जंतरमंतरवर आजपासून पुन्हा शेतकरी आंदोलन – Tarun Bharat – तरुण भारत

Written by

प्रलंबित मागण्यांसाठी बळीराजा दिल्लीत एकवटणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील जंतरमंतर येथे सोमवारपासून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करणार आहेत. किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीला परतण्याचा विचार करत आहेत. या आंदोलनासाठी शेतकऱयांनी दिल्ली गाठण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना रोखण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी हरियाणाच्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड्स लावले आहेत. येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
जंतर-मंतरवर सोमवारी एकवटण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली-हरियाणाला जोडणाऱया टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड्स उभारण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली. आंदोलनासाठी शेतकरी दिल्लीत पोहोचू लागले आहेत. गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची हकालपट्टी, तुरुंगात असलेल्या निरपराध शेतकऱयांची सुटका, एमएसपी हमी कायदा, वीज दुरुस्ती विधेयक 2022 मागे घेण्यात यावे, उसाचे बिल वेळेत अदा करणे यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा आग्रही आहे.
राकेश टिकैत यांना रोखले
दिल्लीत येणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनाही दिल्ली पोलिसांनी रविवारी गाझिपूर सीमेवर रोखले. राकेश टिकैत यांना आपल्या काही समर्थकांसह दिल्लीला जायचे होते. पोलिसांच्या कारवाईनंतर टिकैत समर्थकांनी रस्त्यावर बसून विरोध करण्यास सुरुवात केल्यामुळे पोलिसांनी सर्वांना मधुविहार पोलीसस्थानकात नेत काहीवेळ चौकशी केली. त्यानंतर सर्वांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा गाझिपूर सीमेवर सोडले.
केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांना हटविण्याबरोबरच शेतकरी मालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्यासाठी कायदा लागू करणे या दोन मुख्य मागण्या शेतकरी संघटनांनी केल्या आहेत. तसेच अन्य मागण्याही सरकारला कळविण्यात आल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी सांगितले होते. संयुक्त किसान मोर्चाने गेल्या आठवडय़ातही लखीमपूर शहरातील राजापूर मंडी समितीसमोर धरणे सुरू केले होते. उत्तर प्रदेशबरोबरच अन्य काही राज्यांमधील शेतकरीही दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
6 सप्टेंबरला दिल्लीत महत्त्वाची बैठक
राकेश टिकैत यांनी देशभरातील शेतकऱयांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठय़ा देशव्यापी आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. देशव्यापी आंदोलन केव्हा, कुठे आणि कसे होईल याबद्दल संघटनेकडून योग्यवेळी माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. येत्या 6 सप्टेंबरला दिल्लीत होणाऱया बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. तत्पूर्वी टिकैत यांच्यासह अन्य नेत्यांकडून बैठकांचा सिलसिला सुरू ठेवण्यात आला आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares