रास्ता रोको: कांद्याच्या दरवाढीसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार रुपये भाव द्यावा, प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान तसेच नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार, १६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धातास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही, हे दुर्दैव असून शेतमालाला लागवड खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी दिला. लागवडीपासून ते काढणीपर्यंत कांदा पिकाला एकरी ८० हजार रुपये खर्च येतो. मात्र, कांद्याला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कायम राहिली आहे, असे रवी मोरे यांनी सांगितले. बाळासाहेब जाधव म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिवावर देश चालतो. त्याच शेतकऱ्याला शेतमालाच्या बाजारभावासाठी रस्त्यावर यावे लागते, हे दुर्दैव आहे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळेल, यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. गुलाब निमसे म्हणाले, कांद्याचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली. एकीकडे पावसामुळे पिकांचे नुकसान, तर दुसरीकडे कांद्याला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला.
प्रकाश देठे म्हणाले, कांद्याच्या चांगला बाजारभाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करून ठेवला होता. मात्र, शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरली. कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव मिळण्यासाठी शासन स्तरावर लक्ष घालावे, अशी मागणी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. आंदोलकाच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, संचालक सुरेश बाफणा, कांदा आडतदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश पवार, प्रमोद पवार, पिंटू साळवे, सचिन गडगुले, असिफ पटेल, कैलाश जाधव, सुनील इंगळे, दिनेश वराळे, सचिन पवळे, प्रवीण पवार, नीलेश लांबे, बोरावके सहभागी झाले होते.
नवीन सरकार विरोधात राहुरीत पहिलेच आंदोलन
महाराष्ट्रात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राहिले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येताच कांद्याच्या भावाबाबत राहुरीत पहिले आंदोलन छेडण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कांदा दरवाढीची मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares