अवतीभवती – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
अनाथ मुलींना विम्याची भेट
पुणे, ता. १२ ः भारत विकास परिषदेच्या सभासदांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनाथ मुलींच्या वसतिगृहात भेट देऊन रक्षाबंधन सोहळा साजरा केला. या प्रसंगी ५० विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली आणि सर्व मुलींना भावाच्या नात्याने सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मुलींना दरवर्षी परिषदचे सभासद रक्षा बंधनानिमित्त आणि भाऊ बीजेच्या दिवशी भेटवस्तू देतात. तसेच त्यांच्यासाठी नव्या कपड्यांचीही खरेदी करतात. दरवर्षी सर्व मुलींचा विमा उतरून त्यांना पॉलिसी दिली जाते. मुलींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून ‘आमची निराधार व एकटेपणाची भावना आता राहिली नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. परिषदेतर्फे दत्ता चितळे, मंदार जोग, आशिष मुजुमदार, समर ठकार, अमित ठक्कर आदी उपस्थित होते.
———————-
महाराष्ट्र मंडळ तालमीला लाल मातीचा खुराक
पुणे, ता. १२ ः ताक, हळद, लिंब, तेल, मीठ असा लाल मातीचा खुराक देऊन तालमीतील मातीची मशागत व्हावी आणि मातीतील कुस्तीप्रकाराला प्रोत्साहन मिळावे, या साठी मारणे परिवारातर्फे टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ तालमीला लाल मातीचा खुराक देण्यात आला. सुमारे २५० लिटर ताक, २ तेलाचे डबे, ५० किलो हळद, २ गोणी लिंब, ५० किलो मीठ असा खुराक यावेळी कुस्तीपटूंकडे सुपूर्द करण्यात आला. कुंजीर तालमीचे वस्ताद व महाराष्ट्र मंडळ तालमीतील प्रशिक्षक स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या जयंतीनिमित्त मारणे परिवारातर्फे महाराष्ट्र मंडळ तालमीमध्ये कुस्तीपटूंकडे हा लाल मातीचा खुराक देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र मंडळाचे रोहन दामले, डॉ. शैलेश गुजर, श्रीकृष्णदादा बराटे, भगवान भोर, जलतरण प्रशिक्षक विकास मोडक, प्रमोद उमरदंड, आयोजक रामदास मारणे, शाम मारणे यांसह हेमंत माझिरे, विशाल गायकवाड, महाराष्ट्र मंडळाचे वस्ताद अप्पा शिंदे, श्याम शिंदे, वरद उमरदंड, प्रमोद पवार आदी उपस्थित होते.
———————–
राहुल पोकळे राष्ट्रवादीत
पुणे, ता. १२ ः शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र कोषाध्यक्ष व राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. पोकळे हे गेली 20 वर्षांपासून पुरोगामी चळवळीत काम करत असून अनेक सामाजिक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. राष्ट्रसेवा समूह या संघटनेचे अध्यक्ष म्हणून सामुदायिक विवाह,विधवा महिला मेळावे, ३०० गावात संविधान जनजागृती यात्रा, प्रबोधन शिबिरे आदी उपक्रम त्यांनी आयोजित केले आहेत. पक्षाचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पोकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुरेश घुले, काकासाहेब चव्हाण, विकास दांगट आदी उपस्थित होते.
———–
विद्यावर्धिनी शाळा दोन करंडकाची मानकरी
पुणे, ता. १२ ः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विद्या प्रसारणीसभेचे अध्यक्ष डॉ. जी. व्ही. शिंगरे यांच्या हस्ते झाला. शिवाजीनगर येथील रामा रमण मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास राज्याच्या शिक्षण उपसंचालिका डॉ. वंदना वाहूळ उपस्थित होत्या. विद्या प्रसारणी सभेच्या विविध विद्या शाखातून उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या शाळांना करंडक प्रधान करण्यात आला. डॉ शिंगरे सरांनी १२ सायन्स साठी ठेवलेला फिरता करंडक या वर्षी विद्यावर्धिनी शाळेला प्रदान करण्यात आला. प्राचार्या रेणू सुंबळे यांनी हा करंडक स्वीकारला. तसेच इयत्ता १० वी इंग्लिश मीडियम शाळेसाठी ठेवलेला फिरता करंडकाचा मान विद्यावर्धिनी शाळेला मिळाला.
———–
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares