प्रेषित मोहम्मद आणि स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
शनिवार १३ ऑगस्ट २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:21 AM2021-10-19T05:21:41+5:302021-10-19T05:22:05+5:30
– ॲड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर
‘स्त्रिया तुमच्या जोडीदार आणि एकनिष्ठ मदतनीस असतात. त्यांच्याशी चांगले, प्रेमाचे आणि सर्वार्थाने उचित वर्तन करावे,’ असा उपदेश प्रेषित मोहम्मदांनी अखेरच्या प्रवचनात केला आहे. जीवनातील स्त्रीचे महत्त्व, तिचे जोडीदार आणि एकनिष्ठ मदतनीस म्हणून असलेले स्थान या वचनातून अधोरेखित होते. स्त्रियांना सौजन्याने उत्तम दर्जाने वागविणे हे प्रत्येक मुस्लिमाचे  कर्तव्यच आहे. 

पवित्र कुराणाचा पहिला शब्द आहे पठण करा. हे प्रकरण पुढे म्हणते, वाचा म्हणजे अल्लाहची कृपा होईल. ज्यांनी लिहायला शिकविले, जे माहीत नव्हते ते सांगितले, त्यांच्यावर अल्लाहची कृपाच होईल. पवित्र कुराणाने प्रत्येकाला वाचण्याची केलेली आज्ञा स्त्रियांसह प्रत्येकालाच असलेला शिक्षणाचा हक्कही निर्देशित करते. स्त्रियांना शिक्षणाचा, ज्ञानसंपादनाचा हक्क दिला गेला नाही तर त्या प्रेषिताच्या आज्ञेनुसार पठण कसे करू शकतील? 

इस्लाम संस्कृतीत विद्वान स्त्रियांचे दाखले पुष्कळ आहेत. ‘इफ द ओशन्स वेअर इंक’ या कार्ला पॉवर यांनी लिहिलेल्या पुस्तकात इस्लामिक विद्याशाखेचे तज्ज्ञ शेख मोहम्मद अक्रम नदवी यांचा दाखला दिला आहे. भारतात जन्म आणि शिक्षण झालेले नदवी सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकवितात. त्यांनी अनेक मुस्लीम विदुषींची चरित्रे लिहिली आहेत. त्यांची संख्या पन्नासच्या घरात आहे. हजरत आयेशा ही प्रेषिताची पत्नी. कुराण, अरेबिक साहित्य, इतिहास, सामान्य औषधी इतकेच नव्हे तर इस्लामिक न्यायशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्या स्वत: सैन्याच्या कमांडर होत्या. उंटावर स्वार होऊन लढाईत सहभागी होत असत. एवढेच नव्हे, तर त्या स्त्री हक्कांच्या धारदार पुरस्कर्त्याही होत्या. कुराणात आलेल्या अनेक कथांच्या मूळ स्रोतही  त्याच आहेत. ७व्या आणि ८व्या शतकात अनेक मुस्लीम विद्वान स्त्रिया मशिदीत पुरुष विद्यार्थ्यांना शिकवीत असत. अक्रम यांनी अशा हजारेक विद्वान स्त्रियांचा उल्लेख केला आहे. दमास्कसच्या उम-अल-दारदा या त्यांच्यापैकी एक. तत्कालीन खलिफा त्यांचा शिष्य होता. मदिनातील मशिदीत फातिमा अल बतायाहीयाय शिकवीत असत. फातिमा बिनत मोहम्मद अल समरकंदी या आणखी एक विदुषी!

पवित्र कुराण स्त्री-पुरुष असा भेद करीत नाही. जीवनाच्या विविध क्षेत्रात आणि टप्प्यावर स्त्री आणि पुरुष समान कसे आहेत हे ३३व्या प्रकरणाच्या ३५व्या कडव्यात अगदी स्पष्ट सांगितले आहे. प्रेषित मोहम्मद स्त्री शिक्षणाचे केवळ खंदे पुरस्कर्ते नव्हते, तर स्त्रियांचा मालमत्तेवरचा, निवड करण्याचा आणि विवाहविच्छेदाचा हक्कही त्यांनी सदैव उचलून धरला आहे. १४५० वर्षांपूर्वी कोणत्याही तत्कालीन संस्कृतीने स्त्रियांना हे हक्क मिळाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली नव्हती. 

अल्लाह किंवा त्याच्या प्रेषिताने केलेली आज्ञा न पाळणे हे मर्यादा ओलांडणेच होय, असे पवित्र कुराण स्पष्ट सांगते. पवित्र कुराण आणि प्रेषिताची शिकवण अशी असली तरी ती शिरसावंद्य मानण्याचा दावा करणारे तसे वागत मात्र नाहीत. उलटे वागतात. त्यावरूनच त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे. 

अलीकडे अफगाणिस्तानात जे घडले, तालिबान राजवटीत महिलांची जी काही स्थिती आहे ती पाहून या लोकांची परीक्षा केली पाहिजे. तालिबान प्रेषिताच्या सांगण्यानुसार वागत नाही, अनैतिक वागून प्रेषितांना आणि प्रेषितांच्या धर्माला बदनाम करीत आहेत हे स्पष्टच आहे.

भारतात महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू करताना जो लढा दिला तो आपण विसरू शकत नाही. त्याकाळी  सावित्रीबाईंच्या साथीला उभ्या राहणाऱ्या फातिमा शेख या एकमेव महिला होत्या. ज्ञात इतिहासानुसार रझिया सुलताना भारतातल्या पहिल्या महिला राज्यकर्त्या होत्या. त्या काळातील महिला सबलीकरणाच्या त्या प्रतीक होत्या.

जन्म दिनानिमित्त प्रेषितांची आठवण काढताना आपण त्यांचे अनुयायी आहोत असे नुसते म्हणून भागणार नाही, तर त्यांच्या उपदेशानुसार वागले पाहिजे. ‘जो एक जीव वाचवितो, त्याने अख्खी मानवजात वाचविण्याचे काम केले आहे असे मानावे’ आणि ‘विनाकारण कोणाचाही जीव घेऊ नये’ हा प्रेषितांचा उपदेश आहे.

आपल्या मुलींना शिकवून सुसज्ज करण्याची, समकालीन समाजात उपलब्ध ज्ञानाने त्यांना बळकट करण्याची शपथ घेणे हीच प्रेषितांना जन्म दिनाची उत्तम भेट ठरेल. आपल्या मुली उद्याच्या माता आणि पुढच्या पिढीच्या पहिल्या शिक्षिका आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares