अस्तरिकरणाच्या ठिकाणी देणार पुरेसे पाणी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
माळेगाव, ता. २९ : ‘शेतकरी बंधूनो…नीरा डावा कालव्यांतर्गत होणारे अस्तरीकरण आणि भराव्याचे मजबुतीकरणात पाझराला अडथळा येणारे प्लॅस्टिक अथवा कसलाही कागद टाकला जाणार नाही, केवळ मातीचा भरावा मजबूत करून चार इंच जाडीचे सिमेंट, क्रश व खडीचे अस्तरीकरण होणार आहे. तेही काम सलग न करता ‘पॅच वर्क’ पद्धतीने केले जाईल. तसेच, अस्तरीकरणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी देण्याची हमीही जलसंपदा खात्याने घेतली आहे. त्यामुळे ही महत्वकांक्षी कामे होणे भविष्यात शेती टिकण्याच्या दृष्टीने खूप गरजेची आहेत,’’ असे मत नीरा डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी लाभधारक शेतकऱ्यांना दिले.

नीरा डावा कालव्याचे १५२ किलोमीटरपैकी सुमारे ३२ किलोमीटर पॅचवर्क पद्धतीने अस्तरीकरण व माती भराव्याचे मजबुतीकरण करण्याचे शासनस्तरावर निश्चित झाले आहे. परंतु, या कामात कालव्याचा पाझर थांबणार आहे. या मुख्य मुद्याच्या आधारे काही कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, अस्तरीकरण होताना प्लॅस्टिक अथवा जाड कागदाचा वापर केला जाणार आहे. पाझर बंद होऊन विहिरींचे पाणी गायब होणार आहे. सायफन बंद होऊन शेतीला पाणी मिळणार नाही, अशा पद्धतीची अफवात्मक माहिती शेतकऱ्यांमध्ये पसरल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमिवर जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता धोडपकर यांनी अधिकृतरीत्या कालव्याच्या कामाची माहिती स्पष्ट केली.
ते म्हणाले, ‘‘नीरा डावा कालवाअंतर्गत अस्तरीकरण असलेल्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाण्याची काळजी करू नये. जलसंपदा विभागाने तुमच्या शेतीला सिंचनासाठी पुरेसे आणि शाश्वत पाणी देण्याची हमी जाहीर केली आहे. बारामती हद्दीत मोरेवस्ती, नागवडे वस्ती, देशमुख वस्ती, जळोची, बांदलवाडी हद्दीत अस्तरीकरण झालेल्या ठिकाणी अशाच पद्धतीची पाण्याची हमी शेतकऱ्यांना दिलेली होती, ती हमी वास्तवात उतरली असून, तेथील एकही शेतकरी पाण्यापासून वंचित असल्याची तक्रार पुढे आली नाही. शेजारच्या फलटण तालुक्यात उजव्या कालव्याचे तब्बल ७० किलोमीटर अस्तरीकरण व मातीचा भरावा मजबुतीकरण झाले आहे. तेथेही जलसंपदा खात्याने कोणालाही पाण्यापासून वंचित न ठेवल्याने उसासारखी पिके दिसून येतात. त्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अस्तरिकणाच्या कामाला विरोध न करता जलसंपदा खात्याच्या धोरणात्मक निर्णयावर विश्वास ठेवावा.’’
नीरा डावा कालव्याचे महत्वकांशी अस्तरिकणाबाबत प्रकल्प अहवाल तयार आहे. त्या शेतकऱ्यांना खरी वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहावयाची असले, त्यांना जलसंपदा खात्याच्या उपविभागीय कार्यालयात प्रकल्प अहवालापासून ते पॅचवर्कचा नकाशा आदी बाबींची माहिती दिली जाणार आहे, असे धोडपकर यांनी सांगितले.
ओलिता खाली येणाऱ्या क्षेत्रात वाढ
नीरा डावा कालव्यांतर्गत पूर्वीच्या प्रकल्प अहवाल मंजूरीनुसार सुरवातीला ३७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत होते. त्यामध्ये वाढ होऊन ते १ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्यामध्ये ६० हजार हेक्टर क्षेत्रावर उसासारख्या नगदी पिकांचा समावेश आहे. एकाबाजूला ओलिताखाली येणारे क्षेत्र लक्षणिय वाढले आणि दुसऱ्याबाजूला सव्वाशे वर्षांपूर्वीचा जीर्ण झालेल्या कालव्याची वहन क्षमता पन्नास टक्क्याने घटली आहे. परिणामी शेती सिंचनाची पाळी ६० ते ७० दिवसांवर गेली. ही शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी कालवा मजबुतीकरण करणे आणि वहन क्षमता वाढविणे एवढाच पर्याय आता जलसंपदा खात्याकडे उरला आहे, अशी माहिती धोडपकर यांनी दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares