शिरूरकरांचा माणुसकीचा आधारवड स्व. बाबूराव पाचर्णेसाहेब – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शिरूरकरांचा माणुसकीचा आधारवड
स्व. बाबूराव पाचर्णेसाहेब

शिरूरकरांचा मोठ्या मनाचा माणूस, लोकनेते, माजी आमदार स्व. बाबूरावजी पाचर्णे साहेब यांच्या निधनानंतर शिरूर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली असून, त्यांची उणीव सतत जाणवत राहणार आहे. आज त्यांच्या जाण्याने संघर्षाचा झंझावात संपला असून, परोपकारी राजकारणाचा, दिलदारपूर्ण मैत्राचा एक अध्याय संपला आहे.
– प्रा. राजेराम घावटे
काही माणसे अशी असतात की, ती सातत्याने भरभरून समाजाला देत असतात. त्यांचे दातृत्व व कर्तृत्व यांची उंची हिमालयापेक्षाही उत्तुंग असते. म्हणूनच ते सर्वसामान्यांमध्ये उठून दिसतात. समाजाकरिता अशी माणसे आपली वाटतात व सर्वांची प्रेरणास्थान असतात. अशाच माणसांपैकी एक लोकप्रिय नेतृत्व स्व. लोकनेते बाबूराव पाचर्णे साहेब हे होते. शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी या लहानशा खेडेगावामध्ये दि. १ नोव्हेंबर १९५१ रोजी त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आई ताराबाई व वडील काशिनाथ यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्यामुळेच त्यांची समाजाशी नाळ जोडली गेली. शेतकऱ्यांविषयीची त्यांची तळमळ त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणूनच समाजकारणातून गावाच्या राजकारणास सुरवात केली. शेती व्यवसायाबरोबर सामाजिक कामात चुणूक दाखवली. त्यामुळे वयाच्या पंचविशीतच त्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली. त्यांनी सन १९७८ ते १९८४ या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना थेट तालुकापातळीवरील राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. सन १९८५ ते १९९३ पर्यंत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदाची संधी मिळाली. या कालावधीत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेताना भव्य बाजार समितीची उभारणी करून शेकडो तरुणांना व्यवसाय व कामधंद्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. जिद्द, चिकाटी, संयम, अभ्यासू वृत्ती अंगी असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी संयम सोडला नाही. सत्ता असो अथवा नसो, पद असो अथवा नसो सामान्य जनतेचे अश्रू पुसणे व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्रामाणिकपणे प्रयत्न करणे यात त्यांना समाधान वाटत होते. त्यामुळे जनसामान्यांत आपला माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. संयमी, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून जनसामान्यांनी आपला नेता म्हणून सन २००४ च्या निवडणुकीत विधानसभेत आमदार म्हणून त्यांची निवड केली. पाचर्णे साहेब आमदार म्हणून कार्यरत असताना विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने व पोटतिडकीने मांडत. कांद्याचा बाजारभाव असो की शेतकऱ्यांची कर्जमाफी असो याकरिता विधानसभेत आवाज उठविला. याकरिता विधानसभेत शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात पुढाकार घेतला. त्यासाठी आमदार पाचर्णे साहेब व सहकाऱ्यांना अधिवेशनकाळात निलंबित करण्यात आले. बैलगाडा शर्यती, वीजमंडळाचे प्रश्न, ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे, चासकमान धरणाच्या कालव्याची कामे, पुनर्वसनाच्या अडचणी, एमआयडीसीतील कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने व तळमळीने सोडविणार नेता म्हणून लोक त्यांच्याकडे प्रश्न मांडीत व ते प्रश्न विधानसभा व शासनदरबारी मांडून सोडवित असत. त्यामुळे प्रामाणिकपणे जनसामान्यांचे काम करणारे आमदार बाबूराव पाचर्णे सर्वसामान्यांना आपलेसे वाटू लागले. सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा व स्वभावातील गोडव्यामुळे समाजाला ते मोठ्या मनाचा माणूस, आपला माणूस व लोकनेते ही शब्दांची बिरुदे त्यांना समाजाकडून सहजरित्या बहाल झाली. समाजाकडून त्यांना शिरूर तालुक्याचे भूषण, असाधारण व्यक्तित्व, तालुक्याचे आधुनिक शिल्पकार, अचल, स्वच्छ व निर्मळ प्रतिमा, शिरूर शहराचे नाव उज्ज्वल करणारा प्रथम नागरिक, धार्मिक कार्यामध्ये तन – मन – धन अर्पण करणारा भाविक, तरुणांचा मार्गदर्शक, ज्येष्ठांचा सहकारी, सर्वसमावेशक, अमर्यादित, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, चारित्र्यसंपन्न, प्रतिभावान आमदार म्हणून पाचर्णे साहेबांनी ओळख निर्माण केली.
म्हणूनच कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषू कदाचन हा भगवदगीतेतील भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिलेला उपदेश पाचर्णे साहेबांच्या जीवनात तंतोतंत लागू होतो. कोणत्याही कामासाठी त्यांनी कसलीही अपेक्षा बाळगली नव्हती. जनसेवेचे पुण्य आगळे त्यात असे भगवान, मानवा साधून घे कल्याण… हा विचार त्यांनी
स्वभावामध्ये रूजविला होता. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले… तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा… ही संतोक्ती पाचर्णे साहेबांच्या वागणुकीशी मिळती – जुळती आहे. म्हणून त्यांनी जीवनामध्ये कर्मालाच देव मानून त्याची पूजा केली व कर्तव्याने घडतो माणूस हे दाखवून दिले. समाजाचे आरोग्य चांगले राहावे, व्यक्तींचे जीवन निरोगी व ताणतणावरहित असावे, असे त्यांना मनापासून वाटावयाचे. त्यासाठी त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत प्राणायाम व योगासन शिबिराचे आयोजन केले. स्वामी रामदेव बाबा यांच्या पतंजली योग संस्थान व प्रसाद फिटनेस सेंटरच्या वतीने योग शिबिराचे आयोजन केले. मनःशांतीसाठी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेचे आयोजन करणारे आमदार पाचर्णे साहेब यांना जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान मिळाले. पाचर्णे साहेबांचे नेतृत्व सर्वसामान्य लोकांसाठी एक समर्पित जीवन असून, निःस्वार्थी नेतृत्व, नितीधर्माचा उपासक, कर्तृत्वसंपन्न साधक याप्रमाणे पाचर्णे साहेबांची ओळख सर्वसामान्यांच्या हृदयात कायम कोरली जाईल. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगोत्री पाणी… याप्रमाणे त्यांची जीवनशैली होती.
पाचर्णे साहेबांनी नगर – पुणे हमरस्त्यावर सर्वसामान्य मध्यमवर्गाला परवडतील अशा वाजवी दरामध्ये घरे मिळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या. त्या जागेला सामान्य लोकांनी बाबूराव नगर असे नाव दिले. त्यामुळे आधी केले आणि मग सांगितले, हा संयम दाखवून दिला. माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे त्यांचा मोठा जनसंग्रह तयार झाला. जीवनाच्या वाटचालीत त्यांना अनेक चढउतार सहन करावे लागले. अनेकांनी अडथळे निर्माण केले. अनेकांनी विश्वासघात केला. परंतु ते डगमगले नाहीत. कोणाचाही मत्सर न करता सर्वांना समान वागणूक दिली. समाजातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्यांच्या विकासासाठी आपली संपूर्ण ताकद खर्ची केली. निष्काम व निःस्पृह वृत्तीने सामान्यांची कामे केली. कर्तृत्वामध्ये कधीही अहंकार दिसला नाही. सत्तेचा कधी गर्व झाला नाही. म्हणूनच सन २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपमध्ये जाऊन त्यांनी विजयश्री मिळवली. म्हणूनच महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती या उक्तीप्रमाणे अतिशय नम्रतापूर्वक व्यवहार केला. सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या हाकेला धावून जाणे, त्यांच्या अडीअडचणीमध्ये मदत करणे व विविध उपक्रमांमध्ये सणसमारंभामध्ये, मिळून – मिसळून राहणे या विविध आभूषणांमुळे समाजामध्ये आपला माणूस म्हणून ओळख निर्माण झाली. सर्वसामान्य माणूस हीच आपली ताकद असून त्यांच्यासाठी पाचर्णे साहेबांनी अनेक यशस्वी आंदोलने केली. वाहतुकीची जटिल समस्या सोडविण्यासाठी शिरूर – पुणे मार्गाचे रुंदीकरण, चासकमान धरणाच्या कालव्याचे अस्तरीकरण, शिरूर लगतच्या हायवेवरील तीन भुयारी मार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे ही त्यांच्या विकासकामांची पावती आहे. जाचक टोलवसूली विरुद्ध आंदोलने, घोडगंगा सहकारी साखर कारखाना व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नेहमी आग्रही राहिले. सर्वसामान्यांच्या इच्छा – आकांक्षा पूर्ण करणे हे आपले स्वप्न असून, त्यासाठी सदैव तत्पर होते. पाचर्णे साहेबांनी राजकीय वाटचालीत तालुक्यातील अनेक गावांत समाजमंदिरे, सभागृहे, सांस्कृतिक हॉल, व्यायामशाळा, शैक्षणिक मंदिरे, बैलगाडा घाट, रस्ते दुरुस्ती आदी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कामे झालेली आहेत. ते खऱ्या अर्थाने एक समाज तपस्वी, कर्तृत्वाचा महामेरू व अखंड कर्मयोगी असून, सुसंस्कारीत समाजाचे खरे शिल्पकार ठरले आहात. आपल्या या असामान्य व्यक्तिमत्वामुळे कुठलेही राजकीय पाठबळ नसताना समोर मातब्बर पुढाऱ्यांचा वरदहस्त असलेल्या उमेदवारांचा पराभव करून दोनवेळा निवडून आले. जनसामान्यांचे खरे आधार, विकासाचे महामेरू, कृतीला जो देई आकार असा नेता हरपला. राजकारणात जिवाला जीव देणारा सच्चा सहकारी गमावल्याची भावना राजकारणातील सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या. जात, धर्म, गरीब, श्रीमंत यांच्यापलिकडे जाऊन माणसाला आपलेसे करणारा मोठ्या मनाचा माणूस हरपला. अशा या आपल्या नेत्याला समस्त शिरूर – हवेली जनसमुदायाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares