दुरदर्शन अँकर, टिकटॉक स्टार ते राजकीय नेत्या; कोण होत्या सोनाली फोगट ज्यांच्यावर भाजपाने दिली होती मोठी जबाबदारी – Loksatta

Written by

Loksatta

प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. त्या ४१ वर्षांच्या होत्या. या वृत्तामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. टिकटॉक स्टार, अभिनेत्री तसेच राजकीय नेत्या अशी त्यांची मोठी कारकीर्द आहे. त्यांनी ‘बिगबॉस’या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतलेला आहे. दुरदर्शनवरील अँकरिंगसह त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. राजकारणात आल्यानंतरदेखील त्या वेगवेळ्या कारणांमुळे चर्चेत राहिल्या.
हेही वाचा >> Sonali Phogat : टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १०७९ रोजी हिसार जिल्ह्यातील भूथान या छोट्याशा गावी झाला. त्यांचे वडील शेतकरी असून त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. हरियाणामधील फतेहाबाद येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले. फोगट यांनी हरियाणा येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यांनी २००६ साली व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातील हिसार येते त्या दुरदर्शनमध्ये काम करत होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची भाजपा महिला मोर्चाच्या राष्टीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांनी अँकरिंग सोडून राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवायला सुरुवात केली.
हेही वाचा >> मुस्लीम मंत्र्यासोबत मंदिरात गेल्यामुळे वाद, नितीशकुमार यांनी माफी मागण्याची भाजपाची मागणी
यासोबतच त्यांनी २०१६ साली मुंबईतील चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्यांनी अनेक हरियाणवी चित्रपटांमध्ये काम केले. जिम्मी शेरगील, रवी किशन यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केलेली आहे. २०१९ साली ‘द स्टोरी ऑफ बदमाशगड’ या वेबसीरीमध्येही त्यांनी भूमिका केली. २०२० साली रिअॅलिटी शो बीग बॉसच्या सिझन १४ मध्ये भाग घेतल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या. वाईल्ड कार्ड कन्टेस्टंट म्हणून त्या ८१ व्या दिवशी बीग बॉसच्या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा >> “भाजपा पक्ष मुस्लिमांचा द्वेष करतो, आमदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मोदी समर्थन करतात का?” असदुद्दीन ओवैसींचा परखड सवाल
त्यांची राजकीय कारकीर्दही तेवढीच वादळी ठरली. त्यांनी २०१९ साली हरियाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर येथे काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी लोकांना ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्याचे आवाहन केले. तसेच या घोषणा जो देणार नाही, तो पाकिस्तान देशातील असेल, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. या निवडणुकीत फोगट यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा >> तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दिल्लीतील अबकारी कर धोरण गैरव्यवहारात नाव, भाजपाने केला गंभीर आरोप
या वादासोबतच एका सरकारी अधिकाऱ्याला चपलेने मारतानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ५ जून २०२० रोजी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन त्या अधिकाऱ्याकडे गेल्या होत्या. मात्र यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला चपलेने मारले होते. भाजपा पक्षात असताना त्यांनी झारखंड, मध्य प्रदेश येथे आदिवासी भागासाठी काम केले. या कामाची दखल घेत भाजपाने त्यांना हरियाणा, दिल्ली तसेच चंदीगड येथे आदिवासी विभागाचे प्रमुखपद दिले होते.
मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader tik tok star sonali phogat died by heart attack know who is sonali phogat prd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares