मुख्यमंत्र्याच्या फिरकीसमोर विरोधकांची भंबेरी – MSN

Written by

संजय बापट
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फिरकीसमोर विरोधकांची अक्षरश: भंबेरी उडाली. एरवी सत्तेत असोत वा विरोधकात, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मुरब्बी राजकारण्यांसमोर अनेकवेळा सत्ताधाऱ्यांची- अननुभवी मंत्री, सदस्यांची भंबेरी उडते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची कसोटी, राजकीय कसब पाहणारे हे पहिलेच अधिवेशन. शिवसेनेचे आक्रमक शिलेदार आणि काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ज्येष्ठाचा अनुभव यामुळे जेमतेम सहा दिवसांच्या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र आपल्या रांगडी सातारी शैलीत मुख्यमंत्र्यांनी अचूकपणे एकेकाला क्लीनबोल्ड करत विरोधकांना नामोहरम केले. आणि सुरुवातीला काहीसा अवघड वाटणारा सामना अलगत खिशात घातला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन प्रामुख्याने सभागृहापेक्षा सभागृहाबाहेरच्याच घटनांनी अधिक गाजले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांच्या सरबत्तीत मुख्यमंत्र्यांची भंबेरी उडाली होती. अधिवेशन सुरू होत असतानाच शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी सरकारी अधिकाऱ्यांना मारण्याचे तसेच विरोधकांना धमकावण्याचे प्रताप केले होते. आपल्या सहकाऱ्यांच्या या गुणांवर पांघरुन घालताना शिंदे यांना माध्यमांसमोर चांगलीच कसरत करावी लागली होती. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चातुर्याने यातून शिंदेची सुटका केली.
शिंदे यांच्या सहकाऱ्यांचे उपद्व्याप, राज्यातील अतिवृष्टी, खड्डे, ढासळलेली कायदा सुव्यवस्था अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून सरकारची त्यातही मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी मुद्यांच्या मुबलक दारुगोळा महाविकास आघाडीकडे होता. सरकारमध्ये भाजपच्या अनुभवी मंत्र्यांच्या तुलनेत शिंदेंचे सहकारी तसे अननुभवी. विरोधकांच्या अजेंड्यावरही शिंदे गटच. त्यामुळे हे अधिवेशन सरकारपेक्षा शिंदे यांच्याच राजकीय कौशल्याची कसोटी पाहणारे होते. प्रत्यक्षात मात्र सरकारला घेरण्याची अनेकदा संधी मिळूनही विरोधकांनी बोटचेपी धोरणे स्वीकारल्याने सत्ताधारीच वरढत ठरत राहिले. फडणवीसांचे फासे आणि शिंदेच्या हल्ल्यातून सावरताना अनेकदा विरोधकांचीच दमछाक होतानाचे चित्र विधानसभेत वारंवार पाहायला मिळत होते.
राज्यातील परिस्थितीचे प्रतिबिंब विधानसभेत प्रश्नोेत्तरे, लक्षवेधी, औचित्याच्या मुद्यांच्या माध्यमातून उमटते. करोना काळात ठाकरे सरकारच्या झालेल्या बहुतांश अधिवेशनात जनता आणि आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या या आयुधांना विधानसभेत स्थान मिळत नव्हते. मात्र या छोटेखानी अधिवेशनातही प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, औचित्यांच्या मुद्यांना न्याय देत सरकारने आमदार आणि लोकांची मने जिंकली. विधिमंडळात यावेळी चर्चेला आलेले बहुतांश प्रश्न भाजपच्या सदस्यांनी ते विरोधात असताना सरकार विरोधात विचारलेलेच होते. या प्रश्नांच्या माध्यमातून चौकशांचा ससेमिरा मागे लावत महाविकास आघाडीची कोंडी करण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी अनेकदा त्यांच्यावरच उलटली.
हेही वाचा- जम्मू काश्मीरवर डोळा ठेवून गुलामनबी आझाद काँग्रेसमधून बाहेर?
आदिवासी, आरोग्य, शेतकरी, महिलांच्या अनेक प्रश्नांवर मंंत्र्यानी अभ्यासच न केल्याने विरोधकांनी चातुर्याने हा डाव सरकारवरच उलटवला. आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विरोधकांनी अक्षरश: भंबेरी उडवली. सभागृहातील कामकाजात अनेक मंत्री नापास झाले. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसंगावधान राखत या मंत्र्यांची आणि सरकारची केवळ फजितीच वाचविली नाही तर कधी राजकीय कसबाने तर कधी त्यांच्याच भाषेत विरोधकांना उत्तर देत सरकारवर वरचढ होऊ दिले नाही. कामकाजादरम्यान विरोधकांना अनेकदा मंत्री आणि सरकारची कोंडी करण्याची संधी मिळूनही त्याचा फायदा उठवता आला नाही. भास्कर जाधवांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या एकाही वाघाला सरकारवर हल्ला किंवा मंत्र्यांची शिकार करता आली नाही. उद्ध‌व ठाकरेंचे हे वाघ केवळ घुरघुरतच बसले होते. काँग्रेसचे अस्तित्व केवळ हजेरी पुरतेच जाणवले. तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उसने अवसान आणून सरकारवर हल्ले चढविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचे हात दगडाखाली अडकल्याचे वेळोवेळी स्पष्टपणे दिसत होते.
विधानसभेत सरकारवर हल्ले चढवितांना सतत बचावात्मक भूमिका घेणाऱ्या विरोधकांनी सभागृहाबाहेर मात्र शिंदे गटाची भंबेरी उडविली. ५० खोके, सगळ ओके या विरोधकांच्या एकाच घोषणेची संपूर्ण विधिमंडळावर गडद छाया पसरली होती. सगळीकडे चर्चा केवळ खोक्यांचीच. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासूनच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर पन्नास खोक्यांची घोषणाबाजी करीत शिंदे गटाची बदनामी सुरु केली. विरोधकांचा हा खोक्यांचा वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चांगलाच वर्मी लागला. त्यामुळे पहिले दोन-तीन दिवस, विरोधकांना व्यक्तिगत बदनामी थांबवा, बदनामीचे राजकारण थांबवा असे आर्जव वारंवार शिंदे करीत होते. मात्र आपला घाव शिंदे आणि त्यांच्या गटाच्या चांगलाच वर्मी लागल्याचे लक्षात येताच विरोधकांनी खोक्यांचे हल्ले अधिक वाढवले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे यांनाच पुढे येऊन आपल्या शिलेदारांना चक्क पायऱ्यांवर आंदोलन करण्यास भाग पाडावे लागले. विरोधकांनी नव्हे तर सत्ताधाऱ्यांनीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन विरोधकांविरोधात आंदोलन करणे आणि मुख्यमंत्र्यांवर त्यात सहभागी होण्याची वेळ‌ आणणे हा विरोधकांचा मोठा विजय म्हणावा लागेल. मात्र या पराभवाची शिंदे यांनी विधानसभेत सव्याज परतफेड केली हेही नाकारता येणार नाही. विनंती करून, समजावून, इशारा देऊनही विरोधक खोके सोडत नसल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसात मात्र आक्रमक भूमिका घेत विरोेधकांवर हल्ले चढविले.
हेही वाचा- तीन दिशांना तोंडे असल्याने महाविकास आघाडी निष्प्रभ
शिंदे यांचा मूळ स्वभाव कमी बोलणारा, शांत, संयमी. अधिवेशनात मात्र त्यांनी एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत त्यांच्याच पक्षातील जयंत पाटील, धनंजय मुंडे अशा आघाडीच्या आणि आक्रमक नेत्यांची भंबेरी उडविली. कधी आदित्य तर कधी उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचे वाभाडे काढत ठाकरे गटाला गप्प बसवले. विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या चिठ्ठ्या चपाट्या बाहेर काढण्याची धमकी देत, शेरोशायरी किंवा शालजोड्यांच्या माध्यमातून शिंदे यांनी विरोधकांना नामोहरम केले आणि सुरुवातीस अडचणींचे वाटणारे हे अधिवेशन लीलया पार पाडले.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares