ब्रिटीश सरकारने जेव्हा नाट्यपदं, पोवाडे आणि कवितांवर बंदी घातली होती… – BBC

Written by

फोटो स्रोत, National Archives of India
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची 40 वर्षं आंदोलनांनी भारलेली होती. या काळात लढे उभे करण्यात आणि लोकांचा सहभाह वाढवण्यात कविता, गाणी, पोवाडे यांचा मोठा वाटा होता. यातील बऱ्याचशा गीतांवर ब्रिटीश सरकारने बंदी आणली होती. भारतातल्या अनेक भाषांमधील पुस्तकं जप्त केली गेली. या गाण्यांमध्ये असं काय होतं की ब्रिटीशांना 'देशाची सुरक्षा धोक्यात येईल' असं वाटत होतं?
परवशता पाश दैवे, ज्यांच्या गळा लागला,
सजिवपणे घडती सारे, मरणभोग त्याला…
परवशता म्हणजे गुलामगिरी. ब्रिटीश सत्तेविरोधातलं हे नाट्यगीत. 'रणदुंदुभि' या नाटकातलं हे गाणं मास्टर दिनानाथ मंगेशकर ब्रिटीश गव्हर्नरसमोर गात होते. या गाण्याचा अर्थ गव्हर्नरने दुभाषाकडून जाणून घेतला. सुरूवातीला लोकमान्य टिळकांचा प्रभाव असणाऱ्या वीर वामनराव जोशी यांनी ब्रिटीश सत्तेविरोधात हे गीत लिहिलं होतं. ते ब्रिटीश अधिकाऱ्यांसमोरच गाऊन दाखवण्याचं धाडस मास्टर दिनानाथांनी केलं होतं. तो काळ होता संगीत नाटकांचा आणि ब्रिटीश सत्तेविरोधातल्या बंडाची ठिणगी पडण्याचा.
या गाण्यावर नंतर बंदी आणली गेली. पण वीर वामनराव जोशी थांबले नाहीत. राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना तुरूंगात जावं लागलं. आणि पुन्हा बाहेर आल्यावर त्यांनी आपली लेखणी स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी चालूच ठेवली. पुढे 1920 नंतर त्यांनी महात्मा गांधीच्या सत्याग्रह चळवळीत असतानाही त्यांनी याच लेखणीसाठी कारावास भोगला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नाट्यपदं, कविता, पोवाडे, स्फूर्तीगीतं, गाणी अशा गेय प्रकारच्या साहित्याचा खजिना तयार होत होता, त्याचा प्रसार होत होता. इतिहास संशोधक डॉ. अरविंद गणाचारी याविषयी सांगतात, "नाटकाच्या सुरूवातीला म्हटली जाणारी नांदी हा गेय प्रकार. पूर्वी नाट्यदेवतेला किंवा गणपतीला नमन करून ही नांदी होत होती. पण 1910-20 च्या दशकांमध्ये स्वातंत्र्यदेवतेला उद्देशून नाटकांची नांदी होऊ लागली. इतका प्रभाव मोठा होता."
देशद्रोहाचा आरोप ठेवता येईल असं साहित्य शोधून काढणं ही ब्रिटीशांसमोर मोठी डोकेदुखी झाली होती. 1870 मध्ये आलेल्या इंडियन पिनल कोड 124-A अंतर्गत 'सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा किंवा त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
भारतीय भाषेतून येणाऱ्या सरकारविरोधी देशद्रोही साहित्यावर नजर ठेवण्यासाठी ओरिएटर ट्रान्सलेटर म्हणून एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक 1890 पासून केली जाऊ लागली.
एरव्ही धार्मिक वाटणाऱ्या साहित्यातूनही राष्ट्रभक्तीची अभिव्यक्ती होत होती. त्यामुळे हे फारच बारकाईने पाहण्याचं काम झालं होतं.
"कवी केशवसुत यांचे वडील केशव शास्त्री दामले यांचं एक श्लोकी गीता असंच कायद्याच्या कचाट्यात सापडलं आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. बाबाराव सावरकर यांच्या 4 कविता या राम, विष्णू, कृष्ण यांच्यावर होत्या पण भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित होत्या. सावरकरांवर ब्रिटीश सरकारच्या विरोधात कट आणि युद्ध पुकारण्यास प्रवृत्त करणं असे आरोप ठेवण्यात आले. त्यांना कारावास भोगावा लागला." अशी अनेक उदाहरणं डॉ. अरविंद गणाचारी देतात.
भारतीयांच्या मनात स्वराज्याची जाणीव तयार होत असताना ब्रिटीश सरकार 'असंतोष' पसरवणारं साहित्य ताब्यात घेत होतं.
जय जय विद्यावंध गणराज, जयजय टिळक गांधिमहाराज ।।धृ०।।
स्वराज्य मिळण्या दस लाखांचे तत्व सांगतो आजीं ।।
सर्वस्वाची करि बा, होळी स्वराज्यकुंडामाजीं ।।१।।
ईश्वर व्हाया, निर्जिव फत्तर घाव टाकिचे साही ।।
वृतिच्छेदा भिऊनि बापा, स्वराज्य मिळणें नाहीं ।।२।।
हे गीत ब्रिटीश सरकारने जप्त केलेल्या 'प्रभात फेरी- मराठी अनेक कवींची राष्ट्रीय काव्य माला' या पुस्तिकेतील आहे. नोव्हेंबर 1930 मध्ये ब्रिटीश दरबारी जमा झाल्याची नोंद त्यावर आहे.
देशाच्या सुरक्षेला धोका असं समजून अशा अनेक पुस्तकांवर ब्रिटीश सरकारने बंदी जाहीर केली. 1907 ते 1940 या कालावधीत ब्रिटीशांनी बंदी आणलेलं साहित्य अनेक वर्षं भारताच्या नॅशनल अर्काईव्हजमध्ये आणि युकेमधल्या ब्रिटीश लायब्ररीमध्ये बंदिस्त असल्यासारखं होतं.
फोटो स्रोत, Hindustan Times
National Archives of India
डॉ. एन. गेराल्ड 1976 साली यांनी या वादग्रस्त साहित्यावरील धुळ झटकली आणि ते प्रकाशझोतात आणलं. पण त्यांनी प्रामुख्याने उत्तर भारताच्या संदर्भात इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषांमधील साहित्याचा वेध घेतला होता. त्याशिवाय मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, सिंधी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमधीलही बंदी असलेलं साहित्य ब्रिटीश सरकारच्या अखत्यारित जमा झालं होतं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारत सरकारने ऐतिहासिक आणि वादग्रस्त ठेव्यातील काही पुस्तिका लोकांसाठी खुल्या केला.
या जप्त केलेल्या पुस्तिकांमध्ये ब्रिटीशांनी केलेल्या अन्यायाची गीतं शाहिर आणि कवींनी रचलेली आहेत. त्यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर राजगोपालाचारी यांच्यासारख्या नेत्यांची, प्रसंगांची वर्णनं दिसतात. 'Anti-british propoganda' म्हणजेच ब्रिटीशांविरोधी प्रचार करणाऱ्या साहित्य असं त्याचं स्वरूप दिसतं.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर म्हणजे 13 एप्रिल 1919 नंतर असंतोष वाढत होता, त्याला चेतवायचं काम या गीतांनी केलं होतं. बंदी घातलेल्या गीतांमध्ये समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारांचे कवी, गीतकार यांचा समावेश सर्वाधिक होता.
जवाहरलाल नेहरूंनी 31 डिसेंबर 1929 साली काँग्रेसच्या अधिवेशनात २६ जानेवारी हा दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं. नंतर फेब्रुवारी 1930 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाची घोषणा झाली. दारूबंदी, शेतसाऱ्यापासून मुक्त, मिठावरचा कर रद्द करा, स्वदेशी मालाला संरक्षण असे मुद्दे लावून धरले जात होते. मार्च 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी दांडी यात्रा काढली. महात्मा गांधींनी कल्पकतेने, प्रतिकात्मक केलेला मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंगाची चळवळ यामुळे ब्रिटीशांच्या विरोधात वातावरण पेटायला सुरूवातच झाली.
जिल्ह्याच्या ठिकाणी, गावगावांमध्ये सत्याग्रह आणि प्रभातफेऱ्यांना उधाण आलं होतं.
देशभरातून काँग्रेसला मिळणारा पाठिंबा झपाट्याने वाढू लागला. बहिष्कार आणि रस्त्यावर उतरून निदर्शनं देखील सर्रास होऊ लागली. या असंतोषाने भरलेल्या वातावरणात प्रक्षोभक साहित्याचा मोफत होणारा प्रसार ही ब्रिटीशांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत होती.
हा सगळा आशय 1930 ते 1932 दरम्यान जप्त केलेल्या साहित्यात दिसतो.
फोटो स्रोत, National Archives of India
सकाळी म्हणजेच प्रभातफेरीला गायल्या जाणाऱ्या गीतांचा खेडोपाडी प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुस्तिका छापल्या जात होत्या. ती गीतं खाजगी वह्यांमधून घेतली जात होती त्यामुळे ती नेमकी कोणी लिहिली याचा उल्लेख त्यात सापडत नाही. त्या सुमारास या पुस्तिकांची किंमत 1 आणा होती.
स्वातंत्र्याचं आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने छेडण्यात या गीतांचं योगदान काय होतं याविषयी राजकीय विश्लेषक डॉ. चैत्रा रेडकर सांगतात.
"गांधीजींचा अहिंसक विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभात फेऱ्या समूहगीते यांचा वापर त्यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या दरम्यान आणि आधीही केला जात असे. भाषणं किंवा लेखांपेक्षा गाणी लक्षात ठेवायला सोपी असतात.
समूहाने एकत्र येऊन गाणी म्हटली, की एकात्मतेची भावना निर्माण होते आणि सकाळी ऐकलेली गाणी माणूस दिवसभर गुणगुणत राहातो. या दृष्टीने प्रभात फेऱ्या आणि त्यात म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांना आंदोलन लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने खास महत्व होतं. या पुस्तिकांवर आणि गाण्यांवर बंदी का आली हे समजून घ्यायचं तर या पुस्तिका कधी प्रकाशित झाल्या ते बघावे लागेल."
फोटो स्रोत, Hulton Archive
मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झालेले मुंबईतले आंदोलक
'मिठाची मोहीम' हे पुस्तक जून 1930 मध्ये प्रकाशित झालं. 'गांधीजींचा महामंत्र' हे पुस्तक 1930 च्या उत्तरार्धातच प्रकाशित झाले असणार. म्हणजे या दोन्ही पुस्तिका दांडी यात्रा पार पडल्यावर प्रकाशित झाल्या आहेत.
दांडी यात्रा सुरु होण्यापूर्वी या आंदोलनातून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी ब्रिटिश शासन साशंक होतं. मात्र प्रत्यक्षात मिठाच्या सत्याग्रहाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लहान-मोठे, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, शेतकरी-कामगार सगळेजण आंदोलनात सहभागी झाले. तुरुंग अपुरे पडू लागले. त्यामुळे आंदोलनाशी निगडीत सर्व गोष्टींवर बंदी घालणं, अटकाव करणं असं दबाव सत्र ब्रिटिशांनी सुरु केलं. या पुस्तिकांवरील बंदी हा याचाच धोरणाचाच भाग होता," असं विश्लेषण डॉ. रेडकर करतात.
फोटो स्रोत, Alamy
'राष्ट्रीय पोवाडा' ही पुस्तिकाही या साहित्यात सापडते. शाहिर भिकाजी सखाराम गायकवाड प्रस्तावनेत लिहितात- 'स्वराज्य-स्वधर्म या करता ज्यांनी आपले सर्व आयुष्य खर्च करून स्वतःचे प्राणही धोक्.त घातले अशा शूरवीरांचे गुणवर्णनात्मक व देशाविषयीचेच स्वाभिमान उत्पन्न करणारी जी काव्यें, ज्यांना आपण पोवाडे म्हणते तेच खरे महाराष्ट्र संगीत. आपण पूर्वी कसे होतो, आज कसे आहोत याची जाणीव उत्पन्न करण्यास या सारखे दुसरे कोणतेच संगीत नाही.'
या गीतांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना अपेक्षित असलेल्या स्वराज्याची वर्णनं केली गेली. वेगवेगळे फॉर्म वापरले गेले. आरती, भोपाळी, भजन, प्रार्थना अशा पारंपरिक प्रकारात राष्ट्रभावना चेतवणारी गाणी लिहिली गेली.
फोटो स्रोत, National Archives of India
मिठाचा सत्याग्रह केवळ पुरुषांच्या सहभागापुरता मर्यादित राहू नये तर महिलाही सहभागी झाल्या पाहिजेत म्हणून कमलादेवी चटोपाध्याय यांनी गांधीजींचं मन वळवलं होतं. पुढे सत्याग्रहात खास करून दारुबंदी आंदोलनात महिलांचा सहभाग वाढला. बंदी आणलेल्या एका स्वदेश गीतात म्हटलंय-
प्रिय भगिनींनो विनती करितसे स्वदेस प्रीती मनी धरा ।
सोडुनी द्या हौस मनींची देशी कंकणे करी भरा ।।
फोटो स्रोत, National Archives of India
खान्देशातील धुळ्यासारख्या भागात सविनय कायदेभंगाच्या चळवळीने कसं रान पेटवलं होतं याची साक्ष सांगणारा हा पोवाडा. खान्देशचे शाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे यांच्या शाहिरीने हा लढा दुमदुमला असावा.
धुळ्यातल्या मुकटी गावातल्या लोकांनी सत्याग्रहात उडी घेतली. शंकर ठकार यांच्या नेतृत्वाखाली परदेशी कापडाची होळी केली गेली. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून गुन्हा दाखल केला गेला. अशा स्वातंत्र्य सैनिकांची व्यक्तिमत्व शाहीर सिद्राम यांनी उभी केली.
एका पोवाड्यात ते म्हणतात-
दडपशाहीची गोळी सुटली, खाक तुम्ही होणार? ।
त्या गोळीस्तव ढाल छातीची कोण कोण करणार ।।
1942 च्या 'चले जाव' आंदोलनात देशातलं वातावरण पेटलं होतं. कय्यूर हुतात्मांची वीरकथा या बंदी घातलेल्या पुस्तकात एक गीत आहे. कर्नाटक-केरळच्या सीमेवरील कासारगोडातल्या कय्यूर खेड्यामधील लढवय्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना 29 मार्च 1943 मध्ये ब्रिटीशांनी फाशी दिली. त्यावेळी चाललेला खटला गाजला होता.
फाशीनंतर 'कय्यूर वीरांना लाल सलामी' हे बंगालमधल्या कॉम्रेड्सनी कवितामय संदेश लिहिला.
विजयी भाइहो तुम्हां सलामी ।
दुनिया सारी लाल रंगली ।।
मायभूमीच्या सीमेवरती ।
रक्तपिपासू फॅशिस्टांची ।।
गृध्रे पूर्वेला वावरती… ।
नसानसांतुनी तुमच्या रक्ती ।।
शत्रू विनाशी लहरे स्फूर्ती ।
तुम्हा भाइहो लाल सलामी ।।
या गीताची पार्श्वभूमी अशी होती की कय्यूरमध्ये शेतकऱ्यांची सभा होणार होती. मार्च 1941 मधील ती सभा सरकारच्या विरोधात होती. तिला दडपण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली होती. त्याचा राग शेतकऱ्यांच्या मनात होता. त्यासाठी निदर्शनं झाली आणि जंगी मिरवणूक काढली गेली. त्यात दगडफेक सुरू झाली आणि त्यात एक पोलीस कॉन्स्टेबल मरण पावला.
त्यात कय्यूरमधल्या काही जणांना अटक झाली. चार जणांवर या गुन्ह्याचा ठपका ठेवण्यात आला. आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना फाशी दिली जाऊ नये यासाठी कम्युनिस्टांनी अखिल केरळ कय्यूर दिन घोषित केला. त्यावेळी मोठी मोहीम छेडली गेली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोहिमेत कम्युनिस्टांसोबत काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या पुढाऱ्यांनीही सहभागी होत फाशी रद्द व्हावी अशा घोषणा केल्या, असं या पुस्तकात म्हटलंय.
याच पुस्तकात खटल्याविषयी सविस्तर वर्णन आहे. मंगळूरच्या सेशन कोर्टाने या खटल्याचा निकाल दिला.
''पण याच चार कय्यूर आरोपींनीच गुन्हा केला होता काय? याचें उत्तर खुद्द सेशन जजनेंच आपल्या जजमेंटमध्ये लिहून ठेवले आहे. ज्यांत अनेक लोकांनी भाग घेतला आहे अशा निदर्शनांत प्रत्यक्ष खून कोणी केला याचा निवाडा करणे अशक्य काय आहे व तो माणूस कोर्टापुढे आणलाही केला नसण्याचा संभव आहे; पण हा भयानक खून असल्यामुळे सजा देणे जरूर आहे, अशी त्यांनी स्पष्ट कबूली दिली आहे. या चार आरोपींना फांसावर लटकवताना प्रत्यक्ष त्यांनी गुन्हा केला आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याची मुळी जरूरीच नाही असे भारतमंत्री मिस्टर ॲमिरी यांनी जाहीर केले आहे. सजेचे समर्थन करताना त्यांनी ब्रिटीश पार्लमेंटात खालील उद्गार काढले- प्रत्यक्ष कोणाच्या हातून खून झाला याचा कधीही पत्ता लागला तरी हरकत नाही.''
अखेर व्हॉईसरॉयनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना फाशी झाली. या सर्व घडामोडींचं सविस्तर वर्णन म्हणजे सरकारविरोधी भडकलेल्या आगीत तेल ओतण्यासारखंच होतं. तेव्हा ब्रिटीशांनी 1943 मध्ये हे पुस्तक ताब्यात घेतलं.
चिमूरचं हत्याकांड, नंदूरबारचा गोळीबार, जळगावचा सत्याग्रह अशा अनेक ठिकाणच्या स्वातंत्र्य लढ्यांची ओळख या बंदी आणलेल्या पुस्तकांमधून होते.
ब्रिटीशांनी या गीतांवर बंदी आणताना 'देशाच्या सुरक्षेला धोका' हे शब्द वापरले होते. पण अशा सेन्सॉरशीप आणूनही आणि देशद्रोहाचे अरोप ठेवूनही हा विरोध थोपवता आला नाही, हा इतिहास. या ऐतिहासिक साहित्यावर अजूनही म्हणावं तसं संशोधन झालेलं नाही असं इतिहासकार मानतात.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares