बोलून बातमी शोधा
शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष
कोल्हापूर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी सुरू आहे. वितरकांकडून खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री जादा दराने केली जाऊ शकते. शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृषी विभागाकडून ठोस कारवाईच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली आहे. शेतकरी व महिला शेतकऱ्यांना निविष्ठा, बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबत तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी. येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता जिल्हास्तरावर निवारण कक्ष स्थापन केला आहे. तक्रार करण्यासाठी कृषी अधिकारी एस. एम. शेटे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी जी. पी. मठपती यांच्याशी संपर्क साधावा.
विवेकानंद महोत्सव सोमवारपासून
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात ‘विवेकानंद महोत्सव : शोध चैतन्याचा’ उपक्रम सोमवारी (ता. ३०) व मंगळवारी (ता. ३१) होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव असून, यात विविध महाविद्यालयांतील पदवी व पदव्युतर स्तरावरील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. महोत्सवात शॉर्ट फिल्म् मेकिंग, स्टार्ट अप, अभिवाचन, इनोव्हेटीव रिसर्च आयडीयाज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वसुंधरा संवर्धन विषयावरील चित्रपट महोत्सवही होईल. महोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले आहे.
रुकडीकर ट्रस्टतर्फे रविवारी कुपोषण निर्मूलन
कोल्हापूर : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे सहयोगी संस्थांच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी भारतातही कुपोषणाची समस्या सार्वत्रिक पाहायला मिळते. यावर उपाय म्हणून रुकडीकर ट्रस्टतर्फे महाराष्ट्रभर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कुपोषण निर्मूलनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होईल. रविवारी (ता. २९) दुपारी चारला विश्वपंढरी, श्री विश्वमाधव सांस्कृतिक हॉल येथे कार्यक्रम होईल. सध्याच्या दगदगीच्या काळात समाज तंदुरुस्त आणि सशक्त असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन ट्रस्टची सहयोगी संस्था श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरतर्फे ‘चला, भारत सशक्त करूया’ हे ब्रीद घेऊन कार्य सुरू आहे.
‘छत्रपती शाहू महाराज’चे आज प्रकाशन
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त संदीप मगदूम यांनी लिहिलेल्या ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ पुस्तकाचा प्रकाशन शनिवारी (ता. २८) दुपारी बाराला राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा, न्यू महाद्वार रोड येथे होत आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंत्री आव्हाड उद्या कोल्हापुरात
कोल्हापूर : गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकासमंत्री जितेंद्र आव्हाड हे रविवारी (ता. २९) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बाराला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. साडेबाराला राजर्षी शाहू विचार संमेलनाच्या राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रमास उपस्थिती. साडेतीनला कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
Article Tags:
news