भिशीच्या पैशातून गृहस्वामिनींसाठी सहलीचा बेत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
24329
मुंबई : विमानतळावरून श्रीनगरकडे रवाना होताना अडकूरचे व्यापारी, शेतकरी मित्रमंडळ.
भिशीच्या पैशांतून गृहस्वामिनींसाठी सहलीचा बेत

अडकूरमधील सर्वसामान्य व्यापारी-शेतकऱ्यांचे नियोजन; पाच दिवस श्रीनगर सहलीवर
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २६ : गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातही पर्यटनाच्या दृष्टीने विविध भागांत सहलींचे आयोजन केले जाते. परंतु, कधी कौटुंबिक, तर कधी आर्थिक अडचणींमुळे महिलांना सामावून घेतले जात नाही. फिरणे ही केवळ पुरुष मंडळींचीच मक्तेदारी असल्यासारखे वातावरण आहे. याची जाणीव झालेल्या अडकूर (ता. चंदगड) बाजारपेठेतील सर्वसामान्य व्यापारी, शेतकऱ्यांनी दोन वर्षे भिशीचा पैसा साठवून सहलीचे नियोजन केले. ते सर्वजण गृहस्वामिनींसह श्रीनगरला रवाना झाले.
अडकूर हे चंदगड तालुक्यातील छोटी बाजारपेठ आहे. व्यापार, व्यवसायाच्या माध्यमातून संघटितपणा, त्यातून आर्थिक बचतीचे नियोजन, वर्षातून एखादी सहल असे गेल्या काही वर्षांतील चित्र. सहलीवर जायचे म्हटले की व्यवसायाचे काय करायचे, हा मोठा प्रश्‍न. तेवढे दिवस दुकान बंद ठेवून चालणार नाही, ही खंत. त्यावर उपाय म्हणजे पत्नीचे सहकार्य. पतीच्या सुखासाठी सहलीच्या कालावधीत पत्नीने घर चालवायचे आणि दुकानातही लक्ष घालायचे. गतवर्षी सहलीला गेल्यावर व्यापाऱ्यांमध्ये चर्चा झाली. इतकी वर्षे आपण सहल काढतो. आनंद लुटतो. परंतु, प्रपंचामध्ये आपल्या बरोबरीने योगदान देणाऱ्या पत्नीला हे सुख कधी मिळणार? त्याचवेळी निर्णय झाला. पुढील वर्षाची सहल पत्नीबरोबर. दर महिन्याला आपल्या व पत्नीच्या नावाने प्रत्येकी एक हजार रुपयांची भिशी भरायची. यात गावातील काही शेतकरी मित्रांनाही सहभागी करून घेण्यात आले. त्याच दरम्यान कोरोना कालावधीत दोन वर्षे सहल काढता आली नाही. भिशी भरणे मात्र सुरूच होते. श्रीनगर सहलीचे नियोजन करण्यात आले. रक्कम चांगली जमा झाल्याने विमान प्रवासाचे नियोजन करण्यात आले. तीन महिने आधीच बुकिंग केल्याने तिकीटही कमी बसले. एका टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीशी संपर्क साधून पुढील नियोजन करण्यात आले. बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावरून सर्वजण श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले. यापैकी सर्वच महिलांचा हा पहिला विमान प्रवास ठरला. पाच दिवसांत श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम आदी परिसरातील विविध पर्यटनस्थळे ते पाहणार आहेत.
—————
कोट
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना सर्वसामान्य माणसाला सहल काढणे सहजासहजी शक्य होत नाही. काढली तरी आर्थिक बजेट मर्यादित असते. याच कारणास्तव स्त्रियांना बाजूला ठेवले जाते. परंतु, कुटुंबाच्या प्रगतीत त्यांचे योगदान पुरुषांएवढेच आहे. त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठीच आम्ही सपत्नीक सहलीचे नियोजन केले. त्यासाठी दोन वर्षे पैसे साठवावे लागले.
– मनोहर देसाई, अडकूर
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares