कालवा अस्तरीकरणाला पाठिंबा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
माळेगाव, ता. २६ ः नीरा डावा कालव्याच्या पाण्यावर बारामती, इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे मिळणाऱ्या पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे. कालव्या लगतच्या मोजक्या शेतकऱ्यांचा कालवा अस्तरीकरणाला विरोध नियमबाह्य आहे, अशी भूमिका स्पष्ट करीत बारामतीमधील सांगवी, नीरावागज, खांडज, शिरवली आदी गावातील शेतकऱ्यांनी महत्त्वाकांक्षी नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला पाठिंबा दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संपतराव देवकाते आदींनी अस्तरीकरणाला जाहीर पाठिंबा दिला.
नीरा डावा कालव्याचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने नीरा नदीकाठच्या गावांतर्गत शेतीला रसायनमिश्रित दूषित पाणी देण्याचा नाइलाज होतो. ही समस्या वर्षानुवर्षे भेडसावत असल्याने हजारो हेक्टर शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी सांगवी, निरावागज, खांडज मेखळी , घाडगेवाडी, शिरवली, कांबळेश्वर, शिरसणे, मळद आदी गावातील एकरी शेतीचे उत्पन्न घसरले आहे, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी सांगवी (ता. बारामती) येथे एकत्र येत व्यक्त केली.
"एका बाजूला नीरा डावा कालव्याची पाण्याची पाळी ५० ते ६० दिवसा वरती गेली असताना दुसऱ्या बाजूला नीरा नदीतील रसायनमिश्रित पाण्याचा वापर वाढल्याने शेतीचे आरोग्य बाधित होत चाललेले आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शासनाच्या जलसंपदा खात्याने नीरा कालव्याच्या अस्तरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे, असे असताना काही कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाच्या प्रक्रियेला पाझर बंद होईल, असा मुद्दा उपस्थित करीत विरोध केला आहे, हा चुकीचा मुद्दा आहे, " असे मत भगवानराव देवकाते, मदनराव देवकाते यांनी व्यक्त केले.
नीरा डावा कालवा सन १८८५पासून सुरू झाला आहे. गेली १३७ वर्षाच्या कालावधीत कालव्याची दुरवस्था झाली आहे. या कालव्याची वहन क्षमता निम्म्याने घटली आहे. ५०% पाण्याची गळती वाढली आहे. परिणामी आवर्तन मिळण्याचा कालावधी ५० ते ६० दिवसांपेक्षा अधिकचा झाला आहे. सहाजिकच नीरा डावा कालव्याच्या अंतर्गत लाभधारकांच्या शेतीचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. पाणीपट्टी भरूनही पिकाला पाणी पुरेसे मिळत नाही, अशी भावना बाळासाहेब वाबळे यांनी मांडली.
वीर धरण ते बावडा हे १५२ किलोमीटर कालव्याचे अंतर आहे. या पैकी ३० किलोमीटरचे अस्तरीकरण होणार आहे. सुमारे १२२ कोटी रुपये शासनस्तरावर मंजूर झाले आहे. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प न झाल्यास भविष्यकाळातील पिढी माफ करणार नाही. नीरा देवधर व गुंजवणी धरणातील पाण्याची अधिकची उपलब्धता भविष्यकाळात कमी होणार असून याबाबत शेतकऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून अस्तरीकरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन राहुल तावरे, प्रकाश तावरे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी एकवटले आहेत, त्याच पद्धतीने बारामती तालुक्यातील शेतकरीसुद्धा अस्तरीकरणाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. आंदोलनकर्त्यांचे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे, शेतकरी संजय देवकाते, बाळासाहेब वाबळे, देविदास गुरव, बाबूराव चव्हाण, नितीन आटोळे, राहुल तावरे, रमेश देवकाते, प्रकाश तावरे, अंकुश तावरे आदी शेतकऱ्यांनी भूमिका मांडली.
११८५
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares