नेतृत्व: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाळीस वर्षांच्या कष्टातून उभे राहिलेले नेतृत्व – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
एकनाथ शिंदे हे थेट मुख्यमंत्री झाले नाहीत. ते ४० वर्षांच्या कष्टातून तयार झाले आहेत. लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे, की आमच्या समस्या सुटतील. या मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी कुण्या पीएची अपाॅइन्टमेंट लागत नाही. कुणालाही ते भेटतात. लोकांच्या समस्या लगेच सुटतात. निवेदन देण्याच्या गोष्टी तर त्यांच्या डिक्शनरीत नाहीत, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. ते आणि आमदार प्रवीण दरेकर वाशीम जिल्ह्यात खासदार भावना गवळी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी अकोल्याहून जात असताना मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.
शिंदे म्हणाले की, सर्वच स्तरातून मुख्यमंत्री शिंदेंना समर्थन आहे. जे लोकांना हवे होते ते सरकार आता आले आहे. सर्वसामान्यांचा आता मुख्यमंत्री आहे. जी कामे अडीच वर्षात झाली नाहीत, ती दोन महिन्यात झाली आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरू आहे. फक्त घोषणा केली नाही तर अंमलबजावणीचे काम झाले आहे. आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, की विरोधकांना विरोधाचे काम करू द्या आम्ही आमचे काम करत राहू. वाशीमच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना न्यायालयाने क्लीनचिट दिल्याने त्यांच्या कार्यक्रमास जाण्यास काहीच हरकत नाही, असेही दरेकर म्हणाले. शिंदे गटाचे गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हा प्रमुख अश्वीन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले.
हिंदू सणांसाठी आता बंदी नाही: एकनाथ शिंदे हे तळागाळातून आलेले मुख्यमंत्री आहे. यांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही, तर कुठल्याही कामासाठी लोकांना चकरा माराव्या लागत नाहीत. ते ऑन द स्पॉट काम करतात. अडीच वर्षांपासून हिंदू सणांवर आलेली बंदी शिवसेना भाजप सरकारने उठवली आहे. होळी, दिवाळी, दहीहंडी आणि इतर हिंदू सणांसाठी आता बंदी नाही.
ठाकरेंवर घणाघात; रिक्षावाला ‘सीएम’ झाल्याचे शल्य
शिवसेना ही टॉवेलवाला, टी-शर्टवाल्यांनी उभी केली. पुढे नेली. नाही तर शिवसेना वाढली नसती. मर्सिडीझमधून शिवसेना वाढू शकत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. घाम गाळावा लागतो. मतदारसंघात मर्सिडीझमध्ये फिरून हे होत नाही. त्यासाठी रिक्षावालेच लागतात, त्यासाठी पानटपरीवालेच लागतात. एकनाथ शिंदेंना रिक्षावाला म्हणून हिणवले जाते. महाराष्ट्रात रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होऊ शकत नाही का. रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. सोन्याचा चमचा घेऊन आले तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का, शिंदे साहेबांनी ते दाखवून दिले, असा घणाघात श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंवर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares