स्त्रियाच नाही, तर पुरुषांनाही येतं प्रसुतीपश्चात नैराश्य, त्यावर 'हे' आहेत उपाय – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
प्रसुतीनंतर अनेक स्त्रियांना मानसिक अस्वास्थ्याचा सामना करावा लागतो, ज्याला पोस्ट नॅटल डिप्रेशन (PND) म्हणजेच प्रसुतीपश्चात नैराश्य म्हणतात. मात्र, काही वडिलांनाही हा त्रास होतो आणि कदाचित हे कुणाच्या लक्षातही येत नाही.
आपण स्वतःच आपल्या बाळाला गदागदा हलवलं आहे, असा विचार डेव्हिड लेव्हिन यांच्या मनात आला आणि पुढच्याच क्षणी ते हादरून गेले.
ही 2013 सालची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांचं बाळ जेमतेम 2 महिन्यांचं होतं. त्यांनी त्यांच्या बाळाला खाली चटईवर ठेवल. ते म्हणतात, "अलगद न ठेवता मी रागात जरा जोरातच त्याला खाली ठेवलं होतं."
आणि आपण काहीतरी अत्यंत वाईट केल्याची भावना त्यांच्या मनात दाटून आली. ते स्वतः बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे अशाप्रकारे गदागदा हलवल्यामुळे बाळाच्या मेंदुला दुखापत होऊ शकते, प्रसंगी मृत्यूही होऊ शकतो, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे बाळाला इतक्या जोरात हलवल्याचं जाणवल्याने एक अनामिक भीती त्यांना स्पर्शून गेली.
बाळाचा जन्म झाल्यापासून लेव्हिन यांचा संताप आणि चिडचिडेपणा वाढत होता. इतर बाळांप्रमाणेच लेव्हिन यांच्या बाळालाही बाहेरच्या जगाशी जुळवून घ्यायला वेळ लागत होता. पण, लेव्हिनला वाटायचं बाळ सारखं रडतो. ते सांगतात, "मी ते पर्सनली घेतलं. मला वाटलं जणू हे माझं अपयश आहे. वडील म्हणून माझं काम मी योग्य पद्धतीने करू शकत नाहीय. मला असंही वाटायला लागलं की हा माझा दोष आहे. माझं बाळ रडतंय कारण त्याला मी आवडत नाहीय."
लेव्हिनला लहान मुलं आवाडायची. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून करियरची सुरुवात केल्यानंतर लेव्हिनचे आई-वडील त्यांना नेहमी म्हणत, "तू एक उत्तम वडील होशील." त्यांच्या पत्नीला दिवस गेले आणि त्यांना पहिलं बाळ झालं, तेव्हा ते खूप आनंदात होते. पत्नीला बाळाला स्तनपान करण्यात अडचणी आल्या तेव्हा वैद्यकीय पार्श्वभूमी असल्याने लेव्हिन यांनी तिला मदत केली. त्यावेळी आपण उपयोगी पडलो, ही जाणीव त्यांना सुखावून गेली.
पण, बाळाच्या जन्मानंतर त्यांचा रोल बदलला होता. आता त्यांना बाळाचा डॉक्टर नाही तर वडील व्हायचं होतं. मात्र, वडील म्हणून बाळाचा सांभाळ करताना पदोपदी वेगवेगळी आव्हानं येऊ लागली (उदा. रडणाऱ्या बाळाला शांत करणं) तेव्हा त्यांना आपल्यातच काहीतरी दोष आहे, असं वाटू लागलं.
ते सांगतात, "इथूनच गोष्टी बदलायला सुरुवात झाली." ते बाळावर ओरडायचे, त्याला तुसडेपणाने वागवायचे. मुलाचं आणि स्वतःचंही बरंवाईट करण्याचा विचार मनात येऊन इंटरनेटवर तसे फोटो बघू लागले. ही परिस्थिती कशी सुधारेल, याचा विचारच त्यांना मनात येत नसे.
ते सांगतात, "मी माझ्या बायकोला म्हणायचो की हा आपल्या आयुष्याचा शेवट आहे. यापुढे नरकयातनांचं हे चक्र असंच सुरू राहील."
बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करताना त्यांनी पोस्ट नॅटल डिप्रेशनने ग्रस्त अनेक स्त्रिया बघितल्या होत्या. बाळाच्या जन्मानंतर वर्षभरात अनेक स्त्रियांना प्रसुतीनंतरच्या नैराश्याचा त्रास होतो. यालाच पोस्ट नॅटल डिप्रेशन किंवा पोस्ट पार्टम डिप्रेशन (PPD) म्हणतात. प्रसुतीनंतरचं नैराश्य या आजाराकडे स्त्रियांचा आजार म्हणून बघितलं जातं. पण, वडिलांनांही असं नैराश्य येतं का? याचं उत्तर होकारार्थी असलं तरी लेव्हिन यांनी कधीच त्याबद्दल ऐकलं नव्हतं.
फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक फोटो
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
लेव्हिन एकटेच नव्हते. PND एक मानसिक आजार आहे ज्यात बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात सतत दुःखी वाटणं, उदासीन वाटणं आणि अगदी आत्महत्येचे विचार मनात घोळणं, अशी लक्षणं असतात. मात्र, आजही या आजाराचं फारसं निदान होत नाही आणि त्यावर उपचारांसाठीही फारसे प्रयत्नही होताना दिसत नाही. काही वेळेला त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतात. जगभरात ही परिस्थिती आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये ही मनोवस्था प्रामुख्याने आढळते.
मात्र, पुरुषांनाही PND चा त्रास होऊ शकतो, याची माहिती वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही फारशी नाही.
PND चं निदान, उपचार आणि त्याला प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आलेली संसाधनं (उदा. डॉक्टर वापरत असलेली स्क्रिनिंग प्रश्नावलीपासून ते मदत गटापर्यंत) स्त्रियांसाठी तयार केलेली आहेत. इतकंच नाही तर समाजही प्रसुतीपश्चात नैराश्याची लक्षणं पुरुषांपेक्षा स्त्रियांशी जास्त जोडून बघतो. भरीस भर म्हणजे आपल्याला मानसिक आजार आहे, हे पुरूष सहसा उघडपणे जाहीर करत नाही. त्याला एक सोशल स्टिगमा चिकटलेला आहे. त्यामुळे PND या आजारामुळे अनेक मातांचंच नव्हे तर लाखोंच्या संख्येने पित्यांचंही मोठं नुकसान होत आहे, मात्र, त्याची आपल्याला कल्पनाही नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
"महिलांमध्ये प्रसुतीपश्चात नैराश्यासारख्या मानसिक आजारांविषयी जनजागृती वाढत असली तरी पुरुषांमध्ये नाही", असं बियॉन्ड ब्लू या ऑस्ट्रेलियन मानसिक आरोग्य संस्थेचे मुख्य क्लिनिकल सल्लागार ग्रँट ब्लाश्की सांगतात.
असं असलं तरी एका अंदाजानुसार बाळाच्या जन्माच्या पहिल्या वर्षात जवळपास 10% पित्यांना नैराश्याचा त्रास होतो आणि हे प्रमाण सामान्य पुरूष लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट आहे. काही संशोधनांच्या मते 10% हे प्रमाण अत्यल्प असू शकतं. या संशोधनानुसार बाळाच्या जन्मानंतर तीन ते सहा महिन्यांच्या काळात प्रत्येक चौथ्या पित्यामध्ये नैराश्याची लक्षणं आढळतात. अनेक पित्यांना चिंता, ODC आणि PTSD याचाही त्रास होतो, असं कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो इथले मानसोपचारतज्ज्ञ आणि पुरुषांच्या समस्यांचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॅनियल सिंगले यांचं म्हणणं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
मात्र, यापैकी अगदी मोजकेच पुरुष आपल्याला काहीतरी मानसिक समस्या आहे, याचा स्वीकार करतात आणि त्यातले अगदी काहीच त्यावर उपचार घेतात. ब्लाश्की म्हणतात, "माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला असं जाणवलं की उच्च शिक्षित असूनही किंवा अगदी वैद्यकीय क्षेत्रातील असूनही पुरुषांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी एका मोठा स्टिगमा आहे. परिणामी आपल्याला काहीतरी मानसिक आजार आहे, हे पुरूष स्वीकारतच नाही किंवा त्यासाठी वैद्यकीय मदत घेतली जात नाही किंवा मी स्वतःच ही समस्या सोडवायला हवी, अशी भावना त्यांच्यात निर्माण होते."
सामान्यपणे स्त्रियांच्या तुलनेत पुरूष वैद्यकीय मदत किंवा उपचार घेणं टाळतात. कॅनडामध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की तिथले 10 पैकी 8 पुरूष त्यांचा जोडीदार त्यांना डॉक्टरांकडे जायला भाग पाडत नाही तोवर ते वैद्यकीय उपचार घ्यायला तयार नसतात. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुरूषाला विशेषतः एका वडिलाला आपण नैराश्यात आहोत, हे मान्य करणंच लाजीरवाणं वाटतं. सिंगले म्हणतात, "मानसिक आरोग्यााच्या समस्या या स्त्रियांना असतात, असा एक समज आहे आणि त्याला एकप्रकारचा स्टिगमा आहे, त्यामुळे पुरूष खरोखर अशा आजारासाठी वैद्यकीय मदत घेऊ इच्छित नाही आणि बाळाच्या जन्मानंतर तर नाहीच नाही."
आपल्या समाजात जेव्हा बाळ होतं त्यावेळी होणाऱ्या पित्याला अप्रत्यक्षपणे हाच संदेश दिला जातो की गर्भधारणा आणि बाळाला जन्म देणं, हे स्त्रीचं क्षेत्र आहे. गर्भधारणेनंतर डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स, गर्भारपणात लावले जाणारे गर्भसंस्कार आणि तत्सम क्लासेस आणि अगदी प्रत्यक्ष बाळांतपणावेळी वडिलांनी हजर असणं गरजेचं नाही, असाच एक समज आहे आणि या सगळ्या वेळी वडील हजर असले तरी त्यांचं काम बायकोला आधार देणं, हेच असल्याचं अप्रत्यक्षपणे बिंबवलं जातं. त्यांनाही काळजी वाटू शकते, भीती वाटू शकते, याची दखलही घेतली जात नाही.
अशा अप्रत्यक्ष संदेशातूनच "आधार देणं आणि हवं ते पुरवणं", हेच पुरुषांचं कर्तव्य असल्याचे स्टिरियोटाईप्स तयार होतात, असं सिंगले म्हणतात. मात्र, मातांना आधार देतानाच पित्यांनाही आधाराची गरज असते, याकडे दुर्लक्ष होतं. युकेमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एका वडिलांनी सांगितलं, "मागे वळून बघताना मला वाटतं की संपूर्ण यंत्रणा, कुटुंब आणि स्वतः मी माझ्या बायकोला कसा आधार देता येईल, यावरच आमचं लक्ष केंद्रीत होतं आणि मी कणखर असायला हवं, यावर भर होता."
पुरूषी स्टिरियोटाईप्सचा दबाव असतो. वडिलांनी खंबीर आणि आश्वासक असावं, अशी अपेक्षा असते. अशावेळी तेच खचले तर काय?
यूकेमध्ये झालेल्या याच अभ्यासात सहभागी झालेल्या आणखी एका पित्याने आपला अनुभव सांगताना म्हटलं, "अपयशी झाल्याची भावना निर्माण झाली होती. आपण खरे पुरूष नाहीच, असं वाटू लागलं होता." "बाळ झाल्यावर कुठला पिता निराश होतो?", असा प्रश्न एकाने विचारला. तर काहींची उपचार घेण्याची तयारीच नव्हती. मानसिक अनारोग्याच्या काराणावरून कामावरून सुट्टी देण्यात आलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की यामुळे बाळासोबत नवीन रुटीन बसवणं त्यांच्यासाठी अधिकच अवघड झालं आणि त्यामुळे त्यांचं नैराश्य अधिकच वाढलं. ते म्हणतात, "मला असं वाटायचं की मी पिता म्हणूनच नाही तर नवरा म्हणूनही अपयशी ठरलो." काहींना तर आपला जोडीदार आपल्याला सोडून जाईल, अशीही भीती वाटायची.
फोटो स्रोत, Getty Images
ब्लाक्शी सांगतात, "मानसिक आजार म्हणजे दुर्बलतेचं लक्षण किंवा अशा समस्या पुरुषांनी स्वतःच सोडवायला हव्या, असं आजही मानलं जातं." ते पुढे म्हणतात, "आई आणि बाळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आणि अवघड काळात पुरुषाने मजबूत असायलाच हवं, या भावनेमुळेही अशा गैरसमजांना अधिक खतपाणी मिळतं."
लेव्हिन यांनी जवळपास वर्षभर आपल्या पत्नीलाही त्यांना होत असलेल्या नैराश्याच्या त्रासाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. एका रुग्णासोबत PND बद्दल बोलल्यानंतर त्या रुग्णाने त्यांचं नाव अमेरिकेतल्या 'चार्ली रोझ' या टॉक शोच्या आयोजकांना सुचवलं. या टॉक शोमध्ये त्यांनी नैराश्याविषयी आपले अनुभव शेअर केले.
लेव्हिन सांगत होते, "मला नैराश्य आलंय, याची तिला कल्पनाच नव्हती. आमच्या बाळाबद्दल माझ्या मनात काही वेगळे विचार येतात, हेही दिला ठावुक नव्हतं आणि तिला न सांगण्यामागचं एक कारण म्हणजे मी तिला हे सगळं सांगितलं तर ती मला दुबळा, कमकुवत समजेल, असं मला वाटायचं, हेसुद्धा तिला माहिती नव्हतं."
ते पुढे म्हणाले, "पुरुष त्यांच्या भावना लगेच बोलून दाखवत नाहीत. आपल्या जोडीदाराच्या मागे अगदी दगडाप्रमाणे कणखरपणे उभं राहणं, पुरुषाकडून अपेक्षित असतं. हे सगळं बोलण्यासाठीही माझ्याकडे कुणीच नव्हतं आणि मला खरोखरच वाटत होतं की मी हे सगळं तिला सांगितलं तर ती मला सोडून जाईल."
आणखी एक अडथळा म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनला प्रामुख्याने स्त्रियांशी जोडून बघितलं जातं. त्यामुळे बाळाच्या वडिलांनाही या नैराश्याचा त्रास होऊ शकतो, असं डॉक्टरांनासुद्धा वाटत नाही. बाळाच्या जन्मावेळी आईच्या मेंदूत अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. स्त्रियांना पोस्ट नॅटल डिप्रेशनचा जास्त त्रास होण्यामागे हे कारण आहेच.
शिवाय, PND ची स्त्री आणि पुरुषांमध्ये दिसणारी लक्षणंही वेगवेगळी आहेत. सतत उदास वाटणं, उगाच रडू येणं, प्रचंड थकवा किंवा आळस यामुळे अंथरुणावर पडून राहणं, अशी लक्षणं स्त्रियांमध्ये दिसतात. तर पुरुष टाळाटाळ करताना किंवा कामातून पळ काढताना दिसतात. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये जास्तवेळ काम करणं किंवा जास्तीत जास्त वेळ फोनवर असणं. बरेचदा ते मद्याच्या आहारी जातात. त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचं दिसतं. त्यांचा चिडचिडेपणा वाढतो किंवा काही जण सगळा दोष स्वतःवर ओढावून घेताना दिसतात.
फोटो स्रोत, Getty Images
सिंगले सांगतात, "कधीकधी पुरुषांमधल्या नैराश्याची लक्षणं सामान्य लक्षणांपेक्षा वेगळी असतात. ती मानसिक न राहता त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. उदाहरणार्थ पोट दुखणे, डोके दुखणे."
बाळाच्या जन्माआधी पुरुषाला कधी नैराश्याचा त्रास झाला असेल तर बाळाच्या जन्मानंतर त्यांना PND चा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
पुरुषांमधल्या PND बाबात असलेल्या समजांमध्ये काही प्रमाणात तथ्य असलं तरी ते दिशाभूल करणारं असल्याचं स्विडनमधल्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्युट ऑफ स्टॉकहोममध्ये महिला आणि बाल आरोग्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक असणारे आणि पुरुष PND चा अभ्यास करणारे प्रा. मायकल वेल्स म्हणतात. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही कधीकाळी नैराश्याचा त्रास झाला असेल तर बाळाच्या जन्मानंतर त्यांना PND होण्याची शक्यता जास्त असते आणि "हे केवळ हार्मोन बदलावर अवलंबून नाही", असं प्रा. वेल्स यांचं म्हणणं आहे.
इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनात बाळाच्या जन्मानंतर आईप्रमाणेच वडिलांमध्येही हॉर्मोनल बदल होत असल्याचं आढळून आलं आहे. पत्नीच्या गर्भारपणात पतीच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी घसरत असल्याचं या संशोधनात आढळलं आहे. कदाचित याचाही वडिलांमधल्या PND शी संबंध असावा.
शारीरिक कारणं काहीही असली तरी बाळाच्या जन्मानंतर आई आणि वडील दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल होतात. ब्लाश्की म्हणतात, "बाळाशी जुळवून घेणं, नात्यामध्ये झालेला बदल, सेक्स लाईफमध्ये झालेला बदल, नवीन जबाबदाऱ्या, जोडीदाराला आलेल्या तणावाचा सामना करणं, वाढलेला खर्च, या सर्व बदलाांना पुरुष सामोरं जात असतो. बरेचदा पुरुषांना बाळाच्या जबाबदारीचीही काळजी वाटत असते."
पित्यांना PND होण्याची काही विशिष्टं कारणंही असू शकतात. उदाहरणार्थ आईला PND असेल तर पित्याला होण्याची शक्यता पाच पटीने वाढते. (आणि वडिलांना असेल तर आईलाही होण्याची शक्यता अधिक असते.) नोकरीत स्थैर्य नसणं, प्लॅनिंग न करता गर्भधारणा होणं, नात्यात समाधानी नसणं, गरोदरपणा आणि बाळाचा जन्म याविषयी फारशी माहिती नसणं, मदतीला कुणी नसणं, अपुरी झोप आणि पितृत्वाच्या अवास्तव अपेक्षा, अशीही काही कारणं असू शकतात. (पुरुषांमधल्या PND बाबत संशोधनाचे सह-लेखक वेल्स सांगतात की PND बाबत आणखी एक गोष्ट म्हणजे केवळ पहिल्यांदा वडील होणाऱ्या पुरुषांनाच PND होऊ शकतो, हाही एक गैरसमज आहे.)
मात्र, लेव्हिन यांचा विचार केला तर असं लक्षात येतं त्यांना चांगली नोकरी होती, या जोडप्यामध्ये कसलाही तणाव नव्हता, नैराश्याचा पूर्वी कधी त्रास झालेला नव्हता, स्वतः बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे गरोदरपणा आणि प्रसुती याविषयी सखोल ज्ञानही होतं आणि तरीदेखील त्यांना प्रसुतीपश्चात नैराश्याचा सामना करावा लागला. यावरून हे नैराशय कुणालाही येऊ शकतं, हे सिद्ध होतं. लेव्हिन यांना वाटतं की पालकत्व किती अवघड असू शकतं किंवा नवजात बाळ कसं वागू शकतं, हे पूर्णपणे समजून न घेतल्याने त्यांचा नैराश्याचा त्रास वाढला. अनेकदा बाळ फार झोपत नाहीत, लवकर उठतात किंवा काहीही कारण नसतानाही खूप रडतात, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. ते सगळा दोष स्वतःला देतात.
मार्क विलियम्स यांनाही अगदी लेव्हिन यांच्याप्रमाणेच वाटायचं. मार्क विलियम्स 'फादर्स रिचिंग आउट' या यूकेतल्या फादर्स सपोर्ट ग्रुपचे संस्थापक आहेत. वेल्समध्ये राहणाऱ्या मार्क विलियम्स यांना 2004 साली पहिलं बाळ झालं. त्यावेळी त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. बाळाच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी आपण पुन्हा आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ, असं त्यांना वाटलं होतं. मात्र, ठरल्याप्रमाणे काहीच झालं नाही. ते सांगतात, "डॉक्टरांनी सांगितलं की काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या पत्नीचं सिझर करावं लागेल. हे ऐकून मला धक्काच बसला." ऑपरेशन थिएटरमध्ये काय सुरू आहे, याविषयी कुणीच त्यांना काही सांगत नव्हतं. त्या सर्व परिस्थितीत ते खूप घाबरले आणि आता आपली पत्नी आणि बाळ जगणार नाही, अशी आत्यंतिक भीती त्यांना वाटू लागली.
फोटो स्रोत, Getty Images
या धक्कादायक अनुभवातून सावरतात न सावरतात तोच त्यांना नवजात बालकाचा सांभाळ करताना येणाऱ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं आणि ही सगळी उलथापालथ तेव्हा सुरू होती जेव्हा त्यांच्यावर कर्ज होतं आणि पैशांची चणचण असल्याने कामावर लवकर परत जाण्याचं प्रेशर होतं. त्यांच्या पत्नीलाही प्रसुतीपश्चात नैराश्याने ग्रासलं होतं.
ते सांगतात, "मला दारुचं व्यसन लागलं. मी प्रत्येक बाबतीत टाळाटाळ करू लागलो. माझं व्यक्तिमत्वच बदललं." त्यांचा खूप संताप व्हायचा. एकदा रागाच्या भरात त्यांनी सोफ्यावर एवढ्या जोरात ठोसा मारला की त्यांचा हात मोडला होता.
एकदा जिममध्ये जाताना जिममधल्या एका मित्राशी गप्पांच्या ओघात PND चा विषय निघाला आणि त्यांना पुरुषांनाही PND असतो, हे कळालं. दोघांच्याही पत्नींना PND होता आणि त्या दोघांनाही कायम उदास वाटायचं. या घटनेनंतर विलियम्स यांनी आईप्रमाणेच वडिलांसाठीही काही हेल्प ग्रुप आहेत का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की पुरुषांना PND मध्ये मदत करेल, असा कुठलाच ग्रुप नाही.
विलियम्स सांगतात की पुढे काही वर्ष मानसोपचार, औषधं आणि मित्रांची मदत यामुळे ते PND मधून सावरले. त्यांना ADHD (Atteention Deficit/Hyperactive Disorder) चंही निदान झालं. पण, त्यांनी PND साठी काम करायचं ठरवलं. त्यांना वाटलं की इतरही काही पुरुष असतील ज्यांना PND असेल आणि मदतीची गरज असेल तर त्यांना ती मिळावी. ते म्हणतात, "त्याकाळी यासाठी कुठलाच सपोर्ट ग्रुप नव्हता. कुणी पुरुष PND विषयी फारसं बोलायचेसुद्धा नाही."
2010 साली त्यांनी 'फादर्स रिचिंग आउट' ही संस्था सुरू केली केली. ही संस्था नैराश्य आलेल्या वडिलांना मानसिक आधार आणि सल्ला देण्यात मदत करायची. पण, पुढे आर्थिक अडचणींमुळे संस्था बंद करून त्यांना सपोर्ट ग्रुप सुरू करावा लागला. विलियम्स सांगतात, ही संस्था सुरू केल्यानंतर त्यांना लगेचच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला होता. पुरुषच नाही तर स्त्रियांकडूनही त्यांना प्रतिसाद मिळाला. ते सांगतात, "स्त्रिया सांगायच्या की त्यांच्या जोडीदाराला खूप त्रास होतोय. गरोदरपणा आणि बाळाच्या जन्मानंतर त्यांचं वागणं बदललं आहे."
विलियम्स केवळ PND ग्रस्त पित्यांना मदत करून थांबले नाहीत. त्यांनी एक चळवळ म्हणून हे काम हाती घेतलं. ते वेगवेगळ्या परिषदांमध्ये जायचे, अभ्यासकांसोबत बोलायचे, त्यांनी याविषयावर पुस्तकही लिहिलं, इंटरनॅशनल फादर्स मेंटल हेल्थ डे सुरू केला. इतकंच नाही तर ज्या स्त्रियांना PND असेल त्यांच्या जोडीदाराचीही या आजारासाठी तपासणी केली जावी, यासाठी यूके सरकारकडे लॉबिंग केलं आणि ते यशस्वीही झाले.
विलियम्स सांगतात मानसिक आरोग्य आणि त्यातही पुरुषांमधल्या PND विषयी जागरुकता आता वाढली आहे. पण, पुरेशा प्रमाणात नाही. ते म्हणतात, "आता परिस्थिती बरीच सुधारली असली तरी म्हणावी तितकी जागरुकता अजून आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडे केवळ मातांसाठीचा डेटा आहे, पित्यांचा नाही. यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कदाचित एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीने यासाठी पुढाकार घ्यायला हवा."
वेल्स म्हणतात PND हा मातांशी संबंधित आजार असल्याचं दिर्घकाळ मानलं गेलं आणि त्यामुळे अडचण अशी झाली की या आजाराचं निदान करण्यासाठी जी साधनं वापरली जातात (उदा. PND ची शंका असणाऱ्यांसाठी एक प्रश्नवली दिली जाते) ती स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पुरुषांमधल्या PNDचं योग्य निदान होत नाही आणि त्यांना उपचारही मिळत नाही.
संशोधक असलेले वेल्स म्हणतात की PND हा स्त्रियांचा आजार असल्याचं आजही अनेक डॉक्टरांना वाटतं. ते सांगतात, "नुकतंच मी एका नर्सला विचारलं की तुम्ही वडिलांचंही स्क्रिनिंग करता का? त्यावर त्या म्हणाल्या, 'नाही. वडिलांना नैराश्य येऊ शकत नाही.' नैराश्य हे हॉर्मोनल बदलांमुळे येतं आणि बाळाला जन्म दिल्यामुळे हे बदल होतात, असं तिच्या मनात पक्क होतं."
वेळीच मदत मिळाली नाही तरच त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. पाश्चिमात्य देशांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याची शक्यता चारपट जास्त आहे. (अर्थात एकट्या PND मुळे नाही.)
नवजात बालकाच्या संगोपनात वडिलांची भूमिकाही महत्त्वाची असते. एका संशोधनानुसार बाळाच्या जन्माच्या पहिल्या वर्षात वडील नैरश्याने ग्रसित असतील तर बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीत अडचणी येऊ शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या मते पुरुषांमधील PND आजाराला आळा घालण्यासाठी केवळच आईच नाही तर वडिलांचंही मानसिक आरोग्य तपासायला हवं. त्यातून अशा पुरुषांना PND चा त्रास होऊ शकतो की नाही, याचं आधीच निदान होऊ शकेल. ज्या वडिलांना बाळाच्या संगोपनात आया, नर्स आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभते, त्यांना नैराश्य येण्याची शक्यता खूप कमी असल्याचं आपल्या अभ्यासातून दिसून आल्याचं वेल्स सांगतात.
बाळाला प्रत्यक्ष जन्म न देणाऱ्या पालकाला (वडिलांना) डॉक्टर किंवा नर्सकडून फारसं मार्गदर्शन होत नाही, असं लेव्हिन सांगतात, ते म्हणतात, "जी प्रत्यक्ष बाळाला जन्म देते तिला प्राधान्य मिळतं आणि प्रत्यक्ष जन्म न देणाऱ्या पित्याला दुय्यम स्थान असतं. हे बरोबर नाही. माझ्या पत्नीला प्रसुतीपश्चात नैराश्य नव्हतं. पण, मला होतं. माझ्या नैराश्यामुळे तिला नैराश्य येऊ शकलं असतं किंवा तिला नैराश्य आलं असतं तर मलाही ते येण्याची शक्यता 50% होती. मात्र, हे कुणीच कुणाला सांगत नाही. सामान्यपणे बालरोगतज्ज्ञांकडे बाळाचे आई-बाबा दोघंही एकत्र येत असतात आणि बालरोगतज्ज्ञसुद्धा जोडप्याचं स्क्रिनिंग करत नाही (केवळ आईचं करतात.)."
सिंगले म्हणतात की वडिलांनाही हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनाही मदतीची गरज पडू शकते. मित्रांची, फादर्स सपोर्ट ग्रुपची गरज पडू शकते. मात्र, ही मदत तेव्हाच मिळेल जेव्हा मला मदतीची गरज आहे, हे आधी स्वीकारलं जाईल. केवळ बोलून हा प्रश्न सुटणार नाही तर मदतीचा हात पुढे करूनच गरजवंत पुरुषांना ती मिळणार आहे, असं लेव्हिन, सिंगले, वेल्स आणि इतर सर्वांचं म्हणणं आहे.
कामाच्या ठिकाणी पितृत्व रजा घेणाऱ्या पुरुषांची चेष्टा न करता त्यांचा आदर केला जाईल, अशी परिस्थिती निर्माण करणंही याकामात मोलाची मदत ठरू शकते. वडील बाळाला प्रत्यक्ष जन्म देत नाही. त्यामुळे प्रसुतीनंतर आईप्रमाणे वडिलांना काही शारीरिक त्रास नसला तरी बाळ होणं हा आयुष्यातला मोठा बदल आहे आणि त्या बदलाशी जुळवून घ्यायला वडिलांनाही वेळ लागतो.
पितृत्व रजेमुळे वडिलांमध्येही अधिक जबाबदार झाल्याची आणि या सर्व प्रक्रियेत आपलाही सहभाग असल्याची जाणीव बळावते. यातूनही प्रसुतीपश्चात नैराश्यापासून बचाव होऊ शकतो. लेव्हिनचं बाळ तीन महिन्यांचं झालं तेव्हा त्यांनी पितृत्त्व रजा घेतली.
ते सांगतात, "मी साडेतीन आठवडे बाळासोबत होतो आणि या सहवासाचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. कारण, याच सहवासाने त्याच्याप्रती माझी काही जबाबदारी आहे आणि एक चांगला पालक होण्याची क्षमता माझ्यात आहे, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला." ते पुढे सांगतात, "त्याला दूध देण्यापासून ते त्याचे कपडे बदलण्यापर्यंत मी सगळं करायचो, त्याला कारमध्ये बसवून माझ्या आई-वडिलांना भेटायला जायचो, मित्रांसोबत हॉटेल्समध्ये जायचो. मी हे सगळं करू शकतो, हा आत्मविश्वास मला वाटू लागला."
ढोबळपणाने सांगायचं तर लोकांनी पालकत्वाबद्दल अधिक प्रामाणिक असायची गरज असल्याचं लेव्हिन म्हणतात.
मी सगळं करू शकतो, हे पूर्णपणं असत्य विधान असल्याचं लेव्हिन यांना वाटतं. पूर्णवेळ काम करून बाळाकडेही पूर्ण लक्ष देता येऊ शकतं, असं लोकांना वाटतं. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत असा समज असतो. पण, पुरुषांवरही आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचा सामाजिक दबाव असतोच.
लेव्हिन म्हणतात, "आणि जेव्हा गोष्टी या अपेक्षेप्रमाणे घडत नाही तेव्हा तुम्ही स्वतःलाच दोषी धरता. तुम्हाला वाटतं, 'मलाच हे जमत नाहीय.' कारण आयुष्यभर मी माझ्या अवती-भवती सगळ्यांनाच ही परिस्थिती हाताळताना बघितलेलं असतं." त्यामुळे "वडील होणं आनंददायी अनुभव असला तरी बाळाचा सांभाळ करणं सोपी गोष्ट नाही", हे स्वीकारण्यात आणि सांगण्यात संकोच वाटता कामा नये.
लेव्हिन सांगतात की बाळासोबत जुळवून घेण्यासाठी त्यांना आणखी वेळ हवा, हे स्वीकारणं म्हणजे त्यांना आणखी काही आठवडे मदतीची गरज होती. मग ते एका थेरपिस्टशी बोलले. पोस्ट नॅटल डिप्रेशन पुरुषांमध्येही आढळून येतं, याची त्या थेरपिस्टना कल्पना होती. पण, याआधी कुणीही पुरुष यासाठी आपल्याकडे आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे लेव्हिन यांनी मानसोपचार सुरू केले. रात्री बाळासाठी आया ठेवून लेव्हिन रात्री पुरेशी झोप घेऊ लागले.
चार वर्षांनंतर लेव्हिन यांना दुसरं बाळ झालं. त्यावेळीसुद्धा त्यांना PND चा त्रास झाला होता. मात्र, यावेळी त्यांनी वेळीच आजाराची लक्षणं ओळखून उपचारांना सुरुवात केली होती.
लेव्हिन 2018 पासून पोस्ट नॅटल सपोर्ट इंटरनॅशनल या संस्थेच्या संचालक मंडळात आहेत. येत्या जुलै महिन्यापासून ते या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम सांभाळतील. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशीनच्या या वर्षी होणाऱ्या परिषदेत लेव्हिन 'पुरुषांमधील प्रसुतीपश्चात नैराश्य' या विषयावर बोलणार आहेत. नवजात बालकासोबत येणाऱ्या प्रत्येक पालकाला ते त्यांचा अनुभव सांगतात. पुरुषांमधील प्रसुतीपश्चात नैराश्याला असलेला सामाजिक स्टिगमा पुसून टाकणे, हे त्यांचं मिशन आहे.
कारण परिस्थिती हाताबाहेर गेली असती, याची त्यांना पूर्ण जाण आहे. लेव्हिन म्हणतात, "मी बालरोग तज्ज्ञ नसतो, आज जिथे काम करतोय तिथे काम करत नसतो तर कदाचित मी आज तुमच्याशी बोलत नसतो. ज्या नैराश्यातून मी गेलो तिथे काहीही अघटित घडू शकलं असतं."
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares