Constitution Day संविधान दिवसाचे भाषण, महत्त्वाचे दहा मुद्दे – Times Now Marathi

Written by

10 Points Students Can Include In Constitution Day Speech, Essay नवी दिल्ली: भारतात १९४९ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. देशाच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. या घटनेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने संविधान भारतात अंमलात आले तो दिवस २६ जानेवारी १९५० हा आहे. यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि २६ नोव्हेंबरला संविधान दिन (संविधान दिवस) साजरा करतात. यंदा शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतात संविधान दिवस साजरा होईल. 
भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले. देशाच्या संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू केले. या कामासाठी स्थापन केलेल्या समितीचे नेतृत्व देशाचे त्यावेळचे कायदामंत्री डॉ. भिमराव आंबेडकर करत होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. पुढे डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. 
डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील समितीने प्रदीर्घ चर्चेअंती तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेसमोर चर्चेसाठी आला. काही बदलांनंतर संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने २६ जानेवारी १९५० पासून संविधान अंमलात आले. 
संविधानाच्या प्रस्तावनेत भारत सार्वभौम लोकशाही गणराज्य असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. पुढे इंदिरा गांधी यांचे सरकार असताना घटनादुरुस्ती करुन प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला. यामुळे भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा उल्लेख केला गेला.

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय : विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य : दर्जाची व संधीची समानता : निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून : आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares