मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती: गिरणा नदीवरील नवीन समांतर पुलास मंजुरी; 40 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
राष्ट्रीय महामार्गावरून जळगाव आणि धरणगाव तालुक्याला जोडणार्‍या गिरणा नदीवरील पुलास समांतर असणार्‍या बांभोरी आणि निमखेडीच्या दरम्यानच्या नवीन पुलास राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती गुलाबराव पाटलांनी दिली आहे.
वाहतूक कोंडीला आळा बसणार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – 6 ला लागून असणार्‍या बांभोरी-निमखेडी-जळगाव-आसोदा-भादली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 59 वरील 4/500 किलोमीटरवर सार्वजनीक बांधकाम खात्याच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या या पुलामुळे महामार्गावरील एकमेव पुलावर होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीला आळा बसण्यासाठी उपयोग होणार आहे.
वाळूच्या उत्खननाला चाप
सोबत वाळूच्या उत्खननालाही चाप बसणार आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून आणला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी देखील मिळणार असल्याने लवकरच याचे काम मार्गी लागणार आहे. यासोबत जिल्ह्यातील विविध मोठ्या प्रकल्पांच्या शेकडो कोटींच्या कामांना सुध्दा अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. लवकरच जुन्या हायवेच्या ठिकाणी याचे काम सुरू होणार आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जळगाव शहर ते बांभोरी गाव यांना जोडणारा गिरणा नदीवर एकच पूल आहे. दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे विस्तारीकरण झाले असले तरी पुल हा अरूंद असल्याने येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. यामुळे येथे नवीन पुलाची मागणी करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासनाकडे सादर करण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची ग्वाही तत्कालीन सार्वजनीक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी दिली होती.
दरम्यान, आज अर्थसंकल्पातील निधीच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या असून पुलाला मंजुरी देण्यात आली आहे.गिरणा नदीवरील हा नवीन पूल बांभोरी गाव आणि निमखेडी परिसर यांना जोडणार आहे. यामुळे जुन्या पुलावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. परिणामी येथील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. यासोबत, बांभोरी आणि निमखेडी परिसरातील लोकांना मुख्य पुलावर न येता सुरक्षितपणे गिरणा नदी पार करता येईल. या पुलावरून परिसरातील नागरिक आणि विशेष करून विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असून या नवीन पुलामुळे त्यांना सुरक्षितता मिळणार आहे. विद्यापीठासह परिसराला नेहमी पाण्याची समस्या भेडसावत असते. या पार्श्‍वभूमिवर, गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी साठविण्यात आल्याने विद्यापीठासह परिसराचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares