अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? – MSN

Written by

रशिया-युक्रेन युद्धानंतर अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्याचं सगळ्या जगाने पाहिलंय. जगभरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालाय. अमेरिकेपासून-नायजेरियापर्यंत बऱ्याच देशांना या संकटाचा सामना करावा लागतोय. पण या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकही सज्ज झाले आहेत.
लोक सज्ज झाले आहेत याचा अर्थ, लोक आता त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत.
अमेरिकेत पहाटे चार वाजल्यापासूनच जेवणासाठी शोधाशोध करावी लागते.
पहाटेचे चार वाजले आहेत. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा सुरू झालाय. जॉर्जिया मध्ये राहणाऱ्या डॉना मार्टिन भल्या पहाटे आपल्या ऑफिसच्या दिशेनं रवाना झाल्यात. त्यांच्या जिल्ह्यातील मुलांचं मिल्स प्रोग्रामअंतर्गत पोट भरण्यासाठी त्यांना रोज भल्या पहाटेपासून अन्नधान्य शोधण्यासाठी पळापळ करावी लागते.
मार्टिन या त्यांच्या जिल्ह्याच्या फूड सर्व्हिस डायरेक्टर आहेत. त्यांच्यावर जिल्ह्यातील 4200 मुलांना पोषक आहार देण्याची जबाबदारी आहे.
या सर्व मुलांना अमेरिकेच्या फेडरल फ्री स्कूल मिल्स प्रोग्राम अंतर्गत पोषण आहार दिला जातो.
त्या सांगतात, “22,000 लोकसंख्येच्या या भागात फक्त दोनच किराणा मालाची दुकान आहेत. अन्नाचं दुर्भिक्ष्य असावं असं हे ठिकाण आहे.”
मागच्या वर्षांपासून मार्टिन यांना अन्नधान्य गोळा करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
गेल्या जुलैमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 10.9 टक्क्यांवर पोहोचला होता. 1979 नंतरचा हा उच्चांकी दर होता.
डॉना मार्टिन यांना नेहमी अन्नधान्य पुरवणाऱ्या विक्रेत्यांनी आता त्यांना धान्य द्यायचं बंद केलंय. कारण अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत.
डॉना सांगतात, “ते विक्रेते म्हणतात, तुम्ही दरात भरपूर घासाघीस करता आणि असं ही, तुम्हाला सामान विकून आम्हाला त्यातून म्हणावा तेवढा फायदा मिळत नाही.”
यूएस फेडरल स्कूल मिल्स प्रोग्राम अंतर्गत जो पोषण आहार पुरवला जातो त्यात बऱ्याच नियमांच पालन करावं लागतं. यातील एका नियमानुसार अन्नपदार्थांमध्ये साखर आणि मीठाचं प्रमाण कमी असावं.
या नियमांचं पालन करण्यासाठी डॉना यांना विशिष्ट अन्नपदार्थांची ऑर्डर द्यावी लागते. जसं की तृणधान्य, बॅगल्स (गोल ब्रेड) आणि योगर्ट सारखे पदार्थ मागवावे लागतात.
डॉना सांगतात की, “फक्त त्याच नाही तर विक्रेत्यांनाही बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय. कामगारांच्या संख्येत घट झाल्याने त्यांना सामान पोहोचवण्यासाठी ड्रायव्हर मिळवणं ही कठीण झालंय. मागच्या वर्षभरात इंधनाचे दरही 60 टक्क्यांनी वाढलेत.”
गेल्यावर्षी जुलैमध्ये अमेरिकेत अन्नधान्याचा महागाई दर 10.9 टक्के होता.
अमेरिकन लोक त्यांच्या उत्पन्नाचा 7.1% भाग खाण्यापिण्यावर खर्च करतात.
जेव्हा खाण्यापिण्याच्या वस्तू विक्रेत्यांकडून उपलब्ध होत नाहीत तेव्हा मात्र डॉना यांना स्वतः ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
मागे एकदा जेव्हा पिनट बटरचा तुटवडा होता तेव्हा मुलांना बीन डीपवर (बिन्सची चटणी) आपलं काम भागवावं लागलं.
त्या सांगतात, “मुलांना पीनट बटर आवडतं आणि मला माहित होतं की, त्यांना ते बीन डिप आवडणार नाही. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, काहीही करून मला त्यांचं पोट भरणं महत्वाचं वाटलं.”
बऱ्याचदा डॉना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कधी पहाटे तर कधी रात्री, शहरातील वेगवेगळी वॉलमार्ट स्टोअर्स पालथी घालावी लागतात.
त्या सांगतात, “एकवेळ तर अशी आली होती की आम्हाला पूर्ण शहरातून योगर्ट खरेदी करण्यासाठी फिरावं लागलं. शाळेत मिळणार जेवण रुचकर आणि पौष्टिक असल्यामुळे बरीच मुलं शाळेत येण्यासाठी उत्सुक असतात. मला त्यांच्या आनंदावर विरजण टाकायचं नसतं.”
अनोमा कुमारी परंथला श्रीलंकेच्या कँडी शहराबाहेर राहतात. कधीकाळी धान्य उगवणाऱ्या शेतात आता त्या भाजीपाला पिकवतात. त्यांच्या या शेतात बिन्स आणि पुदिन्याचं पीक घेतलं जातं.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. तिथं औषध, इंधन आणि अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झालाय.
चांगल्या नोकऱ्या असणाऱ्या लोकांचीही दयनीय अवस्था झाली आहे.
परंथला सांगतात, “लोकांना आता त्यांच्या भविष्याची काळजी वाटायला लागली आहे. भविष्यात त्यांना खाण्या-पिण्यासाठी काहीही राहणार नाही असं वाटतं.”
श्रीलंकेत अन्नपाण्यावाचून जी अराजकता निर्माण झालीय ती परंथला यांच्या शेतात उभं राहिलं की दिसतं नाही.
ही शेतजमीन त्यांच्या कुटुंबाची आहे. कोव्हिडच्या काळात त्यांनी या शेतात भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. आता त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच जमिनीच्या तुकड्यावर अवलंबून आहे.
मागच्या जूनमध्ये श्रीलंकेतील अन्नधान्याच्या महागाई दरात 75.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
श्रीलंकन लोक त्यांच्या उत्पन्नातील 29.6% पैसा खाण्यापिण्यावर खर्च करतात.
परंथला यांनी पुस्तक आणि यूट्यूबच्या मदतीने शेतात भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. त्यांच्या शेतात आज टोमॅटो, रताळे, दुधी, आर्बी आणि पालक या भाज्या आहेत.
परंथला यांच्याकडे जेवढी जमीन आहे तेवढी असणं भाग्य जोरावर असल्यासारखं आहे. काही लोकांकडे तर एवढी जमीनही नाही. पण जवळपास प्रत्येक घराच्या अंगणात किमान एक तरी फणसाचं झाड असतंच.
परंथला सांगतात, “प्रत्येकाच्या दारात एकतरी फणसाचं झाड असतंच. म्हणून कदाचित लोकांना त्याचं महत्त्व नसेल. कित्येक फणस खाली पडून खराब व्हायचे.”
श्रीलंकेत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिथे मांस, भाजीपाला महागला. या महागाईपासून वाचण्यासाठी परंथला यांनी फणसाची आणि नारळाची भाजी करायला सुरुवात केली.
आता लोकांना फणसाची किंमत समजायला लागली आहे. श्रीलंकेत फणसाला सोन्याचे दिवस आलेत. काही लोक फणसाच्या बिया दळून त्यापासून पीठ तयार करीत आहेत.
काही वर्षांपूर्वी मांसाला पर्याय म्हणून फणसाचा पर्याय समोर आला होता. फणसाची महती कळण्यासाठी श्रीलंकेत यासाठी मोठं संकट यावं लागलं.
या भाजीची चव नेमकी होती कशी…?
या प्रश्नावर अनोमा परंथला उत्तरतात, “याची चव अवर्णनीय आहे.”
नायजेरियात राहणारे इमॅन्युएल ओनुओरा सांगतात त्यांना राजकारणात काडीमात्र रस नाहीये. त्यांना फक्त आपली बेकरी चालवायची आहे.
पण ब्रेड बनवण्याचं हे काम आजकाल अशक्य झालंय.
ते सांगतात, “गव्हाच्या किमती 200 टक्‍क्‍यांनी वाढल्या तर साखरेच्या किंमती 150 टक्‍क्‍यांनी वाढल्या. एवढंच काय तर ब्रेडसाठी लागणारी अंडीही महागली आहेत.”
इमॅन्युएल सांगतात, “त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतंय.”
त्यांच्या बेकरीत 350 लोक काम करायचे. पण या वाढत्या महागाईमुळे त्यांनी 305 लोकांना कामावरून कमी केलंय. ते हताश होऊन विचारतात, “ते लोक आता आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरतील?”
इमॅन्युएल हे नायजेरियाच्या प्रीमियम ब्रेड मेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ब्रेड मेकर्सच्या वतीने सरकारवर दबाव यावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
जुलैमध्ये त्यांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. यात 5 लाख बेकऱ्या चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
या संपामुळे ब्रेड मेकर्सकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील टॅक्स कमी होईल अशी आशा त्यांना होती.
कोव्हिडनंतर आणि वातावरणातील बदलामुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर तर गहू आणि तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आणि परिस्थिती बिकट झाली.
ब्रेड बनवण्यासाठी जे साहित्य लागतं त्यातील बहुतांश साहित्य नायजेरियात आयात केलं जातं. मात्र युरोपच्या तुलनेत नायजेरियातील ब्रेडची किंमत कमी आहे.
मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये नायजेरियातील अन्नधान्य महागाईच्या दरात 22 टक्क्यांनी वाढ झाली होती.
नायजेरियन लोक त्यांच्या उत्पन्नातील 59.1 टक्के पैसा खाण्यापिण्यावर खर्च करतात.
अन्नधान्य टंचाई एकदम शिखरावर असताना नायजेरियालाही आता वीजेच्या टंचाईचा देखील सामना करावा लागतोय. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांना डिझेल जनरेटरचा वापर करावा लागतोय. हे कमी की काय म्हणून इंधनाच्या दरातही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नायजेरियाकडून कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. या देशात तेल शुद्धीकरण केंद्रांची कमतरता असल्याने त्यांना जवळपास सर्व डिझेल आयात करावं लागतं.
इमॅन्युएल सांगतात, “महागाई तीनपट वाढलीय पण त्याच तुलनेत आपण ब्रेडच्या किंमती वाढवू शकत नाहीत. कारण लोकांकडे ब्रेडवर खर्च करायला पैसेचं नाहीयेत.”
इमॅन्युएल पुढे सांगतात, “नायजेरियन लोक खूप गरीब आहेत. व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. इकडे महागाई वाढत आहे पण लोकांचे पगार वाढत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्यावर जास्त भार टाकण्यात अर्थ नाही.”
नायजेरियन व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या 60 टक्के पैसा आपल्या खाण्यापिण्यावर खर्च करतो. याउलट अमेरिकेत उत्पन्नाच्या फक्त सात टक्केच खर्च केले जातात.
अशा या महागाईच्या काळात स्वस्तात ब्रेड उपलब्ध करून देणं फार काळ शक्य नसल्याचं इमॅन्युएल सांगतात.
ते सांगतात, “मी काही धर्मादाय संस्था उघडलेली नाही. नफा कमावण्यासाठी मी या व्यवसायात उतरलोय. पण नायजेरियन लोकांच पोट भरावं या उद्देशाने आम्ही काम करतोय.”
पेरूच्या लिमा शहरात राहणाऱ्या जस्टिना फ्लोरेस टेकडीच्या अरुंद वाटेवरून चालत असतात. उंच कड्यावर जाऊन सभोवार शहर पाहिल्यावर त्यांच्या मनात विचार येतो, ‘आज लोकांसाठी काय जेवण बनवावं?’
जेवणाची ही समस्या त्यांच्यासाठी दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
कोव्हिडच्या काळात जस्टिना फ्लोरेस यांची नोकरी गेली. त्यांच्या आजूबाजूला राहणारे बरेच लोक स्वयंपाकी, मोलकरीण आणि माळी म्हणून काम करायचे. या लोकांनीही कोव्हिडच्या काळात आपल्या नोकऱ्या गमावल्या. आता आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं या विवंचनेत असताना फ्लोरेस यांनी आपल्या साठ शेजाऱ्यांसोबत सामुदायिक किचनची सुरुवात केली.
जस्टिना फ्लोरेस यांनी घराबाहेर स्वयंपाक करायला सुरुवात केली. इंधनासाठी लाकडं वापरायला सुरुवात केली.
पुढे थोडे दिवस गेल्यावर त्यांनी एक झोपडी बांधली आणि तिथल्याच चर्चमधल्या पाद्रीकडून जेवण बनवण्यासाठी स्टोव्ह आणला. बऱ्याचदा दुकानदारांकडून काही खाद्यपदार्थ वाया जायचे. जस्टिना फ्लोरेस बाजारात गेल्या आणि हे वाया जाणारे खाद्यपदार्थ दान म्हणून देण्याचं आवाहन दुकानदारांना केलं.
आज दोन वर्ष उलटली. जस्टिना फ्लोरेस आणि त्यांचे सहकारी मिळून आठवड्यातून तीन वेळा 75 लोकांना भरपेट जेवण देतात. कोव्हीड यायच्या आधी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या या जस्टिना फ्लोरेस स्थानिकांच्या लीडर बनल्या आहेत.
त्या सांगतात, “मी मदतीसाठी लोकांची दार ठोठावली.”
पेरूमध्ये गेल्या जुलैमध्ये अन्नधान्य महागाईचा वार्षिक दर 11.59 टक्के इतका होता.
पेरूचे नागरिक त्यांच्या उत्पन्नाच्या 26.6% पैसे आपल्या खाण्यापिण्यावर खर्च करतात.
या सामुदायिक किचनमध्ये भाताबरोबर खाता येईल असा मांस आणि भाज्यांचा रस्सा बनवला जायचा. पण गेल्या काही महिन्यांत डोनेशनचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे जेवण बनवताना लागणाऱ्या जिनसांच प्रमाणही कमी झालंय.
त्या सांगतात, “या सगळ्या अडचणींमुळे लोकांना जेवण पुरवणं अवघड झालं आहे. आता तर तांदूळ गोळा करणं सुद्धा कठीण होऊन बसलंय.”
एप्रिल महिन्यात खतांच्या आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना आणि वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी संप पुकारला होता. असा एकच नाही, तर बरेच संप झाले त्यामुळे अन्न पुरवठ्यावर परिणाम झाला.
वाढत्या महागाईमुळे फ्लोरेस यांनी जेवणात मांस वापरणं बंद केलंय. त्याऐवजी स्वस्त असलेली रक्ती, कलेजी आणि हाड आणायला सुरुवात केली. पण कलेजीच्या किंमती वाढल्याने त्यांनी उकडलेली अंडी खायला सुरुवात केलीय.
जेव्हा इंधनाचे दर वाढले तेव्हा लोकांना घरातून अंडी शिजवून आणायला सांगितली. आता तर अंडीही मिळेनाशी झाली आहेत.
आज फ्लोरेस कांदा टोमॅटो असलेला पास्ता लोकांना खाऊ घालतायत.
अन्नधान्याच्या टंचाईला शेतकरी जबाबदार नसल्याचं फ्लोरेस सांगतात.
आम्ही पेरूमध्ये अन्नधान्य पिकवू शकतो, पण सरकारकडून काहीच मदत मिळत नसल्याचं त्या पुढे सांगतात.
22 मे ला अरबी भाषेत केलेल्या एक ट्वीटमध्ये ‘बॉयकॉट ग्रिडी चिकन कंपनीज’ असं म्हणत चिकनवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
या ट्वीटला काही दिवस उलटले असतील पण हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड व्हायला लागला. सलाम नसराला सुपरमार्केटमधून आपल्या घराकडे निघाल्या होत्या आणि तेव्हाच त्यांना या ट्रेंडबद्दल समजलं.
नसराला सांगतात, “या बॉयकॉट ट्रेंडची सगळीकडेच चर्चा सुरू होती. अगदी सोशल मिडियापासून टीव्ही, मित्रमंडळींमध्ये या ट्रेंड व्हायरल झाला होता.”
सुपरमार्केटमध्ये खरेदीला गेलेल्या नसराला यांनी जेव्हा त्यांचं बिल पाहिलं तेव्हा त्यांनी या मोहिमेचं समर्थन करायचं ठरवलं. सलाम नसराला यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील, बहिणी, बहिणींची मुलं आहेत. त्यांच्या जेवणात चिकनचं प्रमाण जास्त असतं.
मांस आणि मासे महागलेत. त्यामुळे सलाम आणि त्यांचं कुटुंब जवळपास रोजच जेवणात चिकन खातात. पण त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हायचं ठरवलं आणि पुढचे दहा दिवस त्यांनी चिकन आणलं नाही.
त्याऐवजी त्यांनी हमस, फलाफल आणि वांगी खाल्ली. हा ट्रेंड सुरू झाल्यानंतर 12 दिवस उलटले आणि चिकनच्या दारात प्रति किलोमागे 1 डॉलरचा फरक पडला.
गेल्या जुलैमध्ये जॉर्डनमध्ये अन्नधान्याचा महागाई दर 4.1 टक्क्यांवर पोहोचला होता.
जॉर्डनचे लोक त्यांच्या उत्पन्नाच्या 26.9 टक्के खर्च खाण्यापिण्यावर करतात.
चिकन फार्म आणि कत्तलखाना चालवणारे रामी बर्होश या बॉयकॉट ट्रेंडच समर्थन करतात. पण सोबतच ही मोहीम चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आल्याचं ही सांगतात.
वाढत्या इंधनाच्या किमती आणि चिकन खाद्यदारात झालेली वाढ यामुळे तेही हैराण झालेत.
दक्षिण अमेरिकेत पडलेला दुष्काळ आणि युक्रेनमधील युद्धानंतर जागतिक पातळीवरच इंधन आणि धान्याच्या किंमती वाढल्या आहेत.
चिकनच्या वाढत्या किमतीना आळा घालण्यासाठी जॉर्डन सरकारने एक कमाल मर्यादा प्रस्तावित केली होती. सरकारच्या या निर्णयावर चिकन फार्मचे मालकही तयार झाले. पण मे महिन्यात भाव वाढले तसा सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड आला.
रामी बर्होश सांगतात, “इतरही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेत. चिकनमुळे लोकांचा रोष समोर यायला लागला आहे.”
या निषेधामुळे थोडासा का होईना, पण फरक पडला म्हणून सलाम नसराला खुश झाल्या आहेत. मात्र मूळ मुद्दा बाजूलाच राहिल्याचं त्या सांगतात.
त्या सांगतात, “दुर्दैवाने शेतकऱ्यांना आणि चिकन विक्रेत्यांना भुर्दंड सोसावा लागला. जे मोठे व्यापारी शेतकऱ्यांना नाडतात त्यांना याचा फटका बसलाच नाही.”
https://www.youtube.com/watch?v=eO__GzvHW6g
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares