संवाद तुटला की माणसात गैरसमज निर्माण होतात – डॉ. नागराज मंजुळे – Loksatta

Written by

Loksatta

सावंतवाडी  : संवाद तुटला की माणसांत गैरसमज निर्माण होतात. माणसे दूर होत गेली की राक्षस तयार होतात. त्यामुळे वेगवेगळय़ा माणसांतील संवाद वाढला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सैराट’ फेम सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे यांनी केले. ते म्हणाले, समाजव्यवस्थेमध्ये आग लावणारा नव्हे तर आग विझवणारा महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपण आग लावणाऱ्या समूहात नव्हतो असे विचार महत्त्वाचे आहेत.
दलित आदिवासी भटके विमुक्त कष्टकरी बहुजनांच्या मुक्तिदायी राजकारणाच्या बाजूने संस्कृती जनवादी साहित्य संस्कृती संमेलन सावंतवाडीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नागराज मंजुळे बोलत होते. डॉ. मंजुळे यांच्या हस्ते  जातीची मडकी बाजूला करून माणसाला प्राधान्य देणाऱ्या प्रतिकृतीने या संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी संमेलनाध्यक्ष संध्या नरे-पवार, अध्यक्ष संपत देसाई , स्वागताध्यक्ष संजय वेतूरेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सौ. प्रतिभा चव्हाण, विद्रोहीचे माजी अध्यक्ष किशोर जाधव, दलित पँथरचे निमंत्रक सुबोध मोरे, ज्येष्ठ लेखक चंद्रकांत जाधव, अंकुश कदम आदी उपस्थित होते.
आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरीत थोर विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट विचार मंचावर महात्मा फुले अखंडाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी अध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविक, तर संजय वेतुरेकर यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, दुर्गादास गावडे, सिद्धार्थ देवलेकर यांचा सन्मान डॉ. नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाला.
डॉ. मंजुळे म्हणाले, उद्घाटन वेगळं वाटलं. मडकी ठेवून जातीची उतरंड केली. शक्तिशाली माणूस स्त्री आहे. आपला महाराष्ट्र चांगला आहे. त्याची बीजे साडेचारशे वर्षांपूर्वी रोवली गेली. शिवाजी महाराजांची ‘सुराज्य’ ही संकल्पना जिजाऊची होती. जनतेचे समतेचे राज्य असावं. शेतकरी माणूस, स्त्री सुखी असावी असा महाराजांच्या अंगी गुण. भारी राजा होता. इतरांसाठी आपले आयुष्य वेचले. दलित, वंचितांसाठी झिजले, त्यामुळे एवढं चांगलं आयुष्य मिळाले. साहित्य संमेलन नसलं तरी संवाद झाला पाहिजे. मानवी समाज सहज झालेला नाही. माणसाचं जगणं नीट करण्यासाठी जसे शोध लागले तसेच काही विचारांसाठीदेखील थोर पुरुषांनी बरीच मेहनत घेतली. महामानवांचा विचार समजून घेतला पाहिजे. संवाद तुटला तर गैरसमज निर्माण होतात. एकमेकांच्या वेगळेपणासह स्वीकारले गेले पाहिजे.
केशवसुत शिक्षक होते त्या शाळेत येता आले हे मी माझे भाग्य समजतो, असे डॉ. नागराज मंजुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, केशवसुतांच्या भूमीत मला येता आले. मला अभिमान वाटला. अनेक रत्ने, विचार या भूमीतून निर्माण झाले. तो देशाला, महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला. केशवसुतांनी माणुसकीची मूल्ये शिकवली. आग लावण्याची प्रवृत्ती आपली नाही. चांगले विचार देण्यासाठी सर्वानी एकत्र आलं पाहिजे. सावंतवाडी सुंदर आहे. गोव्यात कामानिमित्त येणं-जाणं झालं. सुंदर शहर आहे. ऐतिहासिक आठवणी, माणुसकीचे विचार दिले. त्यामुळे माणसांचा चेहरा नव्हे, तर विचार फार महत्त्वाचा असतो. आपण थोर विचारवंतांनी दिलेल्या परंपरेचे विचार वाचायला पाहिजे.
या वेळी संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार यांनी असहमतीचा उच्चार आणि बेगमपुराचा शोध या अध्यक्षीय भाषणाच्या प्रकाशनाचा शुभारंभ डॉ. मंजुळे यांच्या हस्ते झाला, तर संध्या नरे-पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. या सत्राचे सूत्रसंचालन सुरेश दास, योगेश सपकाळ, तर आभार मधुकर मातोंडकर यांनी केले. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी संपत देसाई, मधुकर मातोंडकर, मिलिंद माटे, प्रतिभा चव्हाण, अंकुश कदम, प्रा. रुपेश पाटकर, मोहन जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misunderstanding created in people due to lack of communication dr nagraj manjule zws

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares