तंत्रज्ञान क्रांतीत स्व. राजीव गांधीचे योगदान मोलाचे – तरुण भारत

Written by

चुये/प्रतिनिधी
देशात सर्व क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान महत्वाचा घटक बनला आहे. संपूर्ण देश तंत्रज्ञानाने जोडला आहे. याचे सारे श्रेय हे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे आहे. त्यांच्या योगदानामुळेच भारतात तंत्रज्ञान क्रांती घडली आहे, असे मत माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे सद्भावना दौड व शेतकरी मेळावा प्रसंगी ते बोलत होते. स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दौड व शेतकरी मेळवा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजीवजी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पार पडला.

थोरात म्हणाले, देशातील हरितक्रांती ही काँग्रेसच्या काळात झाली. देश सुजलाम सुफलाम झाला. धान्य उत्पादनात स्वंयपूर्ण झाला. यामध्ये काँग्रेसचे योगदान मोठे आहे. हे योगदान विरोधक विसरलेले आहेत, त्यामुळेच काँग्रेसने काय केलं अशी राजकीय हेतून प्रेरित होऊन विचारणा केली जात आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या तंत्रज्ञानाचा वापर आज विरोधक करत आहेत, हे त्यांच्यासाठी उत्तर पुरेसे आहे.

लोकशाहीला धोका
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, हे दुर्दैवी आहे. देशाच्या लोकशाहीला हे घातक आहे. अशी प्रवृत्ती देशाचे तुकडे करण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे या प्रवृत्तीच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा. त्यासाठीच खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो आंदोलन उभे केले आहे. त्याला साथ द्या. सत्ताधाऱयांना सत्तेचा उन्माद आल्यामुळे मुलभूत विचार घटना पायदळी तुडविले आहेत, अशी टीका ही त्यांनी केली.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी राजीव गांधी यांनी विविध उद्योग उभे केले. यामुळे लाखो युवकांना रोजगार मिळाला. त्यांचे देश हिताचे विचार सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सद्भावना दौड घेत आहोत. भाजप सरकारने काँग्रेसने उभे केलेले अनेक उद्योग बंद पाडले. फसवी आश्वासने देऊन सामान्य जनतेला लुटण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे देशात महागाईचा कहर झाला आहे.

आम्ही फक्त कॉंग्रेसचा विचार जोपासला
राजकारणामध्ये अनेक चढउतार येतात सत्तेसाठी अमिषे दाखवली जातात मात्र आम्ही त्याला बळी न पडता फक्त काँग्रेस म्हणजेच काँग्रेस हाच विचार जोपासला. आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्हाला सामान्य जनतेची काम करण्याची संधी मिळाली हा विचार आम्ही कायम जोपासलेला आहे. त्यामुळेच विरोधकांनी सुद्धा आमची पक्षनिष्ठा कशी आहे हे दाखवून दिले आहे, असे आमदार पीएन पाटील यावेळी म्हणाले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात माहिती तंत्रज्ञान क्रांती घडवली. त्यामुळेच आज देशाच्या खेडोपाडय़ात मोबाईल पोहचला. त्यांनी युवकांना मताचा अधिकार देऊन राजकीय संधी उपलब्ध करून दिली.

थोरात हक्काचे पाहुणे
सद्भावना दौड आणि राजीव गांधी जयंती या निमित्ताने बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी चार वेळा उपस्थिती दर्शवली आहे. त्यांना विचारूनच कार्यक्रमाचा पाहुणा ठरवला जातो, असे पी एन पाटील यांनी सांगताच बाळासाहेब थोरात आणि कोल्हापूर हे नातं यानिमित्ताने किती घट्ट आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे थोरात हक्काचे पाहुणे ठरले, अशी चर्चाही कार्यक्रमस्थळी होती.

भाजपवर सर्वांचेच तोंडसुख
देशात आणि राज्यात भाजपच्या दबाव तंत्राच्या लोकशाहीला घातक ठरणाऱया राजनीति बदल प्रमुख पाहुण्यांनी सडकून टीका करून तोंडसुख घेतलं. आणि लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडोला साथ द्या, असे सर्वानी आवाहन केले.

या कार्यक्रमाला आमदार जयंत आसगावकर, राजू आवळे, माजी आमदार बजरंग देसाई, श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, डॉ महेश पाटील (कराड), यशवंत हाप्पे, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील, बाजीराव खाडे, सचिन चव्हाण, उदय पाटील कौलवकर, जिल्हा बँक संचालिका ऋतिका काटकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे, रसिका पाटील त्यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares