बीडमधील गर्भपातानंतर स्त्री भ्रूण जाळून नष्ट:३५ हजारांत व्यवहार; तिघांना पोलीस कोठडी – Loksatta

Written by

Loksatta

बीड : अवैध गर्भिलगनिदान चाचणी करणारी साखळी समोर आल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलिसांनी शहरातील एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाला ताब्यात घेतले आहे. बकरवाडी (ता.बीड) येथील महिलेच्या गर्भपातानंतर स्त्री जातीचे भ्रूण जाळून नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्या तीन मुली असल्याने चौथ्यांदा पुन्हा मुलगी नको म्हणून सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी संगनमताने गर्भपात केल्याचे उघड झाले आहे. ३५ हजार रुपयांमध्ये गर्भपाताचा व्यवहार ठरला होता, असेही चौकशीतून समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील डॉ. सुदाम मुंडे यांच्या अवैध गर्भिलगनिदान व गर्भपात प्रकरणामुळे बदनाम झालेल्या जिल्ह्यात आता आणखी एक अवैध गर्भिलगनिदान करणारी टोळी सक्रिय असल्याचे बकरवाडी येथील घटनेवरुन समोर आले आहे. पोलिसांच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यापैकी फरार असलेल्या परिचारिकेने आत्महत्या केल्याची घटना घडली. अन्य चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मृत महिलेच्या पतीसह तिघांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील महत्त्वाची आरोपी असलेली अंगणवाडी सेविका मनिषा सानप हिला न्यायालयीन कोठडी दिली. पोलिसांनीच न्यायालयाकडे सानप हिला न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सीताबाई गणेश गाडे या चौथ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेच्या नातेवाईकांना मुलगी नको म्हणून त्यांनी बीडमधील एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या ओळखीने गेवराईतील अंगणवाडी सेविका मनिषा सानप यांच्याशी नातेवाईकांनी संपर्क केला. एका वैद्यक व्यावसायिकामार्फत सानप हिच्या बंगल्यामध्ये केलेल्या गर्भिलग निदानात गर्भ स्त्री जातीचे असल्याचे समोर आले होते. त्यानंतर बकरवाडी येथील जनावरांच्या गोठय़ात गर्भपात करून स्त्री जातीचे भ्रृण जवळच असलेल्या सरमाडामध्ये जाळून टाकल्याचे समोर आले आहे.
न्यायालयीन कोठडी का मागितली?
अवैध गर्भपात प्रकरणात गेवराई येथून ताब्यात घेतलेली अंगणवाडी सेविका मनिषा सानप ही या प्रकरणातील महत्त्वाची आरोपी आहे. तिच्यासह अन्य तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मनिषा सानप यांना न्यायालयीन कोठडीची तर इतरांना पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. महत्त्वाच्या आरोपीकडून माहिती घेऊन पोलिसांना गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचता येऊ शकते, तरीही तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान महिलेची मानसिकता चांगली नाही त्यामुळे पुन्हा पोलीस कोठडीच्या मागणीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female fetus burnt to death after abortion in beed transactions police custody amy

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares