मयेवरील अविकसित आणि मागास हा ठपका पुसून काढणार प्रेमेंद्र शेट – तरुण भारत

Written by

डिचोली /रविराज च्यारी
मये मतदारसंघ हा सात पंचायतींमध्ये बहुतेक ग्रामीण भागात विखुरलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मोठा विकास घडवून आणण्यासाठी अगामी पाच वर्षांसाठी तंत्रशुद्ध नियोजन करण्यात आले आहे. माझे बंधु माजी आमदार तथा सभापती स्व. अनंत शेट यां?नी दहा वर्षे या मतदारसंघाची उदार मनाने केलेली सेवा व संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी आखलेल्या नियोजनात गेली पाच वर्षे खंड पडल्याने मतदारसंघाचा बराच विकास राहून गेला होता. परंतु आता मये मतदारसंघातील जनतेच्या आशिर्वादाने आपणावर आलेली जबाबदारी आपण कर्तव्यभावनेने पेलताना मयेवरील अविकसित आणि मागास मतदारसंघ हा ठपका पुसून काढण्यात यश मिळविणार.
मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याशी मये मतदारसंघाबद्दल त्यांच्या नियोजना बाबतीत संवाद साधला असता त्यांनी वरील भावना व्यक्त केली.
मये मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी फिरलो असता या मतदारसंघातील विविध समस्या लक्षात घेतल्या होत्या. त्या सोडवाण्याचेही आश्वासन लोकांना दिले होते. त्यानुसार आता लोक आपल्याकडे विषय मांडत आहे. या सर्व समस्या आणि लोकांचे विचार, सकारात्मक सहकार्य या जोरावर या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी नियोजन आखले आहे. या नियोजनास राज्य सरकारातील सर्व मंत्री, मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने पुढे नेणार.
या मतदारसंघातील चोडण पुलाचा विषय मोठा आहे. या पुलासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरू असून साल्वादोर द मुंद येथील दोन शेतकऱयांनी जागेची ना हरकत देण्यास नकार दिल्याने काही प्रमाणात पुलाची जागा सुमारे शंभर मीटर स्थलांतर करण्यात येणार आहे. माजी आमदार स्व. अनंत शेट यांनी आपल्या आमदारकीच्या काळात या पुलासाठी मोठे योगदान दिले होते. परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात या विषयावर कोणतीही प्रक्रिया न झाल्याने हे काम पूर्णपणे खंडित झाले होते. आता या कामाची प्रक्रिया वेगवान करण्यात आली असल्याने लवकरच या पुलाच्या प्रत्यक्षात काम पाहण्याची संधी मिळणार आहे.
चोडण गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या गावात एक पाण्याची टाकी उभारण्याचा विचार आहे. पाण्याचा पुरवठा या गावात चांगला आहे. परंतु साठा करून ठेवण्यासाठी विद्यमान टाकीची क्षमाता कमी आहे. त्यामुळे पाणी पुरवठय़ात अडथळा येतो. हि समस्या सोडविण्यासाठी पाण्याच्या टाकीची क्षमता वाढविण्याचा विचार आहे.
मये मतदारसंघातील सर्व पंचायतींमधील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी आपण आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेच पाठपुरावा सुरू केला. त्यात 2020 साली काही रस्त्यांच्या कामांची वर्क ऑर्डर्स देण्यात आलेल्या होत्या परंतु आर्थिक मंजूरी नसल्याने या कामे अडकून पडली होती. हि सर्व सुमारे 450 कोटींची कामे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात आली आहे. व सर्वच ठिकाणी मुख्य व अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या सहकार्याने या कामांना वेग मिळाला.
तसेच शिरगाव येथे देवी लईराई मंदिरच्या मागे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याची संपूर्ण कार्यालयीन प्रक्रिया नव्याने करून सदर रस्ता विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. हातुर्ली ते कुंभारवाडा या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पिळगाव गावातील जमिनदारांनी सहकार्य करून ना हरकत दिल्यास सर्व प्रलंबित अंतर्गत व मुख्य रस्ते साकारण्यात येणार. म्हावळींगे गावातील रस्त्यांच्या विषयावर सार्वजनिक बांधकाम खात्यावर न्यायालयीन खटला आहे. तो लवकरात लवकर निकाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सदर खटला सकारात्मक पध्दतीने निकाली लागल्यानंतर या गावातील निदान विद्यमान रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे.
   मतदारसंघातील जुन्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने त्या बदलण्याय येत आहे. काही भागातील प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होताच अखंडीत पाणी पुरवठा होणार आहे.
  मये गावचा स्थलांतरीत मालमत्तेचा विषय मोठा आहे. तो सोडविण्यासाठी सरकारने केलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना लवकरात लवकर आपल्या घर व जागेची सनद मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार. या विषयासाठी बैठका सुरू झालेल्या आहेत. लवकरच उच्च स्तरीय बैठका होऊन लोकांना जास्त काळ प्रतिक्षा करावी लागू नये यासाठी गंभीर लक्ष देणार. सध्या गावतील लोकांना सनदीसाठी तीन दस्तऐवज द्यावे लागतात. ते कमी करून केवळ एकच दस्तऐवज दिल्यानंतर सनद मिळवी असा प्रयत्न करण्यात आला होता. याची प्रक्रिया व विचार सुरू असून लवकरच यावर तोडगा निघणार आणि सनदी देण्याची प्रक्रिया सुटसुटीत होणार.
मये मतदारसंघातील शेतकऱयांना सर्वच बाबतीत प्रोत्साहन देताना सुरक्षित शेती व्हावी यासाठी आपण लक्ष घातले आहे. कृषी खात्याकडून शेतकऱयांना शंभर टक्के मदत व सहकार्य, मार्गदर्शन मिळावे. तसेच ज्याठिकाणी शेताला लागून असलेले बांध असुरक्षित बनले आहेत. ते सुरक्षित करण्यासाठी जलस्रोत खात्यामार्फत जोर दिला आहे. चोडण येथे या बांधांचा विषय गंभीर असून येणाऱया पावसात एका बांधामुळे रस्त्यावरून वाहणारे पाणी यापुढे वाहणार नाही व त्याचा लोकांना त्रास होणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे.
मये मतदारसंघाला चोडण ते रायबंदर, सारमानस ते सांतईस्तेव, नार्वे ते दिवाडी व पोंबुर्फा असे चार जलमार्ग लागतात. ज्यावर आजही फेरीसेवा चालू आहे. हि सर्व फेरीसेवा जलद करण्याचा प्रयत्न आपण केला. परंतु कर्मचारी कमी असल्याचे उत्तर मिळाल्याने निवृत्त कामगारांना आणण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे याविषयी मुख्यमंत्री व नदी परिवहन खात्याच्या मंत्र्यांकडे बोलणी केली आहे. कंत्राटी पध्दतीने कामगार नेमून फेरीसेवा सुरळीत करण्याचा विचार सुरू आहे. चोडण ते साल्वादोर द मुंद या दरम्यान पुल झाल्यानंतर या फेरीवरील खुप मोठा तण कमी होणार आहे. तर सारमानस ते सांतईस्तेव या दरम्यान फेरीची असलेली समस्या सोडविण्यासाठी सारमानस ते आमोणा पुलाजवळ असा बांधावरून रस्ता काढण्याचा विचार आहे. याकामी संबंधित सर्व खात्यांशी चर्चा करून शेतकरी, गावातील मंडळी यांच्याशी चर्चा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवू न देता जर हा रस्ता होऊ शकला तर त्यासाठी सरकारमार्फत सकारात्मक हात घातला जाणार आहे. हा प्रकल्प झाल्यास मोठी समस्या सुटणार आहे.
या मतदारसंघातील प्रत्येक पंचायतींमधील प्रत्येक प्रभागात स्मशानभूमी व्हावी यासाठी आपण प्राधान्याने लक्ष घालणार आहे. गावागावात स्मशानभूमीची समस्या सध्या जटिल बनत चालली आहे. मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी बेरोजगारांकडून त्यांची माहिती मागवून घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे काही खासगी कंपन्यांशी बोलणी करून मये मतदारसंघातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पध्दतीने काहींना रोजगार मिळवूनही दिला आहे. तर येणाऱया काळात आणखीनही लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहिल.
या मतदारसंघातील काही गावांमध्ये सरकारी जागा आहेत या जागांवर त्या त्या भागातील लोकांनी जर सकारात्मक सहकार्य दिले तर सरकारच्या मदतीने औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार. जेणेकरून सर्वप्रथम मये मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार. दुर्बल घटकांना व इतर लोकांना आर्थिक स्थ?र्य प्राप्त व्हावे यासाठी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण यापूर्वीपासून काम करीतच आहे. ते आता आपल्यामार्फत अखंडीतपणे चालूच राहणार. लोकांनी आपल्याला निवडून देत ठेवलेला विश्वास सार्थ ठरविताना मये मतदारसंघातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सदैव झटणार.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares