अस्तरीकरण आंदोलनात शेट्टी यांची उडी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सोमेश्वरनगर, ता. २८ : नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरण विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता खुद्द माजी खासदार राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. मंगळवारी नीरा (ता.पुरंदर) येथे सकाळी अकरा वाजता शेट्टी यांच्या उपस्थितीत अस्तरीकरण विरोधी शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे. यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी आता पेटणार हे निश्चित.
नीरा डाव्या कालव्याचे १५२ किलोमीटर पैकी सुमारे ३५ किलोमीटर अस्तरीकरण वेगवेगळ्या २९ टप्प्यात होणार आहे. या अस्तरीकरणामुळे कालव्याची गळती रोखता येईल व कालव्याची फूट टाळावी यासाठी अस्तरीकरण केले जाईल अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. मात्र या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या अस्तरीकरणामुळे विहिरींचे पाणी आटून शेतकरी उजाड होईल, भूजल साठा संपून जाईल, शेतकऱ्यांसोबत साखर कारखाने ही गोत्यात येतील अशी भूमिका मांडत शेतकरी कृती समिती व कालवा बचाव समितीने आंदोलन छेडले आहे. याचाच भाग म्हणून अस्तरीकरणाला विरोध करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नीरा येथे लक्ष्मीनारायण कार्यालयात मंगळवारी शेतकऱ्यांचा मेळावा शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी बोलवला होता. आता या मेळाव्यास खुद्द माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
बारामती-पुरंदरच्या सीमेवर येऊन शेट्टी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेट्टी यांच्या आंदोलनात उतरण्यामुळे कालवा अस्तरीकरणाच्या प्रश्नाचे गांभीर्य वाढणार असून राज्य शासनावर मोठा दबाव यानिमित्ताने निर्माण होणार आहे. अधिकाऱ्यांनाही अस्तरीकरण करणे जिकिरीचे होणार आहे. याबाबत सतीश काकडे म्हणाले, अस्तरीकरण करण्यास स्थगिती मिळाली हे खोटे आहे. अधिकृत पत्र निघालेलेच नाही. उलट आज ३५ किलोमीटर आणि पुढील टप्प्यात उरलेले सर्व अस्तरीकरण होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
लढा यशस्वी करण्यासाठी शेट्टी यांची गरज
बारामती शहरात अस्तरीकरण केल्याने विहिरी अटल्या आहेत. इंग्रज काळातील या कालव्याने भुजलसाठा व विहिरी जगाव्यात हाच हेतू होता. तो हेतूच संपेल. तसेच अस्तरीकरण करून पाणी वाचले तर ते कंपन्या, कारखान्यांना दिले जाते हे नाझरे धरणावरील शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. त्यामुळे हा अराजकीय लढा यशस्वी करण्यासाठी शेट्टी यांच्या अनुभवाची गरज आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares