सृष्टी-दृष्टी : साकारता नर-मादी द्वैत.. – Loksatta

Written by

Loksatta

प्रदीप रावत
जीवसृष्टीच्या आरंभीच्या अनेक जीवांमध्ये स्त्री-पुरुष द्वैतच नव्हते. जीवांच्या ठेवणीत काही बदल उलथापालथ म्हणावे असे असतात. त्याचा एक तेजाळ नमुना म्हणजे जीवांमध्ये उपजलेला स्त्री-पुरुष भेद!
सगळय़ा प्राचीन कथांमध्ये, प्राक्कथांमध्ये नर आणि मादी हे द्वैत कसे उपजले याबद्दलच्या कथा असतात. त्यात बहुतेक वेळा देवांची करणी वेठीला धरलेली असते. उदा. जुना करार सांगतो की देवाने आधी आपल्या प्रतिमेशी मिळताजुळता असा पुरुष बनविला. (त्याला आदम ऊर्फ पुरुष मनुष्य म्हणतात.) मग त्याच्या एकटेपणावर उपाय म्हणून त्याचीच एक बरगडी घेऊन हव्वा ऊर्फ स्त्री तयार केली. आधुनिक विज्ञान अर्थातच असे मानत नाही. असे का? अगदी प्राचीन काळापासून आजवर तगून राहिलेले पण नर-मादी भेद नसलेले असे अनेक जीव आहेत. आठवून पाहा.
शालेय अभ्यासक्रमांमध्ये अमिबाचे विभाजन कसे होते आणि एकाचे दोन, दोनाचे चार अशी त्यांची प्रजा फोफावत राहते हे शिकवले जाते. त्यातली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अमिबाला वेगळे असे आई- बाप नसतात. प्रत्येक जण स्वत:च स्वत:ची हुबेहूब आवृत्ती पैदासत राहतो. आपण मराठीत अमिबाला ‘ती अमिबा’ न म्हणता ‘तो अमिबा’ असे पुरुषिलगी सर्वनाम वापरतो खरे! पण तो निखळ भाषिक सांस्कृतिक अपघात किंवा आकस! अगदी आरंभीच्या काळातील अनेक जीवांमध्ये असा स्त्री-पुरुष भेदच नव्हता! त्यातल्या अनेकांमध्ये अजूनही नाही. त्यांचे प्रजनन पूर्वीप्रमाणेच स्वयंगती, स्वयंप्रेरित, स्वयंसिद्धपणे सुरू आहे! पण असे थोडके जीव सोडले तर इतर जीवसृष्टी मात्र स्त्री-पुरुष भेदांनी भरलेली आणि ‘भारलेली’ आहे. सर्व प्रकारच्या जीवांमध्ये अनेक तऱ्हेच्या पेशी असतात. लिंग-विरहित जीवांच्या पुनरुत्पादनात स्वयंसिद्ध असणाऱ्या पेशींमध्ये काही बदल घडले. त्यांमध्ये अडेनोसाइन फॉस्फेट नावाचे ऊर्जा पुरविणारे रसायन तयार करणारी मायटोकॉन्ड्रिआ नामक उपपेशी रचना पैदासली गेली. त्याभोवती आणि त्यापाठोपाठ घडत उलगडत गेलेल्या बदलांमध्ये लिंगभेद होण्याची कारणे आढळतात. लिंगभेद कोणत्या प्रक्रियेमुळे कसा विकसित झाला याबद्दलच्या सर्व तर्काचे वर्णन तांत्रिकदृष्टय़ा फार क्लिष्ट आहे. म्हणून त्याचे अधिक तपशीलवार रेखाटन तात्पुरते बाजूला ठेवू.
जीवसृष्टीच्या आरंभीच्या अनेक जीवांमध्ये असे स्त्री-पुरुष द्वैतच नव्हते. अजूनही नाही. पण जीवांच्या ठेवणीत धीमेपणाने सतत बदल होतातच. त्यातले काही बदल उलथापालथी किंवा उत्पात म्हणावे असे असतात. त्याचा एक तेजाळ नमुना म्हणजे जीवांमध्ये उपजलेला स्त्री-पुरुष भेद! अगोदरचे काही जीव उदा. अनेक जिवाणू स्वत:ची दुप्पट केल्यागत पेशी विभाजन करीत उपजायचे. त्यातली सर्व म्हणजे १०० टक्के जनुके पुढच्या पिढीत आहेत तशी बव्हंशी उतरायची. एकाचे दोन, दोनाचे चार होताना आधीचा वारसा दोन्ही शकलांना सर्वंकष आणि एकसमान लाभायचा. सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी लिंगभेदावर आधारलेले प्रजोत्पादन उत्क्रांत झाले. या पद्धतीचे प्रजनन त्या त्या जीवांसाठी खरेतर अधिक कष्टमय झाले. प्रयत्नांच्या मोजमापात हिशेब केला तर ते खर्चीक देखील झाले. तरीसुद्धा उत्क्रांतीदृष्टय़ा ते फार किफायतशीर ठरले.
स्त्री-पुरुष भेद उपजला. सहजी नजरेस यावेत असे भेदाभेद त्यांमध्ये अवतरले. त्यांचे गुण एकसमान राहिले नाहीत. त्याचे दृश्य अवतार उदा. शरीराची किंवा अवयवांची ठेवण, आकारमान, काही शरीरक्षमता, वागणे- यामध्ये निराळेपण अवतरले. अर्थातच या बदलांना जनुकीय पाया असतो. त्या जनुकी पायांमध्ये परिवर्तन झाले. मुख्य म्हणजे नव्या संततीच्या उत्पत्तीसाठी असलेले पायाभूत घटक म्हणजे अंड आणि पुंबीज यांच्या आकारमान आणि संख्येत मोठी तफावत आली. संततीच्या वारशामध्ये एकाचे ५० टक्के दुसऱ्याचे ५० टक्के तेही विभिन्न बदलत्या गुणांचे उदयाला आले! वारशाने येणाऱ्या या विविधतेमुळे गुण पैदासणाऱ्या जनुकांच्या जोडय़ांचे वैविध्य बोकाळले.
बर्नार्ड शॉच्या नावाने एक कथा सांगितली जाते. त्याच्या काळातील एक सुंदर नटी त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि धारदार भाषेवर भाळली आणि त्याला म्हणाली ‘आपण लग्न करू आपली संतती तुमच्यासारखी बुद्धिमान आणि माझ्यासारखी सुंदर होईल’. शॉ तत्काळ म्हणाले, ‘पण उलटही होऊ शकेल! म्हणजे दिसायला माझ्यासारखी अकलेला तुझ्यासारखी’! ही वदंता खरी असेल- नसेल पण शॉचे उत्तर मात्र जनुकविज्ञानातील ढळढळीत सत्य आहे. संततीला अर्धी जनुकधारी रंगसूत्रे आईकडून आणि उरलेली अर्धी बापाकडून, असा ५० टक्क्यांचा वसा आणि वाटा आई- बाप पेलतात. त्यात कोणत्या गुणांची जनुके कुणाकडून किती जातील, हा ५० टक्के संभाव्यतेचा पडावा तसा फासा असतो. खेरीज एका गुणाचे दान पडण्याचा दुसऱ्या गुणाचे दान पडण्याशी संबंध नसतो. मेंडेलने आपल्या प्रयोगानुसार ही गुणांची निव्वळ ‘लॉटरी’असते हे दर्शविले होते. पडणारी दाने आपआपसावर अवलंबून नसतात, हे तत्त्वच मेंडेलने विशद केले होते. यामुळे काय होते? तर नर-मादी या दोहोंकडून येणाऱ्या जनुकांच्या जोडय़ाचे अंगभूत निराळेपण वा वैविध्य बळावते.
अशा या विविध गुणधारी वैविध्याचा स्फोट एकीकडे आणि उपजलेल्या विविधगुणी जीवांची तगण्याची क्षमता दुसरीकडे अशी रस्सीखेच सुरू झाली! जी संतती उपजेल त्याचे गुणावगुण अगदी एकसारखे आणि पिढय़ानपिढय़ा बव्हंशी स्थिर राहण्याची संभाव्यता देखील उणावली. पुरुष वर्गापेक्षा स्त्री जीवांची काही जनुके भिन्न ठेवणीची! खेरीज भिन्न रचनेमुळे तगण्याची क्षमतादेखील भिन्न! दोहोंचा संगम व्हायचा तर त्यासाठी उभयपक्षी काही खटाटोप करणे आले! अशा खटाटोपातून भागीदार मिळण्या न मिळण्याची अशाश्वतीही ओघाने आली. समजा भागधेयाने संगम झाला, तरी त्यातून यशस्वीपणे संतती फळण्याची अशाश्वती होतीच! यदृच्छेने पत्ते पिसावे तशी जनुकांची जुळणी फेरजुळणी होत नवरचनेची प्रक्रिया अधिक जलद झाली. सतत बदलत्या पर्यावरणात तगून राहण्यासाठी नावीन्यपूर्ण आणि अधिक उपयुक्त जनुकांना अधिक पुढाकार लाभला. हानिकारक किंवा अयशस्वी जनुकांचा निचरा शक्य झाला. लिंगभेदावर आधारलेले पुनरुत्पादन उत्क्रांत झाले आणि ओघानेच लैंगिक निवड देखील मोठी कळीची झाली.
नराचे वीर्य संख्येने मुबलक पण आकाराने बरेच लहान! उलटपक्षी मादीची अंडी संख्येने कमी पण आकाराने मोठी! या भिन्नत्वामुळे लैंगिक निवडीचे तत्त्व आणि मार्ग अधिक वरचढ आणि प्रशस्त ठरले. उत्क्रांतीच्या नजरेने पाहिले तर याचा अर्थ काय? अंडे सापेक्षतया दुर्मीळ म्हणून महागडे आणि वीर्य विपुल म्हणून स्वस्त! पण या हिशेबाबरोबरीने आणखी काही लाभ खर्चाच्या बाबी आपसूक उद्भवतात! गर्भधारणेतील कष्टप्रद गुंतवणूक आणि नंतर येणारा पालकत्वाच्या बोजामधला वाटा! जवळपास ९० टक्के सस्तन प्रजातींमध्ये पालकत्वाचे ओझे फक्त मादीला वाहावे लागते. या अर्थाने मादीची गुंतवणूक अधिक तर नराची कमी! या लाभ-खर्चामधल्या तफावतीपोटी समागमाच्या संधीमध्ये देखील व्यस्त प्रमाण निर्माण होते. त्यामुळे अपत्यनिर्मितीच्या क्षमतेमध्ये फरक पडतो. या दृष्टीने पाहिले तर जोडीदाराची निवड करताना मादी आणि नराचे हितसंबंध परस्परविरोधी ठरतात. फलन, गर्भधारणा आणि संगोपन यात खर्ची पडणारी ऊर्जा आणि सायास बव्हंशी एकटय़ा मादीचेच! त्यामुळे जोडीदाराची पारख आणि निवड तिला अधिक निकडीची ठरते. उलटपक्षी नरांमध्ये बहुगामीपणा घडवणारी जनुके प्रबळ असतात. या अर्थानेच एकीकडे संधिसाधू नर आणि दुसरीकडे सावध धोरणी मादी असे जे चित्र आढळते ती लैंगिक निवडीची फलनिष्पत्ती!
दुसरीकडे नराचे आयुष्य म्हणजे अन्य नरांशी सातत्याने स्पर्धा! त्यातली कष्टप्रद आणि कधीकधी जीवघेणी जोखीम, खटाटोप व संघर्ष ! आकर्षक किंवा बलवान नरांना त्यामुळे सर्वाधिक संभोगसंधी लाभते. तसेच माद्या अशा नरांना पसंत करतात. दुर्बळ नरांना अशी संधी मिळणे अशक्यप्राय किंवा दुर्मीळ! पण जवळपास सर्व माद्यांना जोडीदार मिळतोच. त्यामुळे संभोगसंधीतला माद्यांचा वाटा अधिक असतो. दुसऱ्या शब्दांत नरमादींच्या या अपत्यनिर्मितीच्या संभवक्षमतेतील तफावतीमधून नरांमधली स्पर्धा आणि मादीचा ‘निवड अधिकार’ उत्क्रांत होतो. अर्थात लैंगिक उत्क्रांतीचे हे सर्वसाधारण रूप आहे. याला काही अपवाद आहेत पण त्याचा विचार थोडय़ा अधिक विस्ताराने पुढील लेखात करू.
पण हा संभाव्यतेच्या अनिश्चिततेने भारलेला लिंगभेदी जुगारी प्रवास जीवसृष्टीला अनेक अर्थाने लाभला! त्यात न लाभलेल्यांचे प्रमाण देखील मोठे असणार. पण या स्त्री-पुरुष द्वैतानुसार जे जगले आणि तगले त्यांची संख्या भलती अफाट होत गेली! जणू जीवसृष्टीला ही एक नवोन्मेषी युक्ती गवसली. कामजीवन नावाचा निराळा पैलू जीवांच्या जगण्याला लाभला.
लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.
pradiprawat55@gmail.com
मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concept of male female duality in relationships truth of genetics gender inequality in the world zws

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares