'सात महिन्यात 810 आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था' #5मोठ्या बातम्या – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्या
अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे या शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात 810 आत्महत्यांपैकी सर्वांत जास्त अमरावती विभागात 612 झाल्या असून सुपीक समजल्या जाणाऱ्या नागपूर विभागात 198 शेतकऱ्यांनी मरण पत्करले आहे.
राज्य सरकारकडे आर्थिक मदतीसाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रकरणे आली आहेत त्यावरून ही आकडेवारी समजली आहे.
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकरिता 241 आत्महत्याग्रस्त कुटुंब पात्र ठरले आहेत आणि 213 अपात्र प्रकरणे ठरले आहेत, तर 356 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
मागील वर्षी अमरावती विभागात एक हजार 177 व नागपूर विभागात 380 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील वर्षीच्या तुलनेत या सात महिन्यातील आत्महत्या 50 टक्केपेक्षा जास्त आहेत. मागील वर्षांच्या एकूण आत्महत्यांपैकी नागपूर विभागातील आत्महत्येची 21 प्रकरणे अद्यापही चौकशीकरिता प्रलंबित आहेत, हे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं.
फोटो स्रोत, Getty Images
सर्वोच्च न्यायालय
घटनापीठाकडे प्रकरण गेल्यानंतर गुरूवार 25 ऑगस्टला याची सुनावणी होईल, असंही सांगितलं गेलं, पण आता याबाबत पुन्हा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
सुप्रीम कोर्टात अजूनही उद्याच्या सुनावणीबाबत अनिश्चितता आहे. आतापर्यंतच्या कामकाजाच्या दोन लिस्टमध्ये या याचिकांचा समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे उद्या सकाळी ऐनवेळी प्रकरण सुनावणीसाठी येणार का पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज (25 ऑगस्ट) 5 न्यायमूर्तींचे घटनापीठ आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणं अपेक्षित आहे, पण अजूनही घटनापीठाची स्थापना करण्याचे नोटिफिकेशन निघालं नाही, त्यामुळे ही सुनावणी आज होणार का नाही, याबाबत संभ्रम कायम आहे, ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झालं. पण त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्यांचे कुटुंबीय करत आहेत. सोनाली यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी सोनाली यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
अशातच त्यांच्या भावाने गोव्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोनालीच्या भावंडांनी ही तक्रार केली आहे.
फोटो स्रोत, Sonali Phogat
सोनाली फोगटच्या भावाने गोवा पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
सोनाली यांची बहिण रुपेश यांनी सांगितले की मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोनाली फोगट या त्यांची आई, बहीण आणि अन्य एका नातेवाईकाशी फोनवरून बोलल्या होत्या. सोनालीची तब्येत अत्यंत चांगली होती. तिला हार्टअॅटक येऊ शकत नाही असे देखील, त्यांच्या बहिणीने म्हटले आहे. हे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
सध्या विधिमंडळाचं अधिवेशन होतंय. अशात 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके. अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत.
"एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले. 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईन," असं दीपक केसरकर म्हणालेत.
फोटो स्रोत, Getty Images
"सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो," असं केसरकर म्हणाले. टीव्ही 9 यांनी ही बातमी दिली.
तेल क्षेत्रांतून उत्खनन कमी झाल्यामुळे जुलै महिन्यात देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन घटले आहे. सरकारी कंपनी ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने पश्चिम तेल उत्खनन क्षेत्रातून कच्च्या खनिज तेलाचे 1.7 टक्के कमी उत्पादन घेतले आहे; तर सोबत खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी उत्खनन कमी केल्यामुळे जुलैमध्ये भारताचे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन 3.8 टक्क्यांनी घटले आहे, अशी सरकारी आकडेवारी मंगळवारी जाहीर झाली.
ओएनजीसी आणि खासगी तेल कंपन्यांकडून तेलाचे उत्खनन कमी झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील उत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन 3.8 टक्के घटले आहे.
ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. कच्च्या खनिज तेलाचे उत्खनन करून त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाचे उत्पादन घेतले जाते, ते जुलैमध्ये 2.45 दशलक्ष टनांपर्यंत घटले आहे, जे मागील वर्षी 2.54 दशलक्ष टन होते, ही बातमी सकाळने दिले आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares