पाडलोस, आरोसला कृषी सहायक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
45753
पाडलोस ः येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना बांदा कृषी मंडल अधिकारी. सोबत शेतकरी व पदाधिकारी.
पाडलोस, आरोसला कृषी सहायक
प्रकाश घाडगे ः पाडलोस येथे बैठकीत ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः बांदा कृषी मंडळ क्षेत्रात ३१ गावे येत असून केवळ सहा कृषि सहायक कार्यरत आहेत. त्यामुळे अधिक भार अधिकाऱ्यांवर पडत आहे. परिणामी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत अधिकारी पोहचण्यास कमी पडतात. पाडलोस व आरोस गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवार व शुक्रवार असे दोन दिवस कृषि सहायक उपलब्ध असतील, असे आश्वासन बांदा कृषी मंडळ अधिकारी प्रकाश घाडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या आरोपावर श्री. घाडगे बोलत होते. यावेळी कृषी अधिकारी, आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष बाळा परब, पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष बंड्या माधव, शेतकरी रामचंद्र गावडे, सीताराम गावडे आदी उपस्थित होते. पाडलोस कृषि सहाय्यक पदावर श्वेता सावंत कार्यरत असेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान किंवा तक्रार आली नाही. परंतु, गेल्या चार पाच महिन्यांत एकही अधिकारी आरोसमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. शंभर टक्के अनुदान लागवड संदर्भात माहिती मिळाली नाही. अधिकाऱ्यांच्या अशा मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे न भरून येणारे नुकसान झाल्याचा आरोप बाळा परब यांनी केला. अधिकारी भौगोलिक परिस्थितीचा आढावा न घेता केवळ कागदोपत्री नियोजन करतात. पाच एकरवरील शेतकरी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही, असा नियम आहे. त्यामुळे ज्याला गरज आहे, त्याला मिळत नाही आणि ज्याला गरज नाही त्याला मिळते, असा कारभार कृषी विभागाकडून सुरू असल्याचे सांगत आम्ही काय करावे? असा सवाल परब यांनी केला.
ठिबक सिंचन प्रकरण कृषी सहायक अधिकारीच नसल्यामुळे वाया गेले. त्यामुळे आम्ही कोणाजवळ दाद मागायची? पाडलोस कृषी सहायक अधिकारी कोण आहेत ते सुद्धा आम्हाला माहिती नसल्यामुळे योजनांची माहिती कोण पुरविणार?, असा खडा सवाल पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे यांनी अधिकाऱ्यांना केला. पाडलोससाठी बुधवार व आरोससाठी शुक्रवार असे दोन दिवशी कृषि सहायक गावात उपलब्ध असावेत, अशी मागणी गावडे यांनी केली.
मंडळ अधिकारी प्रकाश घाडगे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व भावना समजून घेत योग्य ती उपाययोजना करून शेतकऱ्यांसोबत कायम राहण्याची ग्वाही दिली. खरीप पिक उत्पादन वाढ मोहिमेतंर्गत कार्यक्रमातून भात पिक उत्पन्नात वाढ, नॅनो युरिया व सागरिका खताबाबत माहिती, ई-केवायसीबाबत आवाहन, नोटीसबोर्डवर प्रसिद्धी, फळपिक विमा बाबत माहिती, प्रधानमंत्री सूक्ष्मअन्नप्रक्रीया लघु व मोठे उद्योग उभारणीबाबत माहिती आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या व निराकरण करत शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजना व तंत्रज्ञानाचा अवलंब करून आर्थिक विकास साधावा असे आवाहन श्री. घाडगे यांनी केले. गणेश चतुर्थीनंतर कृषी सहायक व शेतकरी यांची पुन्हा बैठक आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले.
—————–
चौकट
सावंत यांच्यासारखा अधिकारी द्या
व्हाईस चेअरमन नाईक म्हणाले की, पदोन्नती झालेल्या श्वेता सावंत पाडलोसमध्ये कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या कृषी विभागातील योजना शेकडो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे निधीचा योग्य उपयोग झाला. नैसर्गिक आपत्तीत एका महिला अधिकाऱ्याने दाखविलेला तत्परपणा व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती घेऊन तशा प्रकारची सेवा शेतकऱ्यांना नवीन अधिकाऱ्यांनी द्यावी, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares