वीज पंपाचे नुकसान – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
महापूर शेती

महापूरबाधित शेतीपंपांना मदतीची प्रतीक्षाच

१३ कोटींची भरपाई प्रलंबित ः १२ हजार शेतकरी, पाणी संस्था हवालदिल
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः जिल्ह्यात २०२१ ला आलेल्या महापुरात पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या वीज मोटरी व साहित्य वाहून गेले. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळणार होती. त्याचे पंचनामे होऊन दोन वर्षे झाले; पण मदतीची कवडीही मिळाली नाही. जिल्ह्यातील १२ हजार ६५३ शेतकरी, तसेच पाणी पुरवठा संस्था हवालदिल आहेत.
जिल्ह्यात २०१९ ला महापूर आला. यात हजारो शेतीपंप व त्यांच्या वीज जोडण्या पाण्यात गेल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तसेच पाणी संस्थांनी स्वतःचे पैसे खर्च करून दुरुस्त करून घेतली. यात वीज तारा, वीज खांब, बसबार पेट्या, सर्किट बोर्ड, तसेच विजेची मोटर अशा साधनसामुग्रीचे नुकसान झाले होते. दोन हजार रुपयांत एक लाखापर्यंतचा खर्च शेतकरी व पाणी संस्थांनी केला.
२०२१ ला पुन्हा महापूर आला. पुन्हा वीज पंप, मोटर्स व विजेचे साहित्याचे नुकसान झाले. सलग दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. याची दखल घेत इरिगेशन फेडरेशनने ज्येष्‍ठ नेते कै. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नुकसान भरपाईची मागणी राज्य शासन व महावितरणकडे केली होती.
तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी महावितरण शेती पंपाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महावितरणला दिले. त्यानुसार पंचनामेही झाले. त्याचे तपशील मंत्रालयातही पोचले. मात्र, त्यानंतर शेतकरी व पाणी संस्‍थांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. इरिगेशन फेडरेशन दोन वर्षे भरपाईसाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र, त्याची दखल घेतलेली नाही.
कोट
दोन वेळा आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या शेतीपंपांचे नुकसान झाले. हा खर्च शेतकरी व पाणी संस्‍थांना परवडणारा नाही. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होती. भरपाई देण्याचे आश्वासन तत्कालीन राजकीय नेत्यांनी दिले होते. मंत्रालयातही विषय प्रलंबित आहे. ही भरपाई मिळावी, यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत आहोत.
– विक्रांत पाटील, किणीकर जिल्हाध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन.
दृष्टिक्षेपात नुकसान
*सात तालुक्यांत ३०० ते १२०० शेतीपंपाचे नुकसान
*जिल्ह्यात १३ हजार शेतीपंपाचे नुकसान झाले.
*२ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या साहित्याचे नुकसान
*सर्व मिळून भरपाईची रक्कम १३ कोटी ६० लाख आहे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares