल झाले.
बोलायला तिखट, जेवायला सपक
बोलण्यात अतिशय तिखट वाटणारा हा नेता जेवायला मात्र सपक आहे. मुळात ते शाकाहारी आहेत. कोणतेही व्यसन नाही. जेवण म्हणजे बऱ्याचवेळा फक्त वरणभात असतो. राहणीही अतिशय साधी आहे. अजूनही ते राजगुरुनगरला वन बीएचकेत राहतात. त्यांचा फ्लॅट एखाद्या नवख्या माणसास दाखविल्यावर, हा आमदारांचा फ्लॅट आहे, यावर त्याचा विश्वास बसणार नाही. या वर्षी मात्र सर्व आप्तपरिवाराच्या आग्रहाखातर त्यांनी राजगुरुनगरजवळ मोठा बंगला बांधला आहे. लवकरच ते तेथे गृहप्रवेश करणार आहेत.
मोदी लाटेचा फटका
आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात दिलीपरावांच्या कामाचा झपाटा खेड तालुक्याने अनुभवला होता. अशातच सन २०१४ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. पण, देशातील परिस्थिती बदललेली होती. सगळे वातावरण हिंदुत्ववादी पक्षांच्या बाजूला झुकले होते. लोकसभेला शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. खेड तालुक्याने त्यांना मोठे मताधिक्य दिले होते. तरीही विकासकामांच्या जोरावर आपण विजयी होऊ, असा दिलीपअण्णांना विश्वास वाटत होता. पण, मोदी लाटेने सगळे आडाखे उलटेपालटे करून टाकले. त्या लाटेत पुणे जिल्ह्यातील, बारामती व आंबेगाव वगळता सर्व मतदारसंघ वाहून गेले. स्वतःच्या कामावर अण्णांचा इतका विश्वास होता, की मतमोजणीच्या शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत ते मतमोजणी केंद्रात बसून होते. पण, भारतीय राजकारणात एखादी लाट सगळी गणिते बदलून टाकते. भल्याभल्यांना लाटेचा तडाखा प्रवाहाबाहेर फेकून देतो. अहोरात्र काम केलेले असतानाही अण्णांनाही पराभव पहावा लागला. आयुष्यात पुन्हा एकदा नियतीने परीक्षा पहायचे ठरविले होते.
पुन्हा जोमाने जनसंपर्क
अण्णांनी थोडक्यातच पराभव पचवून पुन्हा हळूहळू कामाला सुरुवात केली. त्यांच्या संस्थेची शाळा कॉलेज यांची घडी नीट बसविण्यासाठी त्यांनी वेळ दिला. पुन्हा जनसंपर्कला सुरुवात केली. लोकांच्या सुखदुःखात ते पूर्वीप्रमाणेच जाऊ लागले. दुसरे कोणी फार जाणारे नव्हते, त्यामुळे लोकांना त्यांचीच अपेक्षा असायची. माजी आमदार झालेले असतानाही लोक सवयीने त्यांनाच आमदार म्हणायचे. त्यांना माजी आमदार म्हणताना सूत्रसंचालकांची जीभही चाचरायची. जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून ते रात्रंदिवस लोकांसाठी कार्यरत होते. मूलबाळ नसल्याची विषारी टीकाही त्यांच्यावर विरोधकांकडून व्हायची. त्यावेळी, ‘सगळ्या तालुक्याचाच संसार आम्हाला करायचाय, म्हणून कदाचित परमेश्वराने मूलबाळ दिले नसावे,’ असे ते म्हणायचे. ‘सत्तेत असू- नसू, आम्ही तालुक्याचे पालकत्व घेतलेले आहे,’ असे सुरेखाताई नेहमी म्हणत असत.
आंदोलनांची धार वाढवली
नवीन राज्य आणि केंद्र सरकारबाबतचा लोकांचा भ्रम लवकरच दूर झाला. शेतकरी, कामगार विरोधी आणि अर्थव्यवस्थेला मारक धोरणे सरकारे राबवू लागली. त्या धोरणांतील फोलपणा लोकांपुढे मांडण्याचे काम दिलीपरावांनी सुरू केले. त्यासाठी आंदोलने हाती घेतली. महागाई कमी करणार, अशी आमिषे दाखवून सत्तेत आलेल्या लोकांनी प्रत्यक्षात महागाई वेगाने वाढविल्याचे त्यांनी सातत्याने भाववाढविरोधी आंदोलनांतून दाखवून दिले. विधानसभेनंतर झालेल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचेच पॅनेल निवडून आले. राजगुरुनगर, चाकण, शेलपिंपळगाव, पाईट, डेहणे या ठिकाणच्या बाजार आवारांची विकासाची कामे त्यांनी हाती घेतली. शेतकऱ्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. ते स्वतःही पुन्हा पुणे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून निवडून आले. बॅंकेच्या राजगुरुनगर शाखेचे रूपच त्यांनी बदलून टाकले. बॅंकेमार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. आपण सत्तेत नाही म्हणजे लोकांप्रती आपली जबाबदारी संपली, असे त्यांनी
कधी मानले नाही.
मराठा समाज आंदोलन
पाच वर्षांचा काळ खेड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने दुष्काळीच गेला. आमदार सुरेश गोरे यांनी काही उपक्रम आणि विकासकामे हाती घेतली, पण त्यांना त्यांच्याच सरकारकडून साथ मिळाली नाही. त्या सरकारात भाजपचे वर्चस्व असल्याने ते फक्त भाजप आमदारांचीच कामे करत असत. शिवसेनेच्या लोकांनी सुचविलेल्या कामांच्या फायली भिरकावल्या जात असत. त्यातच सन २०१८ मध्ये मराठा आरक्षण आंदोलन पेटले. त्या मागण्यांना दिलीपरावांचा पाठिंबा होता. पण, ते फक्त बोलके नेते नव्हते, तर कर्ते नेते असल्याने ते सक्रिय आंदोलनात होते आणि त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. या आंदोलनात चाकण येथे त्यांनी मराठा समाजाच्या रास्त मागण्याविषयी भूमिका मांडली आणि भाजप सरकारवर कडक शब्दांत टीका केली. त्यानंतर ते तिथून निघून गेले. पण, त्यानंतर आंदोलन पेटले. जाळपोळ झाली. काही दिवसांनंतर शांतता झाली. मात्र, सन २०१९ उजाडले. लोकसभा निवडणूक पार पडली. शिरूरमधून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे निवडून आले. त्यातून विरोधकांना विधानसभेचा अंदाज आला. त्यानंतर मराठा आंदोलनाला एक वर्ष होऊन गेल्यावर दिलीपराव यांच्यावर त्या आंदोलनात जाळपोळीचा कट रचल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. अचानक आलेल्या या संकटालाही ते हिमतीने सामोरे गेले. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यावर ते उच्च न्यायालयात गेले. तेथे त्यांना दिलासा मिळाला. त्यांना अटक झाली असती, तर माध्यमांमधून गाजावाजा झाला असता. त्यांची कारकीर्द धोक्यात आली असती. कदाचित ते निवडणुकीला उभे राहू शकले नसते. पण, या परीक्षेतूनही ते तरून बाहेर पडले.
झंझावात पुन्हा सुरू
अशातच सन २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लागली. दिलीपरावांना मागच्या निवडणुकीचा कौल आपल्या विरोधात नव्हता, तर त्यावेळच्या परिस्थितीचा तो परिणाम होता, हे सिद्ध करायचे होते. तसेच, तालुक्याच्या विकासाविषयी त्यांच्या मनात असलेली काही कामे पार पाडावयाची होती. त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. एव्हाना, विकास हवा असेल तर अण्णांना पर्याय नाही, हे तालुक्यातील जनतेला पटले होते. त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. त्यांनी तालुक्याचा फक्त एक प्रचारदौरा केला. समोरच्यांकडूनन पैशांचा धूर निघत होता. पण, यावेळी लोक कशालाच बधले नाहीत. त्यांनी अण्णांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. अखेर त्यांचा दणदणीत विजय झाला. तब्बल ३३ हजार मताधिक्याने ते विजयी झाले. खेड-आळंदीमधील आजवरचे हे सर्वाधिक मताधिक्य ठरले. मतमोजणी संपल्यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते भावुक झाले. एखादा माणूस विधानसभा हरला की त्याचे पुनरागमन सहसा अशक्य असते. पण, तालुक्यातील जनतेने पुन्हा संधी दिल्याने ते भारावून गेले होते. खेडच्या जनतेचे ऋण मी आजन्म विसरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि दुसऱ्याच दिवसापासून तालुक्यात अण्णांचा झंझावात पुन्हा सुरू झाला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares