माझा एक दिवस बळीराजासाठी: कृषी अधिकारी, कर्मचारी अभियान राबवणार; 300 कोरडवाहू गावांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
राज्यातील शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून उपायोजना करण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबरदरम्यान कृषी अधिकारी ते कर्मचारी माझा एक दिवस बळीराजासाठी अभियान राबवणार आहे. या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील तिनशे कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शेतकरी आत्महत्या व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याबाबत नोंद घेऊन सरकारला कळवले जाणार आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाची सुरुवात 1 सप्टेंबर रोजी मेळघाट येथून करणार आहेत. धारणी, चिखलदरा या अत्यंत दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू आणि आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत संपूर्ण दिवस व्यतीत करून शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या जाणून घेणार आहेत. कृषी व संलग्न विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचले का, हे प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत.
शेतकऱ्यांना होणारा पतपुरवठा, त्यांची सामाजिक सुरक्षा, आरोग्य, तंत्रज्ञान, पिकांमधील वैविधीकरण व शेतकऱ्यांची मार्केटला जोडणी अतिशय सुक्ष्म पद्धतीने अभ्यास ते करणार आहेत. याच बरोबर कृषी अधिकारी ते कर्मचारी महिनाभर हा उपक्रम राबवणार आहेत. त्याचा अहवाल सरकारला देऊन धोरणात्मक उपाययोजना करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी
जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी विविध गावांना भेटी देणार आहेत. 300 कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न व समस्या, निदर्शनास आलेल्या त्रूटी व अडचणी याबाबत सविस्तर अहवाल सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका असे आवाहन केले आहे. प्रत्यक्षात दररोज तीन पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या राज्यात होत आहेत. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर ठोस उपाययोजना केल्या शिवाय शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी माझा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम, अभियान महिना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून कृषी मंत्री सत्तार व कृषी अधिकारी ते कर्मचारी शेताच्या बांधावर व गावात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares