नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणास विरोध – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सोमेश्वरनगर, ता. २२ : नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेती, पिण्याचे पाणी, भूजल यावर गंभीर संकट ओढवणार आहे. त्यामुळे शेतकरी कृती समिती अस्तरीकरण होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे. तसेच याबाबत नीरा (ता. पुरंदर) येथे लक्ष्मीनारायण कार्यालयात ३० ऑगस्टला दुपारी २ वाजता आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
नीरा डावा कालव्याचे पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात अस्तरीकरण होणार आहे. कालव्याच्या तळापासून प्लास्टिक आच्छादन करून प्लास्टर होणार आहे. त्यामुळे बोअर, चारी आणि विहिरींचे पाणी कायमस्वरूपी जाईल. शेती धोक्यात येईल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या निर्माण होईल. दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री संकटात येतील. वन विभागातील अनेक वन्यजीव आणि झाडे नष्ट होतील. तसेच कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून कालव्यालगत विहीरी खोदून पाइपलाइन करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असे धोके कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडले आहेत. याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन विरोध केला आहे.
अस्तरीकरणाचे काम बंद करण्याबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. बारामती शहरामध्ये कालवा अस्तरीकरण झाल्यानंतर आत्तापर्यंत कालव्यात घसरून ५ मृत्यू झाले आहेत. सर्व अस्तरीकरण झाल्यास असंख्य बळी जातील, अशी भीती काकडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच शहरातील अस्तरीकरण झाल्याने दोन किलोमीटर पर्यंत विहिरी, बोअर बंद झाल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.
कारखाना अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा
पुरंदर, बारामती व इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतले जाते व अनेक सहकारी साखर कारखाने त्यावर चालतात. कारखान्यांनी कर्ज काढून विस्तारीकरणही केले आहे. अस्तरीकरण झाल्यास भविष्यात या कारखान्यांचे उसक्षेत्र कमी होऊन गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे कारखान्यांनी अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक होते. मात्र, सगळे अध्यक्ष गप्प बसलेले आहेत. त्यांनी पुढाकार घ्यावा व शेतकऱ्यांनी वार्षिक सभांमध्ये अस्तरीकरण विरोधात ठराव घ्यावा, असे मत सतीश काकडे यांनी मांडले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares