मुख्यमंत्र्यांबरोबर गणपतीपूर्वी बागायतदारांची बैठक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
– rat26p37.jpg-
45799
रत्नागिरी ः बागायतदारांना मार्गदर्शन करताना मंत्री उदय सामंत.
– rat26p38.jpg-
45800
रत्नागिरी ः बैठकीला उपस्थित आंबा, काजू बागायतदार. (राजेश कळंबटे, सकाळ छायाचित्रसेवा)
गणेशोत्सवापूर्वी बागायतदारांची
मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ
मंत्री उदय सामंत; शासनाकडून पॅकेजसाठी प्रयत्न
रत्नागिरी, ता. २६ ः गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून त्यात आंबा, काजू बागायतदारांच्या समस्यांवर तोडगा काढला जाईल. तसेच बागायतदारांना शासनाकडून पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत दिले.
बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अल्पबचत सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ज्येष्ठ बागायतदार काका मुळ्ये, डॉ. विवेक भिडे, प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, तुकाराम घवाळी, नंदू मोहिते, बावा साळवी यांच्यासह अनेक बागायतदार आणि निबंधक, कृषी, पणनचे अधिकारी उपस्थित होते. आंब्याला हमीभाव मिळाला पाहिजे, वानरांचे निर्मूलन, निवळी-जयगड रस्त्याची दुरवस्था असे प्रश्‍न काका मुळे यांनी मांडले. यावर मंत्री सामंत म्हणाले, ‘बागायतदारांचे काही प्रश्‍न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. ते मुख्यमंत्र्यांपुढे मांडून त्यावर तोडगा काढला जाईल. त्यासाठी बागायतदारांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली पाहिजे. शक्य झाल्यास ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी आयोजित करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर प्राथमिक बोलणेही झालेले आहे. बागायतदार नाराज होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत बागायतदारांनी व्याजमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लवकरच बँका आणि बागायतदार यांची एकत्रित बैठक घेऊन त्यात यावर चर्चा करू. यामध्ये कोणत्या बँका सकारात्मक आहेत, याची पडताळणी केली जाईल. त्यावेळी पन्नास टक्के आंबा पीक बाधित असल्याचे शासनाला पाठवलेले पत्र कृषी विभागाकडून सादर केले जावे, अशी सूचना मंत्री सामंत यांनी केली. आंबा बागायतदारांना हमीभाव मिळावा, यासाठी पूर्वी चर्चा झाली होती; मात्र हमीभाव या शब्दाला अनेकांचा आक्षेप होता. त्यामधून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करुया. ‘कॅनिंग’च्या आंब्याचा दर कृषी, पणन, कोकण कृषी विद्यापीठ यांनी एकत्रित येऊन निश्‍चित करावा. तोच सर्वांसाठी लागू करावा. त्यासाठी कमिटी स्थापन करावी. गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूसंदर्भातील प्रयोग यशस्वी केला होता. तोच यंदा रत्नागिरीत आंब्यासाठी करू, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले. तसेच स्थानिकांचा आंबा कमी पडला तरच बाहेरून आंबा आणला जाईल. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही, तर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

चौकट
विविध मागण्या मांडल्या
आंब्याप्रमाणे काजू बोंडापासून वाईन करण्यासंदर्भातील निर्णयाचा शासन निर्णय लवकर घेतला जावा, कोकण कृषी विद्यापीठाकडून औषधांसाठी संशोधन केले जात नाही, ओले काजू सोलण्यासाठीच्या मशिनसाठी पन्नास टक्के अनुदान, काजूला हमीभाव मिळावा, अशा मागण्या काजू बागायतदारांनी केल्या. तसेच कोकण कृषी विद्यापीठाच्या शासकीय कार्यकारिणीवर विदर्भातील शेतकरी नको, अशीही मागणी केली. काजू बागायतदारांचे प्रश्‍न सोडवले जातील, असे आश्‍वासन मंत्री सामंत यांनी दिले.
—-
बैठकीतील निर्णय…
* बागायतदारांना कायमस्वरूपी मदतीसाठी प्रयत्न
* वानरांपासून संरक्षणासाठी सोलर योजना
* मच्छीमारांप्रमाणे बागायतदारांना अनुदानावर इंधन
* रत्न सिंधू योजनेतून बागायतदारांसाठी योजना
* चार वातानुकूलित व्हॅनसाठी १ कोटी ५७ लाख देऊ
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares