कशासाठी ? फोटोसाठी..!: काहिलीत सावली टोपलीची… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
भर दुपारची वेळ. ऊन मी म्हणत होते. गाडीतून प्रवास करताना, एका गावात आठवडी बाजार भरलेला दिसला. खाली उतरून बाजारात शिरले. प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे, गरजेनुसार, ऐपतीप्रमाणे पसंतीला उतरेल अशा वस्तूंची निवड करत होता. बहुतेक दुकाने लग्नातील जेवणावळीच्या पंगतीची आठवण करून देत होती. लहान-मोठ्यांची गर्दी खूप होती. चालायला जागा नव्हती. मालाच्या दर्जानुसार दुकानं थाटलेली होती. कापड विक्रेते व हलवाई यांच्या दुकानांवर आकर्षक छते होती. छोट्या जागेत का होईना पण मांडणी आकर्षक होती. विशेषकरून कापड व हलवायांची दुकाने ग्राहकांना आकर्षित करत होती. हलवायांच्या दुकानात आकर्षक रंग टाकून व योग्य मांडणी करून ठेवलेले गोड-तिखट पदार्थ मोठ्या ताटात दिसत होते. जरा पुढे आले तर काही शेतकरी स्त्रिया-पुरुष आपल्या शेतात पिकवलेला माल मिळेल त्या जागेवर गोणपाटावर ठेवून बसलेले होते. काही भाज्या तर मी पहिल्यांदाच पाहत होते.
उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून काहींच्या डोक्यावर कापडाची धुडकी दिसत होती. अधूनमधून गारीगारवाला सायकलच्या कॅरिअरवर ठेवलेल्या मोठ्या पेटीसह कसरत करत गर्दीत गारीगार..गारीगार.. म्हणून आरोळी देत होता. अधूनमधून विक्रेत्यांचे संमिश्र आवाज येत होते. बाजारात शेवटी कोण बसते हे पाहण्यासाठी पुढे सरकले तर बाजाराच्या शेवटी काही जुन्या लोखंडापासून बनवलेल्या गृहोपयोगी व शेतीस पूरक अशी अवजारे विकणाऱ्यांची दुकाने दिसली. त्याच्याच रांगेत टोपल्या, चपला एवढेच नाही तर सुकी-ओली मासळी विकणारे व मांस विकणाऱ्यांची दुकाने होती. त्यांच्याकडे माल ठेवण्यासाठी साधे गोणपाटही नव्हते. उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून डोक्यावर टोपली घेतलेली आजी मला दिसली. मी तिचा फोटा क्लिक केला. बाजार पाहून झाल्यावर गाडीत बसले आणि मला गावगाडा आठवला. आजही लोकांच्या लेखी कमी दर्जाची वस्तू निर्मिती करणाऱ्यांची घरे ही गावकुसाबाहेर म्हणजेच गावाच्या शेवटच्या रांगेत आहेत.
प्रियंका सातपुते संपर्क : ७३८५३७८८५६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares