कला आणि कलाकारांच्या घुसमटीचा काळ… – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
प्रिय महाराष्ट्रीय, मराठी रसिक बंधू-भगिनींना सप्रेम नमस्कार. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या विसाव्या अधिवेशनासाठी प्रमुख वक्ता म्हणून मला निमंत्रित केलंत, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. या वर्षी कोणताच भारतीय किंवा मराठी राजकारणी इथं हजरच राहू शकत नसल्यामुळे माझा होकार नक्की झाला. राजकारण्यांपासून स्वतःला कायमच दूर ठेवल्यामुळे, सत्तेत कोणताही पक्ष असला तरी, सरकारच्या अन्याय्य धोरणांविरुद्ध वा चुकांविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क मी आजवर बजावत आलेलो आहे.
कलाकार म्हणून ते माझं आद्यकर्तव्य मानतो. मी बाजू घेतो ती लोकशाहीधार्जिण्या न्यायासाठी, सर्वसमावेशक समानतेसाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी! आपल्या सर्वांच्या भारत देशाने, मी ‘हिंदुस्थान’ म्हणत नाहीये, पंचाहत्तरी गाठली आहे. त्याच भारतामधल्या एका सक्षम राज्याने म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ६२ वर्षं पूर्ण केलीत. अजून दहा वर्षांनी मराठी चित्रपटाची शताब्दी साजरी होईल. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला होता. त्याआधी दोन दशकं भारतीय सिनेमाचा आरंभ करणारा माणूसही मराठीच होता. हे सगळे कालबिंदू एकत्र करून भारतातल्या अग्रगण्य राज्याचा गौरव साजरा करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे.
साहित्य, संगीत, दृश्यकला, रंगभूमी, चित्रपट अशा कलेच्या विविध प्रकारांसाठी महाराष्ट्रीय आणि मराठी माणसाचं काय योगदान होतं, याचा ओझरता मागोवा घेण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे, त्यानिमित्ताने आपल्या इतक्या वर्षांच्या भवतालाचा आढावा घेणार आहे. १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आपल्या साठोत्तरी वैचारिक आणि कलाव्यवहारांच्या विकासाचे टप्पे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडण-घडणीशी संलग्न आहेत. उज्ज्वल सांस्कृतिक भरभराट आणि त्यातही महिलांचा मोठा वाटा असणं, हे महाराष्ट्रात का घडू शकलं? याचं मुख्य कारण महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासात सापडतं.
कालप्रवाहात विसरलेली एक ऐतिहासिक घटना सांगतो. २५ नोव्हेंबर १९५५ रोजी पुण्याच्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर बुल्गॅनीन आणि कृश्‍चेव यांचा सत्कार झाला. पुण्याचे तेव्हाचे महापौर बाबूराव सणस यांनी त्या कट्टर कम्युनिस्ट अशा दोघा नेत्यांना गांधी टोप्या घातल्या होत्या. तेव्हा बुल्गॅनीननी एक फार मोठं विधान केलं. ते म्हणाले की, ‘‘राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी, वसाहतवाद आणि साम्राज्यशाहीला विरोध म्हणून सुरू केला. म्हणून भारतवर्ष स्वतंत्र झाल्याचं श्रेय महाराष्ट्रीय माणसाला द्यायला हवं.’’ म्हणजे समता आणि स्वातंत्र्याचे पुरोगामी वारे शिवाजी महाराजांमुळे या दक्षिण प्रांतात कित्येक शतकं वाहत होते हे अधोरेखित होतं.
महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया रुजवला. १९१७ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केला. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या वंचितांना न्याय, समानता मिळण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. शिवाजी महाराजांनी रुजवलेली स्वातंत्र्याची मूल्यं आणि संतवाङ्‍मय याकडून मिळालेला वैचारिक वारसा शिक्षणाच्या प्रसारातून सर्वदूर पसरत राहिला. यातून अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. १९६० ते ८० मध्ये राष्ट्रवाद, विवेकवाद, किंवा १९८० ते २००० या दोन दशकांत शरद जोशींची शेतकरी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, नर्मदा बचाव चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, डाव्या विचारसरणीच्या संघटना, नामांतर चळवळ अशा अनेक चळवळी सुरू झाल्या. त्यांची जुळवणी सामाजिक असली तरी त्यांचे ideological किंवा राजकीय धागे मात्र उघड दिसत होते. हिंदुत्ववादाची नवमांडणीसुद्धा तोपर्यंत सुरू झाली होती. या सगळ्या घटनांचे पडसाद सर्व कलाप्रकारांवर पडत राहिले.
स्वातंत्र्यापूर्वी सव्वाशे मराठी चित्रपट निर्माण झाले होते, तर ६० ते ७० च्या दशकात जवळजवळ २०० मराठी चित्रपट तयार झाले. १९६५ मध्ये दिल्लीत सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’ची धुरा सांभाळली होती पु. ल. देशपांडेंनी! त्यानंतर तीन वर्षांनी ‘दूरदर्शन’ची शाखा मुंबईमध्ये सुरू झाली. या दृश्य-श्राव्य माध्यमाची लोकप्रियता वाढल्यामुळे मुख्य धारेची रंगभूमी त्या दशकात जवळजवळ संपली होती. खरंतर, नव्या महाराष्ट्र राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नाटकांवरील करमणूक कर माफ केला होता.
भांडवलशाहीच्या आणि बाजारपेठेच्या रेट्यामुळे शोषणाची आणि हिंसेची चाहूल लागलेल्या कामगार चळवळीचे हुंदके, आधुनिक रंगभूमीवर ऐकू येऊ लागले. अण्णा भाऊंच्या ‘अकलेची गोष्ट’ या वगानंतर ‘नवे तमाशे’ हा नवा कलाविष्कार समोर आला. तेव्हाच समाजवादी कलापथकांची रंगभूमीदेखील जोरात कार्यरत होती. वसंत बापटांनी त्या प्रयोगांना ‘राष्ट्रीय तमाशा’ असं नाव दिलं. इथे एक उल्लेख विषादाने करतो की, मराठी रसिकांनी सर्व प्रकारच्या संगीताला प्रेमाने, खोलवर हृदयात रुजवलं; मात्र दृश्यकलांकडे काणाडोळा केला. मासिकांची मुखपृष्ठं – कॅलेंडर – भेटकार्डांवरील चित्रं इतपतच चित्रकलेला भाव मिळाला. चौकातले पुतळे इथेच शिल्पकला थांबली. म्हणूनच पोचखानवालांचं हाजी-अली चौकातलं म्युरल, वा प्रफुल्ला डहाणूकरचं वरळी नाक्यावरचं कित्येक मजली उंच भित्तिचित्र सरकारी धबडग्यात जमीनदोस्त झालं, तेव्हा निषेधासाठी ४-५ मराठी माणसं जमा झाली. आमचे कान तयार झाले; पण आम्हाला नजरच मिळाली नाही. धुरंदर, आबालाल रहिमान, अहिवासी, पळशीकर, सडवेलकर, गायतोंडे, रवींद्र मिस्त्री, संभाजी कदम, प्रभाकर बरवे अशी मोजकी नावं जरी घेतली, तरी बहुतेकजण, ‘ ही कोण मंडळी आहेत बुवा ?’ असाच प्रश्न विचारतील. मूळचा मी स्वतः चित्रकार असल्यामुळे ही खंत मला सतत बोचत राहते, त्यामुळे आज इथेही
आपण हे दृश्यकलादालन बंदच ठेवू या. १९६० मध्ये महाराष्ट्रातील साक्षरतेचा दर केवळ ११.७९ टक्के होता. अगदी सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षणाच्या प्रसाराची मोहीम जोरदार राबवली होती. या शिक्षण व्यवस्थेतून मराठी मध्यमवर्गाची सुरुवात झाली होती. हा वर्ग उच्चजातीय आणि शहरात राहणारा होता. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही त्यांच्या ज्ञानपरंपरेमुळे त्यांचं सामाजिक स्थान दृढ होतं. दोन पंचवार्षिक योजना राबवूनही दारिद्र्य हटत नव्हतं, महागाई वाढत होती, समाजवादावरचा विश्वास उडू लागला होता. या सुशिक्षित असंतोषी मध्यमवर्गाने आधुनिक मराठी साहित्याची निर्मिती केली. कथा-कादंबरी ह्या साहित्यप्रकारांतून समकालीन प्रश्न उभे होऊ लागले.
व्यवस्थेविषयीचा अंगार व्यक्त करायला अनियतकालिकांच्या चळवळीसह अनेक बंडखोर साहित्यचळवळी या सुशिक्षित मध्यमवर्गाने सुरू केल्या. पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, दि. बा. मोकाशी असे साहित्यिक समकालीन संवेदना प्रकट करत राहिले. १९६३ मध्ये नेमाडेंची ‘कोसला’ आणि रणजित देसाईंची ‘स्वामी’ या भिन्न स्वभावाच्या कादंबऱ्या, ७८-८० च्या सुमारास ‘बलुतं’ आणि ‘उपरा’ ही दोन विलक्षण आत्मचरित्रं, असे साहित्यातले मैलाचे वाङ्‍मयप्रकार स्वात्र्यंत्योत्तर पहिल्या दोन दशकांत प्रसिद्ध झाले. याच मध्यमवर्गात एकत्र कुटुंब व्यवस्थेचं विघटन सुरू झाल्याने नात्यातली गुंतागुंत वाढली होती. तेंडुलकरी वास्तववादी रंगभूमी तयार झाली ती या पार्श्वभूमीवर! मानवी नात्यांचा कुरूप चेहरा तेंडुलकरांच्या नाटकांनी मराठी माणसासमोर ठेवला. त्या अस्वस्थतेचं शमन काही प्रमाणात पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, बाळ कोल्हटकर यांसारख्या दिग्गज नाटककारांकडून झालं. तोपर्यंत बऱ्याच अंशी सवर्ण असलेल्या वाङ्‍मयाचा पोत अधिक समृद्ध झाला तो ७५ ते ८० मधल्या विद्रोही, दलित साहित्याच्या निर्मितीतून.
सर्व प्रकारच्या शोषणापासून दलितांची मुक्तता कशी होऊ शकते, या मंथनामध्ये दलित राजकारणाची दिशा काय असावी इ. ऊहापोह ऐरणीवर आला. दलित जाणिवेचं नवं आत्मभान आणि आत्मसन्मानाची प्रचिती देणाऱ्या या दलित साहित्याने जातिबांधवांच्या होणाऱ्या कोंडीला वाचा फोडली. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, लक्ष्मण माने, दया पवार आणि इतर अनेकांनी ही वाट अधिक सकस केली. आजही दलित नाटकाचा प्रवाह सातत्याने चालू राहिला आहे. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी आणि इतर दलित नाटककार प्रस्थापित उच्चवर्गीय सौंदर्यस्थळांना बदलून स्वतःची ओळख देण्यात यशस्वी झाले आहेत. स्त्रीवादी साहित्याचं भरीव योगदानही फार मोलाचं आहे. अगदी विभावरी शिरूरकरांपासून ते मेघना पेठे, लता रवींद्र त्यांच्या लेखनातून स्त्रीवादी जाणिवा ताकदीने व्यक्त करत राहिल्या. पुरुषसत्ताक रचनेमध्ये घुसमटलेली स्त्रीवेदना, कुटुंबातील असमान-दुय्यम स्थान असे विषय स्त्री-लेखिकांनी कायमच उत्कटतेने हाताळले. तत्कालीन असंतोषाच्या पार्श्वभूमीवर दादा कोंडकेनामक भन्नाट कलाकार त्याच्या रांगड्या विनोदामुळे प्रचंड लोकप्रिय झाला. १९७१ ते १९९६ मधल्या त्यांच्या चित्रपटामुळे शहरी नायक बदलून गबाळा, चालू, ग्रामीण नायक दिला. धोबी, शिंपी, हवालदार, गुराखी असे काहीसे हीरोमटेरियल नसलेले धंदे नायकांना दिले. द्वयर्थी संवाद, ठेक्याची गाणी हा दादांचा फॉर्म्युला हिट झाला.
कलाविकासाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे साधारण १९९० ते २०२० मध्ये जागतिक अवकाशात प्रचंड डचमळ झाली. अनेक युद्धं, दहशतवाद, विभाजनवादी राष्ट्रवाद, कडवा धर्मवाद यातून वाढलेली असहिष्णुता, द्वेष, हिंसा यातून मराठी समाजही विवेकवादापासून दूर होत गेला. एकीकडे जागतिकीकरणामुळे मिळालेली भौतिक सुबत्ता आणि व्यक्तिवादी जीवनपद्धती; तर दुसरीकडे बेलगाम शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, विषमता पसरवणाऱ्या विकास योजना, मूलतत्त्ववादी उजव्या विचारसरणीचं सार्वत्रीकरण यामुळे समाज झपाट्याने दुभंगत गेला.
अशा विचित्र परिस्थितीत महाराष्ट्रातलं कलाक्षेत्रही संभ्रमित राहिलेलं आहे. आता मुक्तपणे काम करणं अवघड झालं आहे. काही दिवसांपूर्वी सलमान रशदींवर झालेला निंदनीय हल्ला, हे लेखनस्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचं ताजं उदाहरण! बहुमताच्या बाजूची अभिव्यक्ती करणे सक्तीचं वाटण्याइतपत दहशत, कलाकारांमध्ये असल्यामुळे ‘होयबा’ असेल तर चलती असेल. तसंच, कोणत्या गोष्टीमुळे, कोणाच्या भावना दुखावल्या जातील आणि हात उगारला जाईल याची कल्पना नसल्यामुळे बोटचेप्या कलेची आणि कचखाऊ कलाकारांची भाऊगर्दी झाली आहे.
कलाकारांना समकालीन संवेदनेचा संसर्ग होणं दुर्मीळ झालंय. स्व-संस्कृतीच्या साच्यात, इतिहासाच्या एकांगी पुनर्लेखनाचे आणि कलेच्या शुद्धीकरणाचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. यात कला आणि कलाकाराची घुसमट होत आहे. या २१ व्या शतकाची मूल्यप्रणालीच संपूर्ण बदललेली आहे. ‘सत्य म्हणजे काय बुवा?’ असा प्रश्न एकमेकांना विचारत समोर ठेवलेल्या माहितीची मशागत करत राहण्याला पर्याय उरलेला नाही. संख्यात्मकदृष्ट्या भरपूर सृजन निर्मिती होत असली तरी, सगळाच कलाव्यवहार एका सकस केंद्राकडून मीडिऑक्रिटीच्या परिघावर स्थिरावत असल्यासारखा दिसतोय. अर्थात, मधूनमधून लक्षणीय प्रयोग होतच राहतात; परंतु ते उचलून धरण्यासाठी प्रेक्षक म्हणून आपण कमी पडतो. टी-२० फॉर्मेंटची मोहिनी इतकी जबरदस्त आहे की, तीन तासांचा चित्रपट, तीन अंकी नाटक, किंवा विलंबित-मध्यलयीचा ख्याल हे सगळं संपलं आहे. एकीकडे OTT प्लॅटफॉर्ममुळे वैश्विक कला उंबरठ्यावर येऊन पोहोचली; पण त्याचबरोबर बाजारू, चकचकीत कलेला उठाव मिळून परंपरागत, अभिजात कलेचं विसर्जन झालं. पैसे देऊन किंवा प्रेक्षकांचा अनुनय करून पांडित्य, प्रसिद्धी आणि पैसा मिळू शकतो, हे इंगित आमच्या किशोरीताई-कुमारांना कधी कळलंच नाही. दैनंदिन जीवनात झपाट्याने आक्रसत जाणाऱ्या मराठी भाषेच्या कक्षा माझ्यासारख्याला क्लेषदायी ठरत आहेत. मी बदललेल्या टेक्नॉलॉजीला सामोरं गेलो, ती आत्मसातसुद्धा करू शकलो. पण सृजनाचे निकृष्ट कोंभ आणि आयुष्याचा कमी झालेला कस मात्र मी स्वीकारू शकत नाही.
वैज्ञानिक प्रगतीने मानवी अस्तित्व जास्त टिकवून ठेवलं आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, कलेचं स्वरूप आणि नीतिमूल्यं बदलली आहेत. २०१८ मध्ये ‘ख्रिस्तीज’नी ए. आय. अल्गॉरिथमनी तयार केलेलं पहिलं चित्रं ‘Portrait of Edmond de Belamy’ लिलावात जवळ जवळ साडेतीन कोटींना विकलं. १४ ते २० व्या शतकात रंगवलेल्या खऱ्याखुऱ्या माणसांच्या १५ हजार पोट्रेट्सचा डेटा, अल्गॉरिथमला पुरवून त्या चित्राची निर्मिती झाली होती. एवढंच नाही तर, ''algorithm identification'' was seen as the artist''s signature. Technology can emulate human creativity हे तेव्हा अधोरेखित झालं.
Computer creativityच्या पुढे ‘कलाकार’ ही जमातच नष्ट होईल का? २०२९ पर्यंत, मानवाएवढी बुद्धिमत्ता कम्प्युटर्सकडे असेल तर कोणाची कला श्रेष्ठ ठरेल – मानवी सृजनाची का संगणकाची? ‘संगणकाने चालवलेला मानवी मेंदू’, हेच जर भविष्यातलं वास्तव असेल, तर त्या तंत्रज्ञानाचा ताबा कोणाकडे असणार? लामडा (LaMDA) म्हणजे यंत्रभाषा आणि ती तयार करणारे गुगलमधले इंजिनियर्स, यातला चालू असलेला वाद आपल्या सगळ्यांपुढे आहेच. आत्ताच जर आपण इतक्या प्रमाणात सायबॉट्समध्ये रूपांतरित झालेलो आहोत तर आपले न्यूरॉन्स कोणत्यातरी डिजिटल आदेशानुसार कृती करू लागले, तर आपल्या स्वातंत्र्याचं काय, Privacyचं काय? आपलं स्वातंत्र्य आपण गमावलं आहे याची जाणीवदेखील जर उरणार नसेल, तर आपल्या शिल्लक राहिलेल्या अस्तित्वाला काय
FEUTRIT? A.I. Elites who can keep themselves outside of the digital control, versus those who can be controlled by the AI algorithm, will be the new power structure of human future. The same Technology created by humans to protect themselves will consume them; and may make the human race extinct. ''Power corrupts'' is proving to be the reality even in this field. A shift from welfare and disease control to police control, from omnipotence to impotence will be the new fearsome normal for the human race. भविष्यात अशा अंतर्विरोधी सत्तासमीकरणाच्या चक्रीवादळात, कलेचं अस्तित्व कोणत्या प्रारूपातून प्रकट होईल हे सांगता येत नाही. याही चक्रीवादळात मराठी माणूस नक्की टिकून राहील. कोणी सांगावं, बेएरियातल्या कित्येकांनी मराठी क्रोमोझोम बीजं आधीच कुठंतरी space travel मध्ये टाकून ठेवली असतील.
कदाचित हजारोंनी replicated भीमसेनजी-लताबाई, बर्वे-गायतोंडे, चित्रे-कोल्हटकर, माधुरी-ऊर्मिला तयार होत असतील. कलेची पारंपरिक सौंदर्यस्थळं बदलून नवे निकष ठरत असतील. हे सगळे बदल पेलण्यासाठी आपण खचून न जाता, नव्याने स्वतःला सक्षम केलं पाहिजे. या प्रयासातही मराठी माणसाचं पाऊल पुढेच असेल अशी खात्री व्यक्त करून मी थांबतो. कोणी सांगावं, digitally created अमोल पालेकर भविष्यात तुमच्यासमोर येईल आणि या ‘ए.आय.’ युगातील मराठी गौरवगाथेचा चरित्रपट उलगडून दाखवेल??!! तोपर्यंत पुनश्च सलाम !
तळटीप : माध्यमाच्या शब्दमर्यादेला लक्षात घेऊन, लेख संक्षिप्त केला आहे; नावांचे बहुतांशी तपशील गाळले आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares