नारायणगावात ढगफुटी सदृश पाऊस – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नारायणगाव, ता. १ : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, येडगाव भागात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. येडगाव धरण परिसरात १५५ मिलीमीटर; तर नारायणगाव, आर्वी, गुंजाळवाडी परिसरात १०१ मिलीमीटर पाऊस झाला. या भागात सन २०११ नंतर प्रथमच एकाच दिवशी कमी वेळात जास्त पाऊस झाला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.
नारायणगाव परिसरात बुधवारी रात्री दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडूच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप दृश्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत नाही. खरीप हंगामातील सोयाबीन पीक फुलोरा ते शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाची फुलगळ होण्याचा धोका आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याच स्वरूपाचा पाऊस सुरू राहिल्यास मात्र सोयाबीनसह इतर भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, असे गुंजाळवाडी येथील शेतकरी हरिभाऊ वायकर, नारायणगाव येथील रोहन पाटे, राजेंद्र वाजगे, येडगाव येथील गुलाबराव नेहरकर यांनी सांगितले.
या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली आहे. पावसामुळे सोयाबीनवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे फुलगळ होण्याचा धोका आहे. सोयाबीन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कीड व बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी करावी, असे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल घाडगे यांनी सांगितले.
तालुक्यात सप्टेंबर ते ऑक्टोबरअखेर तीन टप्प्यात द्राक्षाची छाटणी होत असते. छाटणी पूर्व मशागतीची कामे झाली आहेत. शेतकरी द्राक्ष बागा छाटणीच्या तयारीत आहे. मात्र, पाऊस झाल्याने सप्टेंबर छाटणीची कामे लांबली आहेत. पावसामुळे भुजल पातळीत वाढ होणार आहे. या मुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. झालेला पाऊस ऊस पिकाला फायदेशीर ठरणार आहे.
फुल उत्पादक अडचणीत
मागील दोन आठवडे झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो १५ ते २० रुपये भाव होता. गणेशोत्सवामुळे मागील दोन दिवस प्रतवरीनुसार झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो ४० ते ५० रुपये; तर शेवंतीच्या फुलांना प्रतिकिलो १२० रुपये भाव मिळला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे उभ्या झेंडूच्या पिकांचे नुकसान झाले आहे. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या खराब झाल्याने आज फुलांना प्रतिकिलो दहा रुपये भाव मिळाला. ऐन गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना वाढीव भाव मिळण्याची हातची संधी गेली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares