राजाराम पैंगीणकर : स्त्रियांना देवदासी प्रथेच्या जाचातून मुक्त करणारा ‘राजाराम’ – BBC

Written by

'मी कोण?' हा तुम्हा-आम्हाला केवळ दोन शब्दांचा एक प्रश्न वाटेल. पण याच प्रश्नानं भारताच्या सामाजिक इतिहासात एक क्रांती घडवली. त्या क्रांतीचीच ही गोष्ट आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ. भारतावर ब्रिटिशांचं आणि गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेतृत्वाची धुरा लोकमान्य टिळकांच्या खांद्यावर होती. टिळकांचं 'केसरी' वर्तमानपत्र एव्हाना प्रसिद्ध झालं होतं.
पुण्याहून असं काहीतरी वर्तमानपत्र निघतं, याची चाहूल गोव्यातल्या पैंगीण नावाच्या छोट्याशा गावात राहणाऱ्या राजाराम या मुलाला लागली. राजारामनं ते वर्तमानपत्र मिळवण्यासाठी आटापिटा सुरू केला. बचत केलेली रक्कम त्याकामी लावली.
कुणा नातेवाईकाकडे ते वर्तमानपत्र असल्याचं राजारामला पत्ता कळालं. त्यानं तातडीनं पुण्याला 'केसरी'च्या कार्यालयात मनी ऑर्डर धाडली. ती पोहोचायला 15 दिवस आणि वर्तमानपत्र पैंगीणमध्ये दाखल व्हायला 15 दिवस, असा महिन्याचा कालावधी गेला.
ब्रिटिशांविरूद्ध बेधडकपणे लिहिणाऱ्या 'केसरी'मुळे छोट्या राजारामला आपणही पोर्तुगीजांच्या म्हणजेच परकीयांच्या राजवटीत राहतोय आणि याविरूद्ध बोलायला हवं, याची जाणीव झाली. पण असं काही बोलण्याच्याआधीच त्याच्यासमोर वेगळंच वाढून ठेवलं होतं. मात्र, त्यातूनच पुढे गोव्याच्या भूमीवर समाजक्रांती घडली.
फोटो स्रोत, PIB
झालं असं की, पुण्याहून पोस्टानं वर्तमानपत्र गोव्यातील काणकोणच्या पोस्ट ऑफिसमध्ये आलं. वर्तमानपत्राच्या पाकिटावर 'राजाराम रंगाजी पैंगीणकर' असं नाव होतं. या पोस्ट ऑफिसमध्ये विसू शेणवी नगर्सेकर नावाचे गृहस्थ काम करत असत. त्यांनी रंगाजी शेणवी भेंडे यांना जाऊन सांगितलं की, "राजाराम तुमचं नाव लावून पुण्याहून वर्तमानपत्र मागवतो."
यानंतर रंगाजी शेणवी भेंडे थेट राजारामच्या घरी आले. राजारामच्या आईकडे रंगाजींनी तक्रार केली आणि विचारलं, माझं नाव लावून राजारामनं वर्तमानपत्र मागवण्याचं कारण काय?
राजाराम आईच्या बाजूलाच होता. त्याला परिस्थिती लक्षात आली, त्यानं तातडीनं सारवासारव करत म्हटलं, "आईचं नाव रंगा आणि देशावर गाणारणीस नावापुढे 'जी' लावतात म्हणून 'रंगाजी' लावलं आहे."
त्यावर रंगाजी शेणवी भेंडे म्हणाले, "मग असं असेल तर आणखी एक 'जी' लाव."
लहान मुलांनी शौच केल्यास त्याला 'जीजी' म्हणतात, हा त्यांच्या बोलण्यातला खोचक उद्देश लक्षात येऊन राजारामची आई रडू लागली. त्यावेळी राजाराम म्हणाला, "आई, केवळ व्यसनपूर्तीसाठी तुझ्याकडे येणारे, आमच्या लज्जेचं रक्षण न करणारे, आपल्या रक्तास न ओळखणारे असे हे नामधारी बाप. यांना आम्ही बाप तरी का म्हणावे?"
राजारामची आई म्हणजे रंगा. तिला चौदाव्या वर्षीच पैंगीणच्या रंगाजी शेणवी भेंडे या तरुणानं कायमची 'ठेवून' घेतली होती.
आई ज्याला आपला बाप सांगते, तो बाप आपल्याला त्याचं नावही लावू देत नसल्याचं पाहून राजाराम संतापला. त्या दिवशी राजारामला पडलेला प्रश्न म्हणजे – 'मी कोण?'
याच दोन शब्दांच्या प्रश्नांनी राजारामच्या बंडाला सुरुवात झाली.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
राजाराम पैंगीणकरांनी ज्या प्रथेविरोधात बंड केलं, ज्या प्रथेमुळे त्यांची आई आणि अशा अनेक स्त्रिया कुणा-ना-कुणाकडे देवाला वाहिल्याच्या नावाखाली रखेल म्हणून राहत होत्या, ती प्रथा नेमकी काय होती, हे आधी जाणून घेऊ. राजाराम पैंगीणकरांनी स्वत:समोर उपस्थित केलेल्या 'मी कोण?' या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीचं गांभीर्य आणि महत्त्व यातून लक्षात येईल.
देवदासी नामक प्रथेच्या नावानं स्त्रीला देवाला वाहिली जाई म्हणजे, स्त्रीचा देवाशी लग्न लावून दिला जाई. या विधीला 'शेंसविधी' म्हणत आणि देवाशी लग्न लावून दिलेल्या स्त्रीला 'देवदासी' म्हटलं जाई.
लेखिका अमिता नाईक त्यांच्या 'गोष्ट पैंगीणकरांच्या संघर्षाची' या पुस्तकात लिहितात, "देवदासी म्हणजे देवपत्नी, असं औपचारिकरित्या मानले जात असले, तरी ती गावातल्या कोणाचीही भोगदासी असे. धर्माच्या नावावर हा किळसवाणा व क्रूर प्रकार चालत असे."
"देवदासी ही संरजामशाहीतील देहविक्रयाची पद्धत होती. तिची सुरुवात भक्तिभावातून, तंत्रसाधनेतून किंवा अन्य कशातून झालेली असली, तरी बटबटीत पुरुषसत्ताक शोषणाची ती मूर्त रूप होती," असंही पुढे अमिता नाईक लिहितात.
देवदासीला मुले होत. बाप नसलेल्या मुलांची 'देवळी' हीच जात मानली जाई. त्यांच्या भावी पिढ्यांचीही हीच जात मानली जाई.
गोवा, सिंधुदुर्ग, कारवार भागातल्या अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात देवदासी समाजाची घरं किंवा मुळं आजही आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक छायाचित्र
कलावंत, देवळी, भाविणी, पेर्णी, बंदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समूहाला देवदासी असं नाव मिळालं होतं. देवदासी समाजातल्या या पोटजातींतही मोठ्या प्रमाणात उच्चनीच भेदाभेद होते. या भेदभावांमुळे धर्माच्या नावाने त्यांचं शोषण करणं सोपं होतं. गावातले जमीनदार देवदासींना रखेल म्हणून वागवत. प्रामुख्याने त्या काळात या परिसरात गौंड सारस्वत ब्राह्मण या जातीसमूहातल्या जमीनदारांकडे सर्व सत्ता एकवटली होती.
"गोव्याचा इतिहास माहीत आहे, तेव्हापासून देवदासी प्रथेचे संदर्भ सापडतात. महाराष्ट्राच्या इतर भागातल्या मुरळी, जोगतिणींपेक्षा हा समाज अधिक स्थिर होता. तो कधीच भिक्षेकरी नव्हता. या सगळ्या समाजांत बायकांना देवाला वाहण्याचा रिवाज होता," असं पत्रकार सचिन परब सांगतात.
या देवदासी प्रथेबाबत अधिक विस्तृतपणे सचिन परबांनी विविध ठिकाणी विविध निमित्तानं लिहिलंय.
त्यांच्या माहितीनुसार, "सणाउत्सवांना देवळात तर लग्नमुंजींच्या निमित्ताने श्रीमंतांच्या घरात कलावंतिणींचं नाचगाणं होत असे. त्यातून सर्रास देहविक्रय होणं स्वाभाविक होतं. खरं तर या प्रथेमुळे ख्रिश्चनांचं नैतिक अधःपतन होत असल्याचा ठपका ठेवत चर्चने मोहीम उघडली होती. त्यामुळे गोव्याच्या व्हॉईसरॉयने सतराव्या शतकाच्या शेवटी कलावंतिणींना गोव्याबाहेर हाकलवण्याचा हुकूमही काढला होता.
"नंतर उच्चवर्णीय जमीनदारांनी कार्यक्रमांसाठी गोव्याबाहेरून कलावंतिणी आणण्याची परवानगी मिळवली. पुढच्या शंभर वर्षांत या पळवाटेचं मोठं भगदाड झालं. ब्रिटिश भारतात स्त्रीशोषणाला कायद्याने प्रतिबंधांची सुरू होत असताना गोव्यात मात्र देवदासींच्या शोषणाला उपयुक्त ठरेल असे बदल कायद्यात केले गेले. देवदासी ही हिंदूंची धार्मिक प्रथा असून त्यात पोर्तुगीज सरकारने ढवळाढवळ करणं योग्य नाही, असं या जमीनदारांनी पोर्तुगीजांच्या गळी उतरवून शोषणाचा जणू परवानाच मिळवला.
"त्यानंतर पुढचं एक शतक देवदासी समाजाचा सर्व स्वाभिमान ठेचून काढण्याचा इतिहास आहे. शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक असं सर्व प्रकारचं दमन करून या समाजाचं सत्त्व संपवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. महिलांच्या शोषणावर कुटुंब जगू लागलं. त्यामुळे कुटुंबांचा, समाजाचा नैतिक आत्मविश्वास संपला होता."
हाच संपलेला आत्मविश्वास जागवण्याचं काम राजाराम पैंगीणकरांनी केलं. कोण होते हे राजाराम पैंगीणकर? त्यांना देवदासी समाजातील समाजक्रांतीचे नायक का म्हटलं जातं?
गोव्यातल्या काणकोण तालुक्यातील पैंगीणमध्ये रंगा नावाच्या कलावंतिणीच्या पोटी राजाराम पैंगीणकरांचा जन्म झाला. देवदासीला कलावंतीणही म्हटलं जाई. राजाराम पैंगीणकरांची आई देवदासी म्हणजे देवाला वाहिलेली कलावंतीण होती.
राजाराम पैंगीणकरांची आई मूळची सदाशिवगड काजूवाडा येथील शेणवी वाघ घराण्यातील विधवेच्या पोटची मुलगी.
आपली लज्जा रक्षण करण्यासाठी त्या विधवेनं आपला पोटचा गोळा पैंगीण येथील पुतळाबाई नावाच्या कलावंतिणीस दिला.
राजाराम पैंगीणकर त्यांच्या 'मी कोण' या आत्मचरित्रात लिहितात, "पुतळाबाईला मूल नव्हते म्हणा किंवा वडिलोपार्जित वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी म्हणा, तिने माझ्या आईस दत्तक घेतले. नाचगाण्यात तिला तरबेज केले. दिसायला चारचौघांत ती उठून दिसे."
पैंगीणच्या रंगाजी शेणवी भेंडे या तरुणाने रंगाला ठेवून घेतलं. रंगाजींपासून रंगाला दोन मुलं झाली, थोरला राजाराम आणि धाकटा जगन्नाथ.
पैंगीण, लोलयें अशा ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर राजाराम यांनी तबल्याचं शिक्षण घेतलं. कलावंतिणींसोबत काही कार्यक्रम केले. तबलजी म्हणून त्यांनी प्रसिद्ध गायिका चंद्राबाई मिरजकर यांनाही साथ दिली. ऐन तारुण्यात बरेच उद्योग त्यांनी केले. किराणा मालाचं दुकानही चालवून पाहिलं.
दरम्यानच्या काळात त्यांना गौंड सारस्वत ब्राह्मणांकडून होणाऱ्या भेदाचे अनेक चटके बसले. विशेषत: दोन घटनांचा उल्लेख राजाराम पैंगीणकर त्यांच्या आत्मचरित्रात आवर्जून करतात.
पहिला प्रसंग कोर्टातला आहे. कुठल्याशा खटल्यात साक्षीदार म्हणून राजाराम पैंगीणकर होते. ते कोर्टात साक्ष द्यायला गेले. पद्धतीप्रमाणे नाव विचारलं असता, राजाराम पैंगीणकरांनी नाव सांगितलं. ते नाव विचारताच कोर्टातला दुभाषी रायू रेगे यानं पैंगीणकरांच्या पुढे 'देवाचे नोकर' असं लिहिलं. पैंगीणकरांनी न्यायाधीशांच्या नजरेस ही गोष्ट आणून दिली.
दुसरा प्रसंग म्हणजे, पैंगीणकर एकदा वकिली सल्ला घ्यायला शंभू पाणंदीकर यांच्याकडे गेले होते. जवळच्या खुर्चीवर ते बसले. त्यामुळे अपमान झाला असं कारण देत पाणंदीकरांनी पैंगीणकरांना सल्ला देण्यास नकार दिला.
या दोन प्रसंगांनंतर पैंगीणकरांनी जे निरीक्षण मांडलं, ते त्यांच्या पुढील कार्यास चालना देणारं आहे.
"सारस्वत ब्राह्मणांत संघटितपणा आहे. हे लोक शिकून पुढे आलेले असून सरकारी क्षेत्रात यांचे वर्चस्व आहे. बहुतेक देवळे यांच्या हातात असल्यानं मागासलेल्या बहुजन वर्गांतील लोकांवर धार्मिक वर्चस्व यांचे आहे. जमिनीचे मालक ते असल्यानं कुणीही त्यांच्याविरूद्ध ब्र काढू शकत नाही. तसंच, व्यापार उद्योगही यांच्याच ताब्यात. ही वस्तुस्थिती पाहता आमच्यावर यांचे वर्चस्व राहणे सहाजिक आहे.
उलट आमचे लोक स्त्रियांवर अवलंबून राहणारे आणि वेश्याव्यवसाय करून उपजीविका करणारे आणि त्यातच भूषण मानणारे आहेत. विचाराअंती एका निष्कर्षाला मी येऊन पोहोचलो की, ब्राह्मणांना दोष देऊन काही साधणार नाही. आपले काय चुकले व चुकत आहे याचा सामूदायिकदृष्ट्या विचार झाला पाहिजे."
आणि यातूच त्या ऐतिहासिक सभेची कल्पना पुढे आली, ज्यात देवदासी प्रथेविरोधातील क्रांतीची बीजं ठळकपणे दिसतात.
आपल्या समाजात चालत असलेला वेश्याव्यवसाय मुळासकट उखडून टाकलाच पाहिजे, ही चळवळ नैतिक सत्यावर आधारलेली असली पाहिजे, असं म्हणणाऱ्या राजाराम पैंगीणकरांच्या नेतृत्वातच पुढे 2 ऑक्टोबर 1910 रोजी एक सभा भरली. यातील ठराव देवदासी प्रथेविरोधातील चळवळीतला महत्त्वाचा टप्पा ठरला.
या सभेत पैंगीणकरांनी जोरदार भाषण केलं. केवळ समाजावर होणाऱ्या अन्यायाचाच पाढा त्यांनी वाचला नाही, तर समाजात काय सुधारणा केल्या पाहिजेत, हेही सांगितलं. या भाषणानंतर उपस्थित सर्वांच्या मते पाच ठराव मंजूर करण्यात आले.
1) गायक समाजाप्रमाणे वेश्याव्यवसाय करणारे जे इतर समाज आहेत, म्हणजे नाईक, बंदे, फरज्यंत, देवळी, भाविणी, पेर्णी वगैर, यांचं एकीकरण करून वेश्याव्यवसाय नाहीसा करणे.
2) समाजात शिक्षणप्रसार जारीने करावा.
3) मुलींची लग्न करावी
4) हुंडा घेण्यात येऊ नये
5) एखादी मुलगी विधवा झाल्यास व तिची इच्छा असल्यास तिचा पुनर्विवाह करण्याची इच्छा असल्यास ते करण्याची तिला मुभा असावी.
या ठरावाला 37 जणांनी पाठिंबा दिला आणि आपल्या सह्या केल्या. विशेष म्हणजे, यात पुरुष 17 होते, तर महिलांची संख्या 20 होती. या ठरावांच्या प्रचारकार्यासाठी 60 रुपये 14 आणे इतकी देणगीच्या रुपात रक्कमही जमा झाली.
पुणे गोव्याभर सभा घेत या ठरावाची माहिती दिली गेली, तो संमत केला गेला. या सभांमुळे आणि ठरावामुळे तत्कालीन सत्ताधारी पोर्तुगीजांपर्यंत देवदासी पद्धतीची क्रूरता पोहोचण्यास मदत झाली. पण या प्रयत्नांना यश आलं ते पोर्तुगीज शिक्षण प्रसारक मराठा समाजाच्या अधिवेशनानं.
1925 साली कृष्णराव फातर्पेकर, सखाराम रामनाथकर, भास्कर कवळेकर, अनंत काटकर इत्यादी मंडळींनी पोर्तुगीज शिक्षण प्रसारक मराठा समाज नावाची संस्था सुरू केली. 20 आणि 21 मे 1929 या दिवशी पोर्तुगीज शिक्षण प्रसारक मराठा समाजाचं अधिवेशन भरलं आणि यात शेंसविधीचा मुद्दा उपस्थित करून, 'शेंसविधी बंद करा' हा निबंध नारायण कारवारकरांनी वाचला.
फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक छायाचित्र
शेंसविधी बंद करण्याचा कायदा आणण्याची विनंती पोर्तुगीज सरकारला करायची, असा ठराव या अधिवेशनात मंजूर झाला. अखेर 31 जुलै 1930 रोजी शेंसविधी प्रतिबंधक कायदा पोर्तुगीज सरकारनं पारित केला.
देवदासीच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण करणाऱ्या आणि संपूर्ण समाजाला अन्याय्य वागणूक देणाऱ्या प्रथेला कायद्यानं धक्का देण्याची ही घटना होती. राजाराम पैंगीणकर हे या संपूर्ण वाटचालीतले मुख्य कार्यकर्ते होते.
गोव्यातील साहित्यिक बा. द. सातोस्करांनी 1969 साली राजाराम पैंगीणकरांबद्दल जे म्हटलंय, ते नेमकं वर्णन म्हणता येईल.
"गोमंतक मराठा समाजातील भीष्माचार्य अशी पदवी राजाराम पैंगीणकरांना दिली तर उचित होईल. त्यांची जिद्द, निष्ठा, आत्मविश्वास, पराक्रम, डावपेच, मुत्सद्दीपणा हे गुण विचारात घेतले असता, 'भीष्माचार्य' हे संबोधन नि:संश सार्थ ठरावे," असं सातोस्कर यांनी म्हटलं होतं.
इथं हे नमूद करायला हवं की, देवदासींच्या विविध उपजातींना पैंगीणकरांसह अन्य साथीदारांनी आधी गोमंतक गायक समाज, नाईक मराठा समाज, मग गोमंतक मराठा समाजाच्या छताखाली एकत्र आणलं. यातल्या मराठा शब्दावर आक्षेप घेतला गेला होता.
पत्रकार सचिन परब सांगतात, "गोव्यातल्या काही उच्चवर्णीयांनी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या काही संस्थांनी देवदासी समाजाला मराठा म्हणवून घेण्याला विरोध केला होता. पण स्त्रीला सन्मान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक प्रेरणा या विरोधापेक्षा कितीतरी मोठी ठरली."
आजही हा समाज गोमंतक मराठा समाज या नावानं वावरतो.
राजाराम पैंगीणकरांनी नेमकं काय बदल केला, हे आजच्या एखाद्या व्यक्तीच्या तोंडून सांगायचं, तर 'गोष्ट पैंगीणकरांच्या संघर्षाची' पुस्तकाच्या लेखिका अमिता नाईक यांचीच सांगता येईल.
अमित नाईक लिहितात, "माझे बाबा 'सीताराम सगुण नाईक' असं नाव लिहीत. मराठी पद्धतीप्रमाणे मधले नाव वडिलांचे असते. पण 'सगुण' नावाची कुणी व्यक्तीच नव्हती. मग बाबा 'सगुण' हे कुणाचे नाव लावत? 'सगुणा' आजीचे नाव. सुरुवातीला बाबा आजीचे म्हणजे त्यांच्या आईचे नाव लावत. पण लोकांच्या खोचक चेष्टेच्या हसण्याला वैतागून ते 'सगुण' असे पुरुषवाचक नाव लावू लागले.
"शाळेत असताना कधीतरी ही गोष्ट मला कळली. खूप अस्वस्थ वाटलं. वर्गात शिकणाऱ्यांना खानदान होते, घराणे होते. पण मला मात्र ते नव्हते. अभिमानाने सांगता येईल, असे नाव नव्हते. 'नाईक' हे आडनाव देवळीचाच समानार्थी शब्द होता.
मोठं झाल्यावर पैंगीणकरांबद्दल कळलं. राजाराम रंगाजी पैंगीणकर माझ्या नात्याचे नाहीत. मी त्यांना पाहिलेही नाही. पण त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. किंबहुना, माझ्यासारख्या असंख्य जणींवर."
अमिता नाईक पुढे लिहितात, "आधी म्हटल्याप्रमाणे मला वैयक्तिक पातळीवर घराणे म्हणावे, असा वारसा नाही. अर्थात, शोषितांना वैयक्तिक वारसा नसतो. पण त्यांना भकभक्कम सामाजिक वारसा असतो. राजाराम रंगाजी पैंगीणकर यांचा संघर्ष हा माझ्यासारख्या अनेकांचा अभिमानास्पद वारसा आहे."
राजाराम पैंगीणकरांनी काय साध्य केलं, हे समजून घेण्यासाठी त्यांच्याच आयुष्यातील एका प्रसंगाचा इथं दाखला देणं योग्य ठरेल.
काही कामा करता राजाराम पैंगीणकर एकदा काणकोणच्या मामलेदार कचेरीत गेले होते. तिथं वऱ्हांड्यात लोकांना बसण्यासाठी बाक होते. त्या बाकावर राजाराम पैंगीणकर बसलेले पाहून कचेरीतला कारकून पोके प्रभू चोडणेकर तिथे आले आणि राजाराम पैंगीणकरांना उद्देशून म्हणाले, "तू कोण, कोणत्या जातीचा, हा विचार न करता बाकावर बसलास. तुला इथं बसण्याची पात्रता नाही."
राजाराम पैंगीणकरांना अपमान सहन झाला नाही. त्यांनी कचेरीतल्या वरिष्ठांकडे तक्रार केली. मग समजूत काढून पैंगीणकरांना तिथं बसण्याची परवानगी दिली. मात्र, पैंगीणकर तिथं बसले नाहीत. तिथून निघताना पोके प्रभू चोडणेकरांना पैंगीणकर म्हणाले, "माझ्यात जर माणसाचे रक्त असेल, तर मी प्रतिज्ञा करतो की, तुमच्या माझ्या हयातीतच तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून माझे वंशज बसेवन."
पोके प्रभू चोडणेकर म्हणाले, "ते या जन्मात शक्य नाही."
मध्यंतरी काळ लोटला. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. मात्र, गोवा स्वतंत्र व्हायला 1961 चं साल उजडावं लागलं. निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं.
आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर विराजमान झाले. भाऊसाहेब बांदोडकर हे मराठा गोमंतक समाजातलेच होते.
फोटो स्रोत, Facebook/Pramod Swant
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर
ही घटना पाहून राजाराम पैंगीणकरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. काणकोणच्या मामलेदार कचेरीत पोके प्रभू मात्र हे पाहायला हयात नव्हते. पैंगीणकरांनी केवळ मामलेदार कचेरीत खुर्चीला खुर्ची लावून आपल्या समाजातील माणूस बसवला नव्हता, तर गोव्याच्या सर्वोच्च खुर्चीवर भाऊसाहेब बांदोडकरांच्या रुपानं समाजातला माणूस बसवला होता.
ज्या समाजाला देवदासी म्हणून हिणवलं गेलं, त्या समाजाला राजाराम पैंगीणकरांनी हे स्थान मिळवून दिलं. पैंगीणकरांनी हे साध्य केलं.
गोव्यात आजच्या घडीला जवळपास 70 हजार एवढी गोमंतक मराठा समाजाची लोकसंख्या आहे.
देवदासी समाजानं (गोमंतक मराठा समाज) कला, शिक्षण, उद्योग इत्यादी विविध क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्ती देशाला दिले आहेत.
पणजीत बांदोडकर स्मृती नावानं संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणं, कर्जाऊ रक्कम देणं इत्यादी गोष्टी नियमितपणे केल्या जातात. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जन्मदिन आणि स्मृतिदिनी कार्यक्रम अशा गोष्टीही केल्या जातात.
"समाजातून पुढे मोठे झालेले बरेचजण आजही मदतीचा हात तोकडा करत नाहीत," असं गोमंतक मराठा समाजाचे माजी अध्यक्ष गोरख मांद्रेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मात्र, एकेकाळी मागास म्हणवून घ्यायला नकार देणारा आणि तसा ठराव संमत करणाऱ्या गोमंतक मराठा समाजात आर्थिक दरी वाढलीय. त्यामुळे आता ओबीसीत सामावून घेण्याची मागणी अनेकदा समोर आल्याचं गोरख मांद्रेकर सांगतात.
एक मात्र निश्चित, गोमंतक मराठा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याच अंशी बदलला, ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात हा बदल धीम्या गतीनं दिसतो, मात्र बदलाची प्रक्रिया चालू असल्याचे सकारात्मक संकेतही दिसतात.
कित्येक शतकांची अनिष्ट प्रथा पूर्ण संपायला आणि त्या मानसिकतेतून बाहेर पडायला, वेळ तर जाईलच, पण कमी कालावधीत फार पुढे आल्याचं समाधान या समाजातले बरेच लोक व्यक्त करतात.
संदर्भ :-
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares