फळमाशीच्या आक्रमणाची व्याप्ती वाढली – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
88033
90383

फळमाशीचे संकट;
बागायतदार हतबल
व्याप्ती वाढल्याने चिंता; फळ- भाजीपाल्यावरही ‘ॲटॅक’, पावसाळ्यातीलही उत्पादन हातचे गेले
लीड
कोकणचा राजा ‘हापूस’ दरवर्षी नवीन समस्यांनी ग्रासला जात आहे. अवकाळी पाऊस, बदलते वातावरण, समुद्री वादळे आणि वेळोवेळी होणारा कीडरोगांचा प्रादुर्भाव ही समस्या कायमचीच आहे. त्यातच मागील आंबा हंगामात फळमाशीचा (बॅक्ट्रोसेरा डॉरसॅलीस) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवला; मात्र आता आंबा हंगाम संपला तरीही फळमाशीचे संकट दूर झालेले नाही. अजूनही वातावरणात फळमाशी फिरत असून सद्यस्थितीत केळी, चिकू, पेरू आदी कोकणातील फळपिकांबरोबर आता ग्रामीण भागात पिकवल्या जाणाऱ्या पडवळ, भोपळा, भेंडे, चिबूड आदी उत्पादनांवर फळमाशीचा ‘अ‍ॅटॅक’ सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यात हक्काचे असलेले उत्पादन हातचे गेल्याने आता कष्टकरी शेतकरी कुटुंबे हतबल आहेत. याच्या निर्मूलनासाठी व्यापक मोहीम राबवण्याचे साकडे कृषी विभागाला बागायतदारांनी घातले आहे.
– संतोष कुळकर्णी, देवगड
……………..
कशी असते फळमाशी?
फळमाशी किंचित पिवळसर-तांबूस रंगाची असून ७ मिलीमीटर लांब असते. पोटाचा शेवटचा भाग टोकदार असतो. अळी पांढरट रंगाची असून एका बाजूस निमूळती असते. तिला पाय नसतात. मादी माशी फळे पक्व होण्याच्या अवस्थेत आल्यावर सालीच्या आतमध्ये अंडी घालते. सर्वसाधारणपणे एक माशी १५० ते २०० अंडी घालते. अंडी एक ते तीन दिवसांत उबतात. अळीचा कालावधी १२ ते १४ दिवसांचा असतो. त्यानंतर अळ्या फळातून जमिनीवर पडून जमिनीत कोष तयार करतात. कोषावस्थेचा कालावधी ६ ते ९ दिवसांचा असतो. अळी फळातील गरावर उपजीविका करते. सुरुवातीला ज्या ठिकाणी अंडी घातलेली असतात, त्याठिकाणची जागा तांबूस दिसते. नंतर फळाचे पूर्णपणे नुकसान होते.
…………….
46082
देवगड ः फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात आंब्याच्या झाडाखाली अशी फळे पडलेली असतात.
हिरव्या आंब्याला धोका
फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामात विक्रीस असलेला हिरवा आंबा खरेदी करताना ग्राहकांना धोकादायक वाटत होते. हिरव्या आंब्यावर फळमाशीने केलेला दंश चटकन लक्षात येत नव्हता. आंबा फळे पिकल्यावर त्यावर छिद्रे दिसत होती. हळूहळू फळ खराब होत होते. त्यामुळे खात्रीलायक ग्राहकांना आंबा पिकवून विकण्यावर भर दिला जात होता. पर्यायाने नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खासगी स्वरुपात पिकवून आंबा विकला. आंबा पिकाचे यंदा अर्थकारणही बदलले. दरवर्षी हिरव्या आंब्याची असलेली उलाढाल यंदा फळमाशीमुळे पिक्या आंब्याकडे सरकली.

‘तौक्ते’मुळे प्रादुर्भाव
आंबा फळांना फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवला असला तरीही याचा संबंध गतवर्षीच्या मेमध्ये झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाशी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. गतवर्षी वादळात जमीनदोस्त झालेली आंबा फळे उचलली गेली नसल्यास झाडाखाली फळे कुजून सुप्तावस्थेतील माशीचे कोष यंदा त्रासदायक ठरून एकाचवेळी वाढलेली उत्पत्ती अद्यापपर्यंत उपद्रव करीत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्रास टाळण्यासाठी झाडाखाली पडलेली फळे नष्ट करण्याची आवश्यक ठरते. गतवर्षी १५ मेच्या सुमारास चक्रीवादळ होऊन झाडावरील उर्वरित फळे जमीनदोस्त झाली होती. जेवढी शक्य तेवढी फळे उचलावीत; परंतु अधिकच नुकसान झालेली फळे झाडाखाली तशीच राहिल्यास त्यातून तयार झालेल्या अळ्यांमधून फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला असण्याची शक्यता होती. त्यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडाखालील फळे नष्ट करण्याची आवश्यकता असते. अन्यथा पाऊस झाल्यावर फळे कुजून त्यातून फळमाशीची उत्पत्ती होण्यास मदत होऊ शकते.
…………….
स्थिती नियंत्रणाबाहेर
कोकणातील आंबा बागायतदारांना फळमाशी काही नवीन नाही. दरवर्षी फळमाशीचा त्रास आंबा बागायतदार शेतकऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात जाणवतच असतो; मात्र यंदाच्या आंबा हंगामात आंबा बागायतदार फळमाशीने पुरते हैराण झाले होते. काही भागातील बरेचसे पीक हातून गेले होते. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना बागायतदारांना करावा लागला. केवळ आंबा बागायतीमध्येच नव्हे, तर बाजारपेठेतील विक्रीस असलेल्या आंब्यावरही फळमाशी ‘अ‍ॅटॅक’ करीत होती. यामध्ये आंबाच नाही तर केळी, मोसंबी यासह अन्य फळपिके खराब होत होती.
……………..
भाजीपर्यंत आक्रमण
फळमाशीच्या भीतीने संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बागायतदारांनी उरलासुरला आंबा उतरवून प्रक्रिया उद्योगाला दिला. त्यामुळे यंदा प्रक्रिया उद्योगाला आंबा भरपूरच मिळाला; मात्र आता हंगाम सरला तरी फळमाशीचा जीवनक्रम संपण्याची लक्षणे काही दिसत नाहीत. सध्या घराच्या परिसरातही फळमाशी फिरताना दिसत आहे. तर चिकू, पेरू आदी फळांवर त्याचा दंश सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली पडवळ, दोडका, भोपळा आदी भाज्यांवर फळमाशी दिसत असून त्यामुळे भाजीपाला हातचा गेला आहे. पर्यायाने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ग्रामीण भागात भाजीचा तुटवडा भासेल.

46151
‘रक्षक फळमाशी सापळा’ फायद्याचा
आंबा फळे १२ ते १४ आणे तयार अवस्थेत म्हणजेच पूर्ण पक्व होण्यापूर्वी काढल्यास प्रादुर्भाव टाळता येतो. झाडाखालील पडलेली फळे तसेच फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली फळे नष्ट करावीत. झाडाखालील जमीन हिवाळ्यात खोदल्यास सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल. ठराविक कागदापासून बनवलेल्या पिशव्या फळे छोटी असताना घातल्यास फळे फळमाशी विरहित राहण्यास मदत होऊ शकेल. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला ‘रक्षक फळमाशी सापळा’ वापरल्यास फायदा होतो.
—————-
कृषी विभागाला साकडे
फळमाशी अद्याप पुरती गेलेली नाही. तसेच त्याची उत्पत्तीही काही कमी झालेली नाही. त्यामुळे आगामी हंगामात फळमाशी पुन्हा आंबा पिकाला हैराण करण्याची शक्यता गृहित धरून आतापासूनच बागायतदारांनी कृषी विभागाचे दरवाजे ठोठावून राज्याला जागे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापासूनच कृषी विभागाने फळमाशीचा त्रास नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
……………..
पॉईंटर्स
फळमाशी नियंत्रणात आणण्याची गरज
– आंब्यासह अन्य फळपिके, भाजीपाल्याकडे मोर्चा
– विक्रीस असलेली फळे, भाज्यांनाही फटका
– रक्षक सापळे सर्वांनीच वापरण्याची गरज
– कृषी विभाग गावागावांत जनजागृती करणार
– प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन दरबारी हाक
……………..
कोट
यंदा आंबा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव अधिक जाणवला. त्यामुळे परिपक्व आंबा फळे खराब होण्याचा प्रकार घडला. गतवर्षी ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बागांमधील फळे उचलली गेली नसल्यास त्यातून अळी आणि पुढे कोष तयार होऊन फळमाशीची उत्पत्तीमध्ये वाढ होण्यास मदत झाली असावी. त्यामुळे बागायतदारांनी नेहमी याची काळजी घेणे आवश्यक ठरते. बागांमधील पडलेली फळे नष्ट केल्यास फळमाशीचा त्रास टाळता येऊ शकेल. फळमाशीचा त्रास नियंत्रणात आणण्यासाठी रक्षक सापळा राबवण्याचे काम हाती घेतले जाईल. यातून शंभर टक्के फळमाशी रोखली जाईल असे नाही; मात्र उत्पत्ती १० टक्केच्या आत येऊ शकेल.
– कैलास ढेपे, तालुका कृषी अधिकारी, देवगड
……………….
कोट
46086
आंबा बागायतदारांना भेडसावणाऱ्या उपद्रवी कीटकांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेतकर्‍यांनी निरीक्षणातून अनेक प्रयोग करायला हवेत. कमी खर्चातील ‘फळमाशी रोधक’ सापळा बनवला आहे. थंडपेयाच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यातून सापळे बनवले असल्याने खर्चातही मोठी बचत झाली आहे. सापळा बनवण्यासाठी टाकावू बाटल्यांचा वापर केला जात असल्याने त्यासाठी मोठा खर्च नाही. तसेच त्याच्या चोरीचाही धोका नाही. अनेक बागायतदारांनी स्वतःच असे रक्षक सापळे बनवल्यास त्यातून अधिक लाभ मिळू शकेल. आंबा पिकाचे रक्षण करणे सोयीचे होईल. फळमाशीचे नर नाहीसे होऊन त्यांची उत्पत्ती थांबते.
– माणिक दळवी, आंबा बागायतदार, तिर्लोट (ता. देवगड)

कोट
46085
मागील आंबा हंगामात उपद्रव देणारी फळमाशी अद्याप कमी झालेली नाही. वातावरणात फळमाशी फिरताना दिसून येत आहे. यामुळे घर परिसरातील अन्य पिकांबरोबरच भाजीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत. तरच पुढील हंगामात बागायतदारांना दिलासा मिळू शकेल. याबाबत तहसीलदार, कृषी विभागाला निवेदन दिले आहे.
– नंदकुमार घाटे, आंबा बागायतदार, देवगड
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares